धर्मांतर नव्हे, स्व-धर्माचा स्वीकार! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धर्मांतर नव्हे, स्व-धर्माचा स्वीकार! - भन्ते अश्वजित

धर्मातर नव्हे, स्व-धर्माचा स्वीकार! - भन्ते अश्वजित

 Social24Network

आपण कोण आहोत हे आपल्याला माहित असते. आपलं नांव आपल्याला माहित असते, आपल्या आईबाबाचं नांव आपल्याला माहित असते. आईचे माहेर माहित असते. आईच्या वडिलांचे नाव माहित असते, बापाचं नाव माहित असते. आणि आजोबाचं सुद्धा माहित असते. काही जणांना आजोबाच्या बापाचं ही नांव माहित असते. आपण कोणत्या कुळात जन्माला आलो हे तर सर्वांना माहीत असते आणि ते माहित असणं प्रत्येकासाठी जरुरीचं आहे. कारण तो इतिहास आपल्या जन्माच्या गोतावळ्याची शिदोरी असते. तसंच आपल्या धर्माचंसुद्धा आहे. आपला धर्म कोणता? तो आपल्याला कोणी व कां दिला? हा धर्म पूर्वी अस्तित्वात होता काय? होता तर त्याचा ऱ्हास कसा झाला व कोणी केला? आणि आपल्या धर्माची आचारसंहिता काय आहे? याचा विचार जर आपण करीत बसलो तर पुढे पुढे आपण धर्मातर केले नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वधर्माचा स्विकार करून तो आपल्याला बहाल केला. हे सखोल विचारांती आपल्याला कळून येईल आणि ते सत्य सुद्धा आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दि. १५ ऑक्टोबर १९५६ रोजी म्हणजे धम्मदीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत दोन तास भाषण करतांना म्हणाले होते, "ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की, भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे भयंकर शत्रू होते आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्ध झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात, अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण सर्व वंशज आहोत. त्या नाग लोकांना खूप छळ सोसावा लागला, त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता. त्यांना तो महापुरुष गौतम बुद्धांच्या रूपात भेटला. भगवान बुद्धांचा उपदेश नागलोकांनी सर्व भारतभर पसरविला असे आपण नागलोक आहोत. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे, हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आणलेला नाही. हा मार्ग येथीलच आहे, भारतातीलच आहे. या देशामध्ये दोन हजार वर्षे बौद्ध धर्म होता.

 

खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाहीत याचीच आम्हाला खंत वाटते" असं बाबासाहेब म्हणाले होते. म्हणजेच आपण बौद्धधर्मीय नागवंशीय असून आपला धर्म हा बौद्ध धर्म होय हेच इथे स्पष्ट होते. मग बौद्धधर्मीय म्हणजे काय? त्याचे आचरण कसे असावयास पाहिजे? यापूर्वी या पृथ्वीतलावरील बौद्ध धर्मीय कसा वागला कसा जगला? याची सुद्धा पुरेपूर माहिती आपणास असावयास हवी. आम्ही आज जसं जगाते, वागतो आणि बोलतो हे बौद्धधर्माशी विसंगत आहे काय? याचा सुद्धा विचार होणे गरजेचे आहे. आपण जे जीवन जगतो ते जर बौद्ध धर्माशी निगडीत नसेल तर त्या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही. त्यासाठी आपल्याला मागे वळून पहावे लागेल. ज्यावेळी खऱ्या अर्थाने आपण आपल्या धर्माचा इतिहास चाळून पाहिला तर आपल्या असे लक्षात येईल की, ह्या भूमीवर जोपर्यंत बौद्ध धर्माचा प्रभाव होता तो काळ भारताच्या सर्वांगाने सुवर्णयुग म्हणून गणल्या गेला आणि भारताला 'सोने की चिडीया' म्हटल्या गेले ते त्याच काळात. भारताने त्या काळात सर्व क्षेत्रामध्ये प्रगतीची उंच शिखरे गाठली. त्यात प्रामुख्याने कला,साहित्य, शिक्षण, थोरामोठ्या विषयीची मर्यादापूर्वक आदर भावना, धर्मनिष्ठ यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.


 परंतू दुर्दैवाने ७ व्या शतकानंतर नानावीध कारणामुळे बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला. काही काळानंतर या भूमीवर बौद्ध धर्माचे अस्तित्वच उरले नव्हते. लोक बुद्धांचे नाव देखील विसरले. त्याचसोबत त्याकाळचे बौद्ध राजे, संत आणि कित्येक विद्वान की, ज्यांनी बौद्ध संस्कृतीला उत्तुंग शिखरावर बसविले होते ते सर्व काळाच्या आड गेले होते. त्यानंतर इंग्रज पुरातत्वज्ञ संशोधक आणि विद्वान मंडळींनी या भारताच्या कुशीत दडून बसलेल्या दगडमातीखालील बुद्ध संस्कृतीचे अवशेष प्रकाशात आणले आणि तेथून खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माला उजाळा देण्याचे कार्य सुरु झाले. श्रीलंकेतील बौद्ध यात्रेकरू अनागरिक धम्मपाल यांचे जसे भारतात आगमन झाले तशी त्या धम्मकार्याला गती प्राप्त झाली. अनागरिक धम्मपाल यांनी १८९१ मध्ये महाबोधी सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि भारतातील बौद्ध धर्मीयांना धम्मसागराची माहिती देण्यासाठी त्यांनी १८९२ पासून 'महाबोधि' नावाचे मुखपत्र प्रकाशित केले. हे कार्य सतत ४० वर्षे चालले आणि मग त्यांनी भारतातील बौद्ध तिर्थस्थळांना उजाळा देण्याच्या कार्याला अग्रक्रम देऊन ते कार्य प्रभावीपणे राबविले. अनागरिक धम्मपालांची अजरामर कृती म्हणजे भगवान बुद्धांच्या प्रथम प्रवचनाचे पवित्र ठिकाण 'सारनाथ' येथील 'मुलगंधकुटी' विहाराची निर्मिती होय. 

