धर्मांतराने वाढलेली उंची धम्म न अंगिकारल्याने आम्हीच खुंटविली ! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धर्मांतराने वाढलेली उंची धम्म न अंगिकारल्याने आम्हीच खुंटविली ! - भन्ते अश्वजित

photo google

We are the ones who stumbled upon the height of conversion by not embracing Dhamma!

Social24Network 

आम्ही १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरला दीक्षाभूमीवर माणसाला हीन मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करून मानवतावादी बौद्ध धर्म स्वीकारला. आम्हाला स्वतंत्रपणे, स्वाभिमानाने जगता यावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला २२ प्रतिज्ञा दिल्या. म्हणून आम्ही ताठ मानेने इतरांसारखे स्वतंत्रपणे जगत आहोत. आज बौद्ध धम्माची दीक्षा देऊन ६४ वर्षे उलटून गेली असून आंबेडकरोत्तर चळवळीची दिशा आणि दशा आणि या चळवळीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक व आर्थिक परिवर्तन यांचा तुलनात्मक बदल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली चळवळ यांचा सांगोपांग विचार करणे इष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जीवन दीन-दलित, शोषीत, वंचित, कामगार व शेतमजूर आणि महिलांचे हक्कासाठी त्यांच्या प्रगतीसाठी व त्यांना तसे अधिकार मिळवून देण्यासाठी वाहून घेतले. त्यांच्या या अनमोल कार्यामुळेच आज आंबेडकरी समाज प्रगतीकडे, विकासाकडे मोठ्या प्रमाणात झेप घेत आहे, परंतू ६४ वर्षातील ही प्रगती खरोखर समाधानकारक आहे का? हा मोठा प्रश्न गोंधळात आहे. सामाजिक चळवळीत अनेक संस्था आपल्या परीने कार्यरत आहेत व आपापल्या परीने लोकांचे प्रश्न सोडवित आहेत. परंतु समाजातील अंधश्रद्धा व अज्ञान यांचे वाढते प्रमाण पाहून या संस्था कुठेतरी कमी पडत आहेत अशी वारंवार शंका येते. शैक्षणिक क्षेत्रात आंबेडकरी समाजाने चांगली प्रगती केली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक तरुण-तरुणींनी उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली आहे. आरक्षणाच्या व खुल्या प्रवर्गातून उच्च पदाच्या नोकऱ्यासुद्धा मिळविल्या आहेत, आयएएससारखी महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या यशस्वीपणे व सक्षमरित्या सांभाळीत आहेत. सनदी अधिकारी, शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच अनेक इतर लहान मोठ्या उद्योगधंद्यात आंबेडकरी समाजातील तरुणांनी पाय रोवले आहेत. परंतू यामधील मोजकेच तरुण चळवळीशी इमान राखून आहेत. बाकीच्यांना ना समाजाचे घेणे देणे आहे, धम्माशी घेणे-देणे आहे, ना विहाराशी घेणे-देणे आहे.

अशा परिस्थितीत कुणी चांगलं सांगायला गेलं की, त्याचीच कुरापतं काढून त्याला नाउमेद करतात. आज कोणत्याही बौद्ध वस्तीवर नजर टाकली की सर्वप्रथम सद्धम्माचे पालन नाही गावात,गावात एकी नाही, बुद्ध विहारात जाण्यासाठी कुणाला वेळ नाही. एकहाती समाजाचं नेतृत्व करेल असा चेहरा वस्तीच्या कोणत्याच आरशात दिसत नाही. महिलांना टीव्ही सिरीयलपासून फुरसत नाही, फूट नसेल असं महिला मंडळ कुठेच दिसत नाही. घराघरात डोकावून पाहिलं तर बाप लेकात मेळ नाही, मायलेकीत बनत नाही, भावाभावात पटत नाही, बहिणभावात बंधुत्व नाही,पती-पत्नीत समन्वय नाही, सलोखा नाही. सून सासुचं ऐकत नाही अन सासूही आपल्या वजनाने राहत नाही. लहान मुलांवर धम्माचे योग्य संस्कार नाहीत. धम्माप्रति तरुण पिढी भानावर तर नाहीच नाही पण कुणाच्या बापाला हे दबत नाही. शेजाऱ्या शेजाऱ्यांतुन विस्तव जात नाही. अन दारुड्यापासून त्रस्त नसेल नसेल असं गाव शोधूनही सापडत नाही. फक्त वस्तीच नावच आहे शांतीनगर! ते फक्त पाटीवरच आहे समतानगर! कुणाला सांगायलाच आहे एकतानगर! पोस्टाच्या पत्त्यासाठीच आहे भिमनगर, आदर्श नगर! समाजातील दारुड्या प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्यापासून घडणाऱ्या अनुचित घटना व कलह ही बाब अतिशय गंभीर आहे. बाप पितो म्हणून लेक पितो आणि हताश आजोबा दोघांनाही भितो. अशी अवस्था असल्यानं या प्रवृत्तीत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत असून ही निश्चितच धोक्याची सुचना आहे. ज्यांना अजून जीवनाचा अर्थसुद्धा कळला नाही अशा बाल्यावस्थेतील मुलं दारुचा ग्लास तोंडाला लावतांना जराही कचरत नाहीत, भित नाहीत ही समाजाची सर्वात मोठी हानी होय. या व्यसनापायी कित्येक नांदते संसार उध्वस्त झालेत. या व्यसनापायी आमच्या कित्येक आयाबहिणींनी स्वत:ला जाळून घेतलं कित्येकींना जाळण्यात आलं! ह्या व्यसनापायी कित्येक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या वेळप्रसंगी मुडदे सुद्धा पडले. या व्यसनापायी घराचं वारापाणी होते. माणसाची पत जाते इज्जतीला बट्टा लागतो. शरीराची हानी होते. गावात नातेवाईकात किंवा घरात कोणी किंमत देत नाहीत. असं असूनही लोकं ते जहर आपल्या ओठाला का लावतात हा प्रश्न मात्र सुटत नाही.

