उद्याचा चांगला समाज घडवायचा असेल तर, आजच धम्मसंस्कार वर्ग सुरू करा!

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उद्याचा चांगला समाज घडवायचा असेल तर, आजच धम्मसंस्कार वर्ग सुरू करा!

उद्याचा चांगला समाज घडवायचा असेल तर, आजच धम्मसंस्कार वर्ग सुरू करा!

If you want to build a better society tomorrow, start Dhammasanskar classes today!



Social24Network

बौद्ध समाजातील उमलती पिढी आणि युवक-युवती वर्गाला धम्माबाबत पाहिजे तेवढी माहिती नसल्याचे ग्रामीण व शहरी भागातून प्रत्यक्षात दिसून येत आहे. समाजासाठी यापेक्षा दुसरी मोठी अशी शोकांतिका असू शकेल, असे वाटत नाही. इकडे-तिकडे हुंदडणे, प्रमाणाबाहेर टीव्ही पाहणे, सतत मोबाईलशी खेळत राहणे, मिळेल त्या जागेवर क्रिकेट खेळत राहणे, फेसबुक, इंटरनेटवर गप्पा मारत राहणे, यापलीकडे आपली दुनिया नाहीच. असाच त्यांचा समज झाल्याने आपसुकच ते धम्माच्या प्रवाहापासून वेगळे होत आहेत. आईवडिलांच्या आज्ञेपासून दूर जात आहेत. समाजातील वयोवृद्धांशी त्यांची वर्तणूक बदलेली आहे. कठोर बोलणे, उद्धट बोलणे त्यांनी अंगवळणी पाडल्याने ते मुले या संज्ञेला अपात्र ठरत आहेत. गुरुजनांच्या शिकवणीकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी स्वत:ची अवस्था कटलेल्या पतंगाप्रमाणे करून घेतलेली आहे. दिवसेंदिवस तरुणांमध्ये वाढत चाललेले दारूचे व्यसन समाजमनाला सुन्न करीत आहे. बेफिकीरीच्या पाळण्यात आळसाचे झोके घेत असलेल्या युवा पिढीकडे पाहिल्यावर भावी समाजाचे चित्र अधिक धुसर दिसत आहे. 

