पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियाम

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियाम

 Panatipata Vermani Sikhapadam Samadiyami

photo credit google


Social24Network

बौद्ध धम्मामध्ये सर्वात महत्वाची सर्वात पवित्र आणि तात्काळ फळ देणारी कोणती गाथा असेल तर ती म्हणजे त्रिसरण पंचशील होय.  यालाच बौद्ध धम्माचे द्वार सुद्धा म्हटले आहे. पंचशील अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी, उन्नतीसाठी आणि रक्षणासाठी आहे. मग तो माणूस कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही सांप्रदायाचा असो, कोणतीही भाषा बोलणारा असो किंवा कोणत्याही वर्णाचा असो! त्याने जर काया, वाचा, मनाने पंचशीलाचे पालन केले तर तो खरा माणूस म्हणून मानवी जीवनाला न्याय देणारा असेल. विशेष म्हणजे तोच माणूस आपल्या जीवनाचे सार्थक करू शकतो.

या पवित्र अशा पंचशीलातील पहिली गाथा आपण आज विस्ताराने पाहू. ती म्हणजे पाणातीपाता वेरमणी सिख्खापदं समादियामी! पाणा म्हणजे प्राणी, तिपाता म्हणजे घात करणे, मारून टाकणे, खलास करणे, वेरमणी म्हणजे न रमणे. सिक्खापदं म्हणजे शिक्षापद, समादियामी म्हणजे ग्रहण करणे, स्वीकारणे, अंगीकारणे या मराठी वाक्याचा सरळ अर्थ पहिला तर ते असे होईल; की मी प्राणी हत्या करण्यात रमणार नाही असे शिक्षापद ग्रहण करतो. म्हणजेच मी कोणत्याही प्राण्यांची हत्या करणार नाही. उलट मी त्यांच्यावर मैत्री करीन, दया करीन. मग तो प्राणी दोन पायाचा असो, चार पायाचा असो, सहा पायाचा असो, असंख्य पायाचा असो, बिन पायाचा असो, पाण्यात पोहणारा असो, आकाशात उडणारा असो, सूक्ष्म असो किंवा अतिसूक्ष्म असो सगळे प्राणी माझे मित्र आहेत. त्यांचेशी माझी मैत्री आहे. कारण सर्वाना जगावे वाटते, सर्वांचे रक्त लाल आहे, सर्वाना भावना आहेत, सर्वांना सुख हवे आहे आणि सर्वांना माझ्यासारखाच जीव सुद्धा आहे. म्हणून कोणीही प्राणी माझा शत्रु नाही आणि मी सुद्धा कुणाचा शत्रू नाही. म्हणून तोही जगला पाहिजे आणि मीही जगलो पाहिजे. अशी प्रत्येक प्राण्यांविषयी माझ्या मनात मैत्रीची भावना आहे. तथागत बुद्धांनी हिंसा कशाला म्हटले आहे; तर

१) प्राणी जीवंत असला पाहिजे.
२) तो प्राणी आहे याचे ज्ञान असले पाहिजे.
३) त्या प्राण्याला मारणे हा मनात हेतू असला पाहिजे.
४) त्या प्राण्याला मारण्याच्या हेतूने तशी कृती केली पाहिजे.
५) अशा कृतीमुळे त्या प्राण्यांचा मृत्यू झाला पाहिजे.
या पाच अटी पूर्ण झाल्या तरच माणसाकडून हिंसा झाली असे समजावे. 

प्राणी हत्या अर्थात जीवहिंसा लोक कशामुळे करतात? तर यासाठी तथागतांनी आठ कारणे सांगितली आहेत.
१) रागयुक्त माणूस रागामुळे हत्या करतो.
२) द्वेषयुक्त माणूस द्वेषामुळे हत्या करतो.
३) अतिमोहात गुंतल्यामुळे माणूस हत्या करतो.
४) घमेंडी माणूस आपल्या दुष्ट स्वभावामुळे हत्या करतो.
५) लोभी माणूस लोभामुळे हत्या करतो.
६) निर्धन आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी हत्या करतो.
७) मूर्ख माणूस केवळ आपला खेळ समजून हत्या करतो.
८) राजा दंड देण्यासाठी हिंसा करतो.

तथागत म्हणतात,"वरीलपैकी कोणत्याही कारणाने झालेली हिंसा ही हत्याच होय. म्हणजेच ते पापकर्म होय आणि त्या पापकर्माचे फळ याचजन्मी भोगावे लागते!" त्याचप्रमाणे तथागतांनी ही कायेची पापकर्मे सांगून वाणीने सुद्धा हे पापकर्म होतात. जसे, एखाद्याची प्रत्यक्ष हत्या न करता आपल्या वाणीने तसे बोलून दाखविणे. उदा. मी तुला मारून टाकीन, मी तुझा खून करीन, मी तुझी हत्या करीन असे बोलून दाखविणे म्हणजेच ती सुद्धा आपल्या वाणीतून हत्या झाली. त्याचप्रमाणे जर एखाद्याने न बोलता मनातून असे म्हटले की, हा हाती सापडला पाहिजे याचा फडशाच पडतो, किंव्हा माझ्यात तर तेवढे बळ नाही पण दुसऱ्याला सांगून याचा काटाच काढतो.असे मनातून जरी म्हटले तरी ती मनाने हत्याच झाली असे तथागत म्हणतात. म्हणून काया वाचा आणि मनाने मी प्राणी हत्या करणार नाही. असाच अर्थ पाणातीपाता वेरमणी सिकखापदं समादियामी! या गाथेचा आहे.

वरील एकाच गाथेचे काया, वाचा, मनाने जो इमाने इतबारे पालन करतो त्याला खालील सात प्रकारचे लाभ होतात हे सुद्धा तथागत बुद्धांनी सांगितले आहे.
१) अशा व्यक्तीला परिपूर्ण शरीर लाभते. म्हणजेच त्याच्या शरीराला कुठल्याच प्रकारचे व्यंग नसते.
२) अशा व्यक्तीला निसर्गदत्त कार्यक्षमता लाभते.
३) अशा व्यक्तीचा कोणीही शत्रू नसतो.
४) असा व्यक्ती कधीच बेचैन नसतो.
५) भय,भीती,धास्ती या गोष्टी अशा व्यक्तीच्या आसपासही थांबत नसतात.
६) असा व्यक्ती कुठेही निभयपणे वावरतो.
७) अशा व्यक्तीला सुखाने झोप लागते व तो सुखपूर्वक उठतो. त्याला झोपेत वाईट स्वप्न पडत नाहीत.

अशा प्रकारे या एकाच गाथेचे काया, वाचा, मनाने पालन केल्यास इतक्या प्रचंड प्रमाणात लाभ होतात. जर त्याने तथागतांच्या पंचशीलाचे काटेकोरपणे पालन केले तर त्याला ४२ प्रकारचे लाभ होतात. म्हणून प्रत्येक माणसाने माणूस म्हणून जगत असतांना पंचशीलाचे पालन करून आपले मानवी जीवन सार्थकी लावावे. हाच बौद्धजीवन मार्ग आहे.

सर्वांचे मंगल होवो!
          

भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

sujay म्हणाले…
वंदामी भंतेजी,
साधू साधू साधू!