समाजातील दुसरं वाढतं आणि भयानक व्यसन म्हणजे टी.व्ही.मध्ये दाखविले जाणारे भडक, उत्तेजक पाश्चिमात्य संस्कृतीचे हिडीस दर्शन पाहण्याची लागलेली सवय होय. त्यामुळे आपली तरुण पिढी एकदमच, एकाएकी भरकटल्यासारखी झाली. पोरांची तर ऐटच बदलली. चंगळवाद त्याच्या नसानसात भिनल्याने तो दिवसाच अय्याशी जीवन जगण्याचे स्वप्न पाहतो. आपण एखाद्या नटासारखं कसं दिसू यासाठी त्याचा सगळा खटाटोप यात मुलीही मागे नाहीत. जास्तीत जास्त आपलं अंग कसं उघडं राहील किंवा तंग कपडे घालून आपली देहयष्टी किती परफेक्ट आहे हे दाखविणाऱ्या निर्लज्जपणा करताना मनातून मुली जराही लाजत नाहीत. वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून कार्यक्रमांची रेलचेल असल्यामुळे आणि खास करून मोबाईलमुळे घरातील शांतता, घराचं घरपण, घराची संस्कृती, घराची शालीनता आणि घरातील नम्रता लुप्त झाली असून त्याची जागा आता अरेरावीपणा, उद्धटपणा, मग्रुरपणा, मीपणा आणि बिनधास्तपणा यांनी घेतल्याने घरं दुःखी अंत:करणानं कशीबशी उभी आहेत. म्हणून आता प्रत्येकानं प्रामाणिकपणानं आपण आपल्यापासून सुरवात करायची खरी वेळ येऊन ठेपली आहे आणि ही आपल्यासाठी आपल्या समाजासाठी शेवटची संधी आहे असं समजून प्रत्येकानं सर्वप्रथम स्वतःला शुद्ध केले पाहिजे. मनातील विकार हळूहळू बाहेर काढले पाहिजे व त्यांना लगाम लावला पाहिजे. आपण आपल्या घरात दररोज त्रिशरण पंचशील घेतलं पाहिजे २२ प्रतिज्ञांचं वाचन केलं पाहिजे आणि त्या मार्गाने जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. घर धम्ममय ठेवलं पाहिजे. आपल्या मुलांना त्रिशरण पंचशीलाचा मुद्देसूद अर्थ समजावून सांगून त्याच्या पालनाने किती मोठा लाभ होतो हे सुद्धा त्यांना विस्तृतपणे सांगावे. तरच धर्मांतराने वाढविलेली उंची आम्हाला शाबूत ठेवता येईल.

We-are-the-ones-who-stumbled-upon-the-height-of-conversion-by-not-embracing-Dhamma-BhanteAshwajit


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!




टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Uttam म्हणाले…
सत्य परिस्थिती मांडणी केली. बाप पीतो म्हणुन मुलगा पितो. आजोबा हताश होतो, वंदन सर आपणास
sujay म्हणाले…
वंदामी भंन्तेजी,
सत्य परिस्थिती मांडली आहे. खूप छान लेख आहे धन्यवाद