कोणत्याही गावात भिक्खू आपल्या प्रवचनातून सांगतात की, मातापित्यांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत. प्रबोधनकार आपल्या भाषणातून तेच सांगतात. लेखक मंडळी आपल्या लेखांमधून संस्कारावरच प्रकाश टाकतात. गायन पाट्यांतील गायक मंडळीसुद्धा आपल्या गायनातून तेच गातात. पुढारी किंवा नेते मात्र चुकूनही सांगत नाहीत. याबाबत खोलात जाऊन सविस्तर अशी माहिती कोणीच देत नाहीत. प्रत्येक बौद्ध वस्तीत मग तो ग्रामीण भाग असो की शहरी भाग असो. समाजातील भरकटत चाललेल्या अशा अवस्थेवर चिंतीत होणारे काही लोक असतातच. यात काही वरकरणी असतात आणि एक-दोघेच खरे असतात. अत:करणापासून समाजाची चिंता वाहतात. अशा एक दोन लोकांनीच पुढे होऊन एकत्र आले पाहिजे. आपल्या गावातील बुद्ध विहारांतून किंवा समाजमंदिरातून धम्मसंस्कार वर्ग सुरू करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करून त्या प्रक्रियेला खालीलप्रमाणे सुरुवात केली पाहिजे. सर्वप्रथम एक नवीन रजिस्टर विकत आणावे. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण वस्तीत फिरून प्रत्येक घरातील मुला-मुलींच्या नावाची यादी करावी. म्हणजेच आपल्या वस्तीत एकूण किती विद्यार्थी आहेत, अन ते कोणाकोणत्या वर्गात आहेत, ते कळेल. पहिल्या दिवशी गावातील सर्व विद्यार्थ्यांच्या मातापित्यांना बोलवावे. आपण बोलाविलेले सर्व लोक रात्रीच्या समयी बुद्धविहारात येतीलच अशी अपेक्षा करू नये. सर्व लोक जमा झाल्यानंतर सर्वप्रथम सर्वांनी सामुदायिक त्रिशरण, पंचशील ग्रहण करावे. त्यानंतर समाजामध्ये ज्याचे वजन आहे. ज्याचे लोक ऐकतात, त्या व्यक्तीला उभे करून त्याने उपस्थितांना विचारावे की, आपण सर्व लोक बौद्ध धम्माचा स्वीकार करून ६४ वर्षांचे झालो आहोत. मग त्या ६४ वर्षांच्या मानाने आपली धम्मिक प्रगती झाली आहे का? अर्थातच नाही. आमच्यातील काही उपस्थितांना त्रिशरण, पंचशील बरोबर येत नाही. मग बुद्ध पुजा, त्रिशरण, वंदना आम्हाला काय माहित असणार? २२ प्रतिज्ञा बौद्धांचे संस्कार, बौद्धांचे सण ही तर कोसो दूरची बात आहे. म्हणजे आम्ही जे काही इथे बसलो व स्वत:ला बुद्ध धम्मीय म्हणवून घेतो. ते केवळ सांगण्यासाठी, सवलतींसाठी आणि योजना घेण्यासाठीच म्हणजे दुसऱ्या अर्थाने आमचे आयुष्य वाया गेले. मग आमच्याबरोबर आमच्या मुलांचे सुध्दा आयुष्य वाया घालवायचे का? आणि तसा आम्हाला काय अधिकार आहे? असे सांगून त्यांनी आपली योजना सांगावी. सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या सर्व लोकांच्या सहकार्याने आपण संध्याकाळी ६ ते ७ या वेळात एक तास इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी धम्म संस्कार वर्ग सुरू करणार आहोत. म्हणून सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. असे सांगतांना या धम्मसंस्कार वर्गाच्या एक तासाने तुमच्या मुलाचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही. उलट धम्म संस्काराने शिक्षणाच्या कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहील. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, " जो विद्यार्थी धम्मअभ्यासात पारंगत आहे  तो विद्यार्थी शालेय अभ्यासात  अग्रेसर असतोच!" आणि त्या एक तासाने तुमचे घरगुती कोणतेही घरगुती काम अडणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांना हे सांगावे की तुम्ही तुमच्या मुलाला साहेब, अधिकारी, डॉक्टर, इंजिनीअर, वकील होण्यासाठी ज्या पद्धतीने शाळेत पाठवता अगदी तशाच पद्धतीने त्याला शीलवान, नीतिवान, गुणवान होण्यासाठी आणि खास करून माणूस होण्यासाठी धम्म संस्कार वर्गात पाठविले पाहिजेत. असे सांगून धम्मसंस्कार वर्ग सुरू करण्यासंदर्भातील लोकांची मानसिकता बनल्यानंतर ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतर गावातील अभ्यासू व्यक्तीचा त्या बैठकीत शोध घ्यावा.तो सेवानिवृत्त शिक्षक असेल, तर अधिक चांगले किंवा धम्माचा अभ्यास असणारा एखादा शीलवान उपासक निवडावा.(अशी व्यक्ती प्रत्येक गावात हमखास असतेच.) मग त्या सभेत त्या व्यक्तीवर धम्म संस्कार वर्गाची जबाबदारी टाकावी. त्या शिक्षकाने मग दुसऱ्या दिवसापासून गावातील बुद्धविहारात सायंकाळी सहा ते सात या वेळेत धम्म संस्कार वर्ग सुरू करावा.गुरूदक्षिणा म्हणुन प्रत्येक विद्यार्थ्याकडून एक रुपया रोज या प्रमाणे महिन्याचे तीस रुपये फी घ्यावी. त त्यातुन हजेरीपट, अगरबत्ती, मेणबत्ती, फुले, ब्लॅक बोर्ड, खडू आणि विहारात झाडण्यासाठी नवीन केरसुणीने इत्यादी साहित्य खरेदी करावे. आणि जे शिक्षक धम्म संस्कार वर्गाला शिकविणार आहेत त्यांना प्रतिमाह पाचशे रुपये मानधन द्यावे. त्या शिक्षकाने विद्यार्थ्यांची  दररोज हजेरी घ्यावी. पहिल्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना अभिवादन शिकवावे. त्यानंतर त्रिशरण पंचशील कसे म्हणतात ते शिकवावे. विद्यार्थ्यांना धम्म संस्कार वर्गासाठी नवीन रजिस्टर घेऊन येण्यास सांगावे. त्यानंतर त्यांना पुष्पपूजा, धुपपूजा,गंध पूजा, प्रदीप पूजा, चेतीय पूजा, बोधीपूजा, बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, रतनत्तय वंदना, संकल्प, काया वाचा मन पूजा, धम्मपालन गाथा, भीमस्मरण, भीमस्तुती क्रमाक्रमाने शिकवावी. हे शिकविणे झाल्यानंतर त्यांना थोडा थोडा बुद्ध धम्माचा इतिहास शिकवावा. आणि वर्ग संपण्याआधी त्यांना तीन प्रश्न 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथातील विचारावेत दुसऱ्या दिवशी जे विद्यार्थी त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देतील, त्या प्रत्येकाला १० रुपयांचे बक्षीस दयावे. आणि सर्वात शेवटी मंगल मैत्री, प्रतिज्ञा आणि सरणात्तय गाथा म्हणून वर्ग संपवावा. मुलांना रांगेत येण्याजाण्याची शिस्त लावावी. वर्ग संपल्यानंतर मुलांना बिस्कीट किंवा चॉकलेटचे वाटप करावे. असे केल्याने विद्यार्थ्यांना धम्म संस्कार वर्गात येण्याची गोडी निर्माण होईल आणि धम्माबाबत नवनवीन माहिती होत असल्याने त्यांच्यात शिकण्याची जिज्ञासा निर्माण होईल. 