सन १९३१ मध्ये ते बुद्धविहार जगाच्या नकाशावर येऊन ते आकर्षक केंद्र बनले. त्या कालावधी नंतर धम्माचा गाडा ओढण्यासाठी धर्मानंद कोसंबी, बोधानंद, आनंद कौसल्यायन, राहूल सांस्कृतायन आणि जगदिश काश्यप या बुद्धपुत्रांनी स्वत:ला धम्मकार्यासाठी वाहून घेतले आणि आपल्यापरीने आणि बुद्धधम्माच्या समृद्ध परंपरेविषयी जनतेत मोठी जनजागृती केली. तद्नंतर ही धुरा वादळातील दिवा असलेल्या डॉ. बाबासाहब आंबेडकर यांनी आपल्या एकट्याच्या खांद्यावर घेऊन सर्व जग चकित होईलबअशी धम्मक्रांती केली. कोणताही वादविवाद, कोणती आपत्ती किंवा कोणत्याही संघर्षाशिवाय अन रक्ताचा एक थेंबही न सांडवता केलेली ही धम्मक्रांती सूर्य, तारे, अन् पृथ्वी असेपर्यंत अजरामर राहील. असा हा बौद्ध धर्माचा आणि या भुमीवरील सत्यधर्माचा इतिहास होय. हा इतिहास जो जो ह्या पृथ्वीवर बौद्धधर्मीय म्हणून वावरतो त्यास माहित असणे अत्यंत जरुरीचे आहे. जसे आपल्या बापाचे म्हणजे ज्याने जन्म दिला त्या बापाचे नाव आपणास माहित आहे. तसेच ज्या बापाने आपणास धम्म दिला त्या बापाचे नांव, त्यांचे कष्ट त्यांचे उपकार हे सुद्धा आपणास माहित पाहिजे, नव्हे तर ते म्हाहित करून घेणे आपले आद्यकर्तव्य आहे.

 

आपण चारचौघात उठतो, बसतो आणि चालतो, निर्भिडपणे वावरतो ही कमाई कुणाची आहे. कोणी आपल्याला उच्च स्थानावर नेऊन बसविलं याचा विचार प्रत्येक जो स्वत:ला बौद्धधर्मीय म्हणवून घेतो त्याने आपल्या बुद्धीने करावा. आपल्याला धर्म देण्या अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना किती यातना झाल्या असतील त्याचाही विचार करावा. १११ जाती ६१ पंथ आणि ११ धर्म यांचा अभ्यास करतांना त्यांनी आपल्या आयुष्यातील किती वेळ खर्च केला याचाही अभ्यास करावा. त्यांना त्याची काय गरज होती याचाही विचार करावा. दि. १५ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या धर्मातरीत बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले होते. त्यापूर्वी श्रीलंकेचे भिक्खू सद्धतिसांनी एक छोटसे भाषण केले होते. त्या भाषणात ते म्हणाले होते की, “या समारंभास काही जण कन्व्हर्शन (धर्मांतर) समारंभ म्हणतात. हे वर्णन तितकेसे आनंददायक वाटत नाही. खऱ्या अर्थाने पाहिले तर स्व-धर्मांतर आहे, स्वत:हून केलेले धर्मांतर आहे. धर्मांतर हा शब्द ज्या रूढ अर्थाने वापरला जातो, त्या अर्थाने त्यात आमिष असते, आणि परधर्मात गेल्याची भावना असते. आपल्या स्वधर्मामध्ये तसे नसून आपल्या देशाच्या पूर्वीच्या धर्मात आपण जात आहोत. भ. बुद्ध भारतात जन्मले, ह्या भूमिवर त्यांना सम्बोधि प्राप्त झाली आणि त्यांना निर्वाणही ह्या भूमीत प्राप्त झाले. तेव्हा भारतीय पुत्रांनी आपलाच स्वत:चा धर्म स्विकारला आहे. त्यांनी धर्मांतर केले नसून त्यांनी स्वधर्माचा स्विकार केला आहे असं म्हणावयास पाहिजे!"

Acceptance-of-self-religion,-not-conversion-Bhante-Ashwajit

भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!



टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

sujay म्हणाले…
वंदामी भंन्तेजी,
आपल्या लेखना मूळे सर्वांना बौद्ध धर्माचा खर्‍या ईतिहासाची माहिती मिळते. खूप छान लेख आहे.धन्यवाद