मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि! - भन्ते अश्वजित

Musavada Vermani Sikkapadam Samadiyami!

Musavada Vermani Sikkapadam Samadiyami!


Social24Network

बुद्ध धम्मातील सर्वात महान, सर्वात पवित्र आणि तत्काळ फळ देणारी कोणती गाथा असेल तर ती म्हणजे त्रिशरण पंचशील होय. या पंचशीलातील चवथी गाथा म्हणजे 'मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि' या गाथेचा मराठी अर्थ असा आहे. मुसा= खोटे, वादा=वदणे, बोलणे (यामध्ये निरर्थक बडबड करणे, कुणाची निंदा करणे, चुगली चहाडी करणे, कुणाचे मन दुःखी होईल असा शब्दप्रयोग करणे आणि जाणिवपूर्वक खोटे बोलणे याचा समावेश होतो.) वेरमणी=न रमणे,अलिप्त राहणे, सिक्खा-शिक्षा, पद-पद, समादि यामि=मी स्वीकारतो,अनुसरतो किंवा ग्रहण करतो. याचे सरळ वाक्य बनविले तर 'मी खोटे बोलण्यात न रमण्याचे शिक्षापद ग्रहण करतो' असा अर्थ होतो. म्हणजेच पंचशीलातील चवथ्या शीलाचे काटेकोरपणे