बौद्धमय होणे म्हणजे काय? || What is Buddhism?

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बौद्धमय होणे म्हणजे काय? || What is Buddhism?

 

बौद्धमय होणे म्हणजे काय? - भन्ते अश्वजीत

Photo Credit Unsplash




Social24Network

 


सर्वप्रथम बौद्धमय होणे म्हणजे नेमके काय? हे पहिल्यांदा आपण समजून घेतले पाहिजे. दिसेल त्याला, जो करीत असेल त्याला, अन जो करीत नसेल त्यालाही नुसते जयभीम करणे म्हणजे बौद्धमय होणार नाही? स्वार्थासाठी शिकून संघटित समाजात फूट पाडून समाजातच संघर्ष पेटवीत ठेवणे म्हणजे बौद्धमय होणार नाही? १४ एप्रिल आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी दारू पिऊन धांगडधिंगा घालीत मिरवणूक काढून 'आकाश पाताळ एक करो, बुद्ध धम्मका स्वीकार करो!,'   'डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय!' 'बोलो रे बोलो जयभीम!' 'बोलना पडेगा जयभीम!' 'ताकद से बोलो जयभीम!' अशा गर्जना करणे म्हणजे बौद्धमय होणे नाही? मिरवणुकीनंतर रात्री स्टेजवर स्वतःला बाबासाहेब समजून धम्म सोडून राजकारणावर भाषण ठोकणे म्हणजे बौद्धमय होणे नाही? ६ डिसेंबर दिनी शुभ्र वस्त्र परिधान करून शीलाचे पालन न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहून, दुसऱ्या दिवशी पेपरात नाव पाहण्यासाठी गर्दी करणे म्हणजे बौद्धमय होणे नाही? पोर्णिमेच्या दिनी उपोसथाचे पालन न करता दोन बुक वाचून महिलांना पौर्णिमेचे महत्व समजून सांगणे म्हणजे बौद्धमय होणे नाही? तर बौद्धमय होणे म्हणजे शीलवान माणूस होणे, नीतिमान माणूस होणे, गुणवान माणूस होणे, आदर्श माणूस होणे की, जो माणसासारखा दिसून माणसासारखा वागतो आणि समाजात माणूस म्हणून शोभतो. त्याच्या वागण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून आणि त्याच्या आचरणावरून जो बौद्ध असल्याची साक्ष पटवून देतो. मग अशा व्यक्तीला लोक म्हणतात तो भला माणूस आहे, तो चांगला माणूस आहे, तो निर्व्यसनी आहे, सदाचार ही त्याची ओळख आहे. शांतता व संयम हे त्याचे अस्त्र आहे. सहनशीलता हे त्याचे बॅंक बॅलन्स आहे. असे उदगार लोकांच्या तोंडून निघाले पाहिजे. तोच खरा बौद्ध होय. What is Buddhism?
 
अर्थात याची सुरुवात मला स्वतःपासून करावी लागेल, म्हणजे सर्वप्रथम मला स्वतःला बौद्धमय व्हावे लागेल. माझे घर मला बौद्धमय करावे लागेल. सर्वप्रथम आपण एकट्यानेच आपल्या घरात सकाळ-संध्याकाळ त्रिशरण पंचशील घ्यावे, असे करतांना आपल्या पत्नीला अथवा मुलांना अजिबात काही म्हणू नये. आपण असे केल्याने ते आपल्याला हसतील, एकमेकांना खुणावतील, आता जाग आली काय? असा चिमटा काढतील, नाटक करते आहे, देखावा करते आहे, असे म्हणतील. त्यामुळे आपणास वाईट वाटेल, मन दुःखी होईल, तरीही त्या म्हणण्याचा आपल्या चित्तावर काहीएक परिणाम झाला नाही किंवा होत नाही असे दाखवावे. हे करीत असतांना मात्र पंचशीलातील प्रत्येक गाथेचे शक्य होईल तेवढे काया वाचा आणि मनाने पालन करण्याचा प्रयत्न करावा. उठता, बसता, चालता, बोलता आणि झोपता सजग राहून पंचशीलातील कोणत्या गाथेचा आपल्याने भंग होत नाही ना? हा प्रश्न  सतत मनाला विचारून सावध असावे. असे करीत राहिल्याने दिवसेंदिवस आपल्यालाच आपला फरक जाणवेल. आपली काया सतेज होईल, चेहरा सदासर्वकाळ प्रफुल्लित राहील. चिंता, काळजी उरणार नाही. दुःख पिण्याची कला आत्मसात केल्याने आपले मन सुद्धा उत्साहित राहील. आपल्याला बळ प्राप्त होईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अंत:करणातून खऱ्या सुखाची अनुभूती होईल. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये होत असलेला बदल पाहून घरातील लोक सुद्धा आश्चर्यचकित होतील.कारण इतका बलवान आहे बुद्ध धम्म संघ. घरात प्रभाव  वाढणे, मान वाढणे,शब्दाला किंमत येणे या गोष्टी आपोआप होतील. काही दिवसांनंतर नकळत आपली पत्नी आपल्या शेजारी येऊन बसेल आणि सकाळ-संध्याकाळ आपण घेत असलेल्या पूजा वंदनेत सहभागी होईल. त्यावेळी आपण बौद्धमय होण्याच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत, असे समजावे. परंतु, तसा भाव आपल्या चेहर्‍यावर दिसू देता कामा नये. What is Buddhism?
 
