धम्माचे आचरण हीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धम्माचे आचरण हीच डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली - भन्ते अश्वजित

 Practice the Dhamma It will be a tribute to Babasaheb Ambedkar...

(फोटो सौजन्य - गुगल)


Social24Network
६ डिसेंबर अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अखिल भारतीय स्त्रियांचे उद्धारक, अखिल मानव जातीचे उपकारक, त्यागपुरुष, प्रज्ञासूर्य, धम्मधर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाप्रयाण दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साधारण व्यक्ती नव्हते. तर ते बोधिसत्व होते. बोधिसत्व म्हणजे बुद्धत्वाकडे वाटचाल करणारे सत्व. म्हणून त्यांना मृत्यू, कालवश, दिवंगत, कालकथित, कालातीत, स्मृतीशेष, पडद्याआड गेले हे शब्द लागू होत नाहीत. बोधिसत्व अरहंत नसल्यामुळे त्यांना निर्वाण शब्दसुद्धा लागू होत नाही. आणि सर्वात शेवटी ते सम्यक संबुद्ध नसल्यामुळे त्यांना महापरीनिर्वाण हा शब्दसुद्धा लागू होत नाही. तर ज्यांच्या चित्तातून राग, द्वेष आणि मोह क्षय झाला, निघून गेला, पूर्णपणे नष्ट झाला आहे त्याला निर्वाण म्हणतात. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे तर अरहंत पदाला निर्वाण असे म्हणतात. ही जिवंतपणाची अवस्था आहे. अरहंत जेव्हा शरीर त्यागतात त्या प्रक्रियेला परिनिर्वाण असे म्हणतात. ३२ लक्षणांनी आणि ८० व्यंजनांनी युक्त असलेल्या सम्यक सबुद्धांनी जर शरीर त्यागले तर त्याला महापरिनिर्वाण असे म्हणतात. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शरीर त्यागण्याच्या प्रक्रियेला यापुढे महाप्रयाणच म्हणावे. अशा महामानवाला आदरांजली वाहतांना आम्ही काय केले पाहिजे? या संदर्भाने हा लेख प्रपंच.

१३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या श्याम हॉटेलमधील रूम नंबर ५ मध्ये पत्रकार परिषद झाली. त्या परिषदेमध्ये अनेक पत्रकारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वेगवेगळे प्रश्न विचारले. बाबासाहेबांनी सर्वांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली. त्यातील एका पत्रकाराने विचारले की, "तुम्ही उद्या महार लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहात. पण हा दीक्षित बौद्ध कसा ओळखू येईल? किंवा त्याची ओळख काय असेल?" तो पत्रकार पुढे म्हणाला की, "दाढी आणि टोपी घातलेला असेल तर, तो मुसलमान बांधव म्हणून ओळखला जातो. गळ्यात क्रॉस असेल तर तो ख्रिश्चन म्हणून ओळखला जातो. गळ्यात माळा डोक्याला गंध असेल तर तो हिंदू म्हणून समजल्या जातो. दाढी अन डोक्याला फेटा असेल तर तो शिख म्हणून ओळखला जातो. तसा उद्याचा बौद्ध कसा ओळखू येईल?" त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पत्रकाराला पत्रकाराला ठामपणे, छातीठोकपणे व आत्मविश्वासाने सांगितले की, "माझा उद्याचा बौद्धधर्मीय त्याच्या आचरणावरून ओळखू येईल. कारण इतर लोकांपेक्षा त्याचे वागणे, त्याचे बसणे, त्याचे बोलणे, त्याचे चालणे, त्याचे जेवणे सर्वश्रेष्ठ दर्जाचे असेल. आणि विशेष म्हणजे तो शीलवान असेल, नीतिवान असेल आणि निर्व्यसनी असेल हेच माझ्या बौद्धधर्मियांची ओळख असेल!"
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ६४ वर्षा आधी हे त्या पत्रकाराला ठासून सांगितले होते. परंतु दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते शब्द, ती भविष्यवाणी खरी ठरविण्यात त्यांचा माणूस, यांचा समाज कमी पडला. असे त्याच्या वर्तनावरून आज तरी वाटत आहे. ६४ वर्षात त्याची जी धम्मीक प्रगती व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. याला मूळ कारण आहे की, आम्ही त्या बोधिसत्वाचे ऐकले नाही आणि म्हणून आज समाजाची अशी दुरावस्था आहे. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्धधर्मीय कसा अपेक्षित होता? पहिली गोष्ट म्हणजे तो जाणून बुजून हत्या करणारा नसावा. तो चोरी करणारा नसावा किंवा चोरीचे समर्थन करणारा नसावा. तो व्यभिचार करणारा नसावा. तो खोटे बोलणारा नसावा आणि तो दारु पिणारा नसावा. त्यानंतर तो पहाटे झोपेतून उठणारा असावा. सूर्योदयापूर्वी आंघोळ करणारा असावा. घरामध्ये त्रिशरण पंचशील दररोज ग्रहण करणारा असावा. महिन्यातील प्रत्येक पौर्णिमा, प्रत्येक अष्टमी आणि प्रत्येक अमावास्येचा आदला दिवस असे तो चारही उपस्थित करणारा असावा. उपोसथानिमित्त घेतलेल्या अष्टशीलाचे त्यादिवशी तो काटेकोरपणे पालन करणारा असावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याच्या चालणे श्रेष्ठ दर्जाचे असेल. तर बौद्धांनी रस्त्याने कसे चालले पाहिजे?