घरी गेल्यानंतर विद्यार्थी टीव्ही न पाहता मोबाईलशी न खेळता सरळ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाजवळ जातील, आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे शोधतील. धम्मसंस्कार वर्गामध्ये दररोज संघायनाने फक्त १९ दिवसांतच त्यांची संपूर्ण वंदना मुखपाठ होते, असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. एकदा त्यांच्या वंदना पाठ झाली की, मग त्यांना बुद्ध धम्म संघाला नियमित अभिवादन केल्याने होणारे ४ लाभ सांगावे. पहाटे दररोज झोपेतून उठल्याने होणारे ५ लाभ सांगावे. पंचशीलाचे काटेकोरपणे पालन केल्याने होणारे ७ लाभ सांगावेत. मैत्री भावना अंत:करणापासून जोपासल्याने होणारे ११ लाभ शिकवावेत आणि नियमित बुद्धविहारात येत राहिल्याने होणारे ३२ लाभ कोणते त्याची माहिती द्यावी. त्याचबरोबर त्यांना शिकविलेल्या पाली वंदनेचा मराठी अर्थ शिकवावा. धम्म शिक्षण सुरू असतांना बहुजनांच्या हितासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपले आयुष्य पणाला लावले. त्या त्या थोर विभूतींच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त वर्तृत्व स्पर्धा ठेवावी आणि जे विद्यार्थी चांगले भाषण करतील, त्यांना योग्य बक्षीसे द्यावीत. असे केल्याने त्यांच्यातील वक्तृत्व कला विकसीत होईल. विद्यार्थ्यांना बौद्धांचे सहा सण कोणते ते सविस्तर सांगावे. महिन्यातील चार उपोसथांची माहिती देऊन ते त्यांच्याकडून करून घ्यावेत. मी आतापर्यंत चालविलेल्या ठिकठिकाणच्या धम्म संस्कार वर्गाच्या माध्यमातून मला असे दिसून आले की, मुलांपेक्षा मुली अधिक पुढे असून त्या मुलांपेक्षा लवकर शिकतात.विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना अजून लिहिता-वाचताही येत नाही त्या लहान मुलांची संपूर्ण वंदना मोठ्या मुलांच्या आधी पाठ झाली आहे. कारण ते दिवसभर एकत्र आले की, त्यांचे वंदना म्हणणे सुरूच असते. धम्म संस्कार वर्गाला तीन महिने झाल्यानंतर त्यांची परीक्षा घ्यावी. ज्या विद्यार्थ्याने धम्म संस्कार वर्गात शिकवल्या गेलेली माहिती पूर्णपणे लिहिली आहे.त्याची वही घेऊन त्यातूनच प्रश्नपत्रिका काढाव्या. परीक्षेसाठी सरळसरळ तीन गट पाडावे. इयत्ता ४थी ते ६ वी हा पहिला अ गट, इयत्ता ७ वी ते १० वी. हा दुसरा ब गट आणि तिसरा क गट, पुरुष व महिला वर्गासाठी खुला ठेवाचा. तिन्ही गटासाठी प्रथम बक्षीस १००० रुपये, द्वितीय बक्षीस ७०० रुपये, तृतीय बक्षीस ५०० रुपये, चौथे बक्षीस ४०० रुपये, पाचवे बक्षीस ३०० रुपये आणि १००रुपयाचे पाच उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवावीत. म्हणजे ही सर्व रक्कम १०,२०० रुपये इतकी होईल. यासाठी समाजातील अधिकारी वर्ग, नोकर वर्ग, व्यापारी वर्ग आणि सधन वर्गाचा शोध घेऊन ती रक्कम १५ दिवस आधीच जमा करावी. अशा कामासाठी मोठ्या उत्साहाने पुढे येतात. कारण मुले त्यांचीच असतात. 

ज्या दिवशी धम्मसंस्कार वर्गाचा समारोप होईल, त्या दिवशी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करावा. अशा कार्यक्रमांतून फक्त विद्याथ्यांचीच भाषणे व्हावीत म्हणजे उपस्थितांमध्ये धम्म संस्काराबाबत एक चांगला संदेश जाईल आणि येणाऱ्या वर्षात धम्म संस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून वर्षावासाच्या कालावधीत धम्म ग्रंथाचे पठण व श्रवण होईल.असे केल्यानेच उदयाचा चांगला समाज घडेल यात तिळमात्रही शंका नाही. हा लेख वाचून कुणाला जर असं वाटलं की, आपल्या बुद्धविहारातुन धम्मसंस्कार वर्ग सुरू केला पाहिजे. तर मी त्यासाठी कुठेही यायला तयार आहे. आपण मला 9673292297 किंवा 8329216637 या क्रमांकावर  संपर्क करू शकता.
सर्वांचे मंगल होवो!
          

भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या