काही दिवसानंतर त्रिशरण पंचशीलाचा मराठी अर्थ आपल्या पत्नीला समजावून सांगावा. जगातील सर्वश्रेष्ठ असलेल्या बुद्ध धम्म आणि संघाला नियमित अभिवादन केल्याने, कोणते चार प्रकारचे लाभ होतात हे सुद्धा आपल्या पत्नीला समजून सांगावे. परंतु हे सांगत असतांना ते शब्द आपल्या मुलांच्या कानावर कसे पडतील याची मात्र योजना आखावी. दररोज तेच ते ऐकल्यामुळे एक दिवस मुलांमध्ये परिवर्तन होईल आणि ते आपल्या मागे येऊन बसतील. तसेही मुले आईचे अनुकरण लवकर करतात. असे झाले की, आपण समजावे आता आपले घर बुद्धमय होण्याच्या मार्गावर आरूढ झाले आहे. मुले नियमित येऊन बसून राहिली की, त्रिशरण पंचशीलानंतर बुद्धपूजा, बुद्धवंदना, क्रमाक्रमाने म्हणण्यास सुरुवात करावी. ज्या दिवशी वेळ असेल त्यादिवशी वंदना झाल्यानंतर बौद्ध म्हणजे काय? बुद्ध धम्म जगात सर्वश्रेष्ठ कसा आहे? बौद्ध कोणास म्हणावे? बौद्धांचा इतिहास काय? बौद्ध पूर्वी कसे नांदून गेले? या देशावर बाराशे पन्नास वर्षे राज्य कसे केले? त्यावेळी हा देश कसा सुजलाम सुफलाम होता? बौद्धांचे सण कोणते?  बौद्धांनी कोणकोणते संकल्प केले पाहिजे? बौद्धांनी काय करावे काय करू नये? फावल्या वेळात कशाचे वाचन करावे? याबाबत आठवड्यातून एकदा तरी घरातल्या घरात चर्चा व्हावी. त्यानुसार वागण्याचा संकल्प करण्याची प्रतिज्ञा आपण आपल्या घरातच घ्यावी. असे केल्याने काय होईल? 

१) घरात सुख,शांती आणि वैभव हसत-खेळत नांदेल. 
२) घरात खेळीमेळीचे वातावरण तयार होईल.
३) घरात कलह, भांडण किंवा कठोर आवाजात बोलचाल होत नसल्याने घराचे घरपण भंग पावणार नाही. 
४) घरामध्ये जेष्ठाप्रति आदराची भावना असल्यामुळे घरात स्वातंत्र, समता, बंधुत्व आणि न्याय ही तत्त्वप्रणाली वृद्धिंगत होईल.
५) घरातील सर्व मंडळी दिवसातून एकदा तरी एका ठिकाणी एकत्र आल्याने त्यांच्यात आपोआप मैत्री भावना वाढीस लागेल.
६) घरातील कोणताही प्रश्न मग तो कितीही गुंतागुंतीचा असेल, बिकट असेल तरी तो सर्वांच्या समोर समोपचाराने चुटकिसरशी सुटेल.
७) अशा वातावरणामध्ये मन सन्मार्गावर आपोआप वळण घेईल. 
८) पंचशीलाचे काया वाचा मनाने काटेकोरपणे पालन होत असल्याने घर आपोआप निर्व्यसनी बनेल. 
९) घरात स्त्रीचा आदर होत असल्याने घर सदा हसते  खेळते व प्रसन्न राहील.
१०) घरांमध्ये लहान मुलांवर धम्माचे योग्य संस्कार असल्याने त्यांना जीवन जगण्याची कला लहानपणापासून अवगत होईल.
११) क्षुल्लक कारणावरून एकमेकांविषयी एकमेकांचे दूषित झालेले मन लवकर निर्मळ होईल. 
१२) भारत बौद्धमय होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळेल.