१) रस्त्याने चालतांना त्याची पाठ आणि मान सरळ रेषेत असली पाहिजे. 
२) त्याची छाती समोर असली पाहिजे.
३) चालतांना डावा पाय पुढे गेला तर उजवा हात पुढे गेला पाहिजे. उजवा पाय पुढे गेला तर डावा हात पुढे गेला पाहिजे.
४) बौद्धाने रस्त्याने पाय आपटत आपटत  चालू नये.
५) रस्त्याने चालतांना लक्ष चोहिकडे असू द्यावे पण  भामट्यासारखे इकडेतिकडे पाहत चालू नये.
६) चालतांना नेहमी नेहमी मागे वळून पुढे चालू नये. 
७) चालतांना समोरच्या व्यक्तीचा किव्हा वाहनाचा अंदाज घेऊन स्वतःला तसे वळवावे.
८) चालतांना सावध असावे. असे चालतांना पाहूनच इतरांनी म्हटले पाहिजे. पहा किती शिस्तबद्ध चालतो आहे तो नक्कीच बौद्धधर्मीय असला पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याचे जेवण करणे उच्च दर्जाचे असेल. तर मग बौद्धाने जेवण करतांना ते कसे केले पाहिजे.
१) अन्नाला सत्कार पूर्व ग्रहण केले पाहिजे.
२) लागेल तेवढेच अन्न आपल्या ताटात घ्यावे.
३) आपल्या ताटावर लक्ष ठेवून जेवण करावे.
४) जेवतांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच दाढेत अन्न चावून खावे.
५) जेवतांना मोठा घास घेऊ नये.
६) जेवतांना बोलू नये.
७) घास तोंडाजवळ आणण्यापूर्वी  तोंड उघडू नये.
८) जेवतांना घास तोडून तोडून खाऊ नये.
९) हात झटकत झटकत जेवू नये.
१०) गाल फुगवून फुगवून जेवू नये.
११) जेवतांना ताटाबाहेर अन्न सांडवू नये.
१२) जीभ चटचट करीत जेवू नये.
१३) सुरू सुरू करित जेवू नये.
१४) हात चाटून चाटून जेवू नये.
१५) जेवणातील कोणतेही भांडे जिभेने चाटु नये.
१६)  उष्ट्या हाताने पाण्याचे भांडे घेऊ नये. 
१७) जेवतांना डावा हात अन्नाला लागू देऊ नये.
१८) अन्न चावून चावून खावे.
१९) जेवणानंतर ताटात उष्टे अन्न सोडू नये.
२०) जेवल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी ते अन्न पिकविले त्यांचे प्रती मंगल मैत्री करण्यास विसरू नये. म्हणजेस त्यास धन्यवाद द्यावेत. बौद्ध माणूस कितीही लोकांत जेवायला बसला तरी अशा पद्धतीच्या उच्च दर्जाच्या प्रतीचे जेवण पाहून कोणीही म्हणेल तो बौद्धधर्मीय आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याचे बोलणेही उच्च दर्जाचे असेल. म्हणजे बौद्धांनी कसे बोलले पाहिजे.
१) कोणाची निंदा न करणे. 
२) कुणाची चुकली न करणे.
३) व्यर्थ बडबड न करणे.
४) कुणाचे मन दु:खी होईल असे न बोलणे.
५) जाणून-बुजून खोटे न बोलणे. म्हणजे लोकांनी म्हटले पाहिजे की, तो सत्यवादी आहे अर्थात बौद्धधर्मीय आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, " बौद्धधर्मीय निर्व्यसनी असेल!" याचा अर्थ असा की तो कोणत्याही प्रकारचे धूम्रपान करणार नाही, तंबाखू सेवन करणार नाही आणि कोणत्याही प्रकारची दारू पिणार नाही किंवा सुपारी सुद्धा खात. नाही असा व्यक्ती जर असेल तर तो बौद्धधर्मियच आहे असे लोकांनी म्हटले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना असा बौद्धधर्मीय माणूस आणि बौद्धधर्मीय समाज अपेक्षित होता. तसे बनण्याचा प्रत्येकाने आजपासून प्रयत्न करावा. म्हणजे तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिल्यासारखे होईल!
          

भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Unknown म्हणाले…
आज पर्यन्त आशा प्रकारची सविस्तर शिकव देणारा लेख कधी वाचनात आलेला नाही. जो वाचेल तो निश्चितच खर्‍या अर्थाने बौद्ध होण्याचा प्रयत्न करेल.
साधू साधू साधू !