असे झाल्यानंतर आपणच कबूल करून की आता माझे घर खऱ्या अर्थाने बौद्धमय झाले आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २४ नोव्हेंबर १९५६ रोजी सारनाथ येथे दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी. आपण आपल्या कुटुंबासह दर रविवारी बुद्ध विहारात जाण्याची प्रथा सुरू करावी. इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी ती ही की, आपण जी कृती करतो ती लोक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असल्याने पहिल्या रविवारी लोक आपल्याला हसतील, तर उडवतील, याचा आपल्यावर काहीच परिणाम होणार नाही. कारण आपण आपले चित्त आधीच मजबूत केले असल्याने निंदा-स्तुती,लाभ-हानि, यश-अपयश, सुख-दुःख आठ प्रकारच्या लोकधर्माने ते मुळीच विचलित होत नसते. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गोष्टीचा विचार करण्यासाठी आपल्याजवळ वेळ तरी कुठे असतो? कारण आम्ही सत्य काम करीत आहोत. आम्ही योग्य काम करीत आहोत. आम्ही विधायक काम करीत आहोत. त्यामुळे आमची निंदा करणारे, किल्ला उडवणारे, पाहून हसणारे एक दिवस खजिल होतील. कारण असत्य हे सत्यापुढे जास्त दिवस टिकत नसते. ते लोक सुद्धा विचार करतील की, जेव्हा पासून हे कुटुंब सन्मार्गावर आरुढ झालेले आहे, तेव्हापासून ते सुखी समाधानी आणि आनंदी आहेत. त्यांच्या घरातून कधी वाद, भांडण-तंटा कधीच ऐकायला मिळाला नाही. त्यांच्या घरादारात पाऊल टाकले की, कसे प्रसन्न वाटते. त्यांची सर्वच कामे सुरळीत आणि सहज होत आहेत. ते कुटुंब उन्नतीकडे मोठ्या उमेदीने पुढे सरकत आहे, आणि आपण जिथल्या तिथेच आहोत. असा विचार एक दिवस निश्चितच त्यांच्या मनात येईल आणि मग नकळत आपल्या मागे त्यांची पावले बुद्धविहाराची वाट धरतील.  What is Buddhism?

जो बुद्ध, धम्म, संघाला काया वाचा आणि मनाने शरण जाऊन बुध्दाच्या शिकवणीनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करतो. जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा आपली आचार संहिता मानून त्यानुसार आचरण करतो. ज्याला पंचशील, अष्टशील, बुद्धपूजा मुखपाठ आहेत, ज्याला पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या, अशोका विजयादशमी आणि १४ एप्रिल हे बौद्धांचे ६ सण माहित आहेत. जो महिन्याचे चार उपोसथ करतो. आणि जो आपल्या घरात जन्मापासून पुण्यानुमोदन पर्यंतचे १० संस्कार रुजवुन बौद्ध संस्कृतीनुसार करतो. तोच खरा बौद्ध होय. नव्हे तर हीच बौद्धांची खरी व्याख्या आहे. त्यालाच श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक असेही म्हणतात. हे सुद्धा त्यांना समजेल आणि पाहता पाहता एक दिवस बुद्धविहार माणसांनी तुडुंब भरून जाईल. समाज बौद्धमय होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करील. तेव्हा त्याचा परिणाम इतर जाती-धर्माच्या लोकांवर निश्चित होईल. ते सुद्धा बौद्ध धर्मीयांचे अनुकरण करतील आणि सुखी जीवन जगतील. खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय होण्याच्या दिशेने झपाट्याने चालू लागेल, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा सत्यात उतरेल. परंतु केंव्हा? जेव्हा मी स्वतः बौद्धमय होईल तेव्हाच?


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

sujay म्हणाले…
वंदामी भंन्तेजी,
खूप छान लेख आहे
साधू साधू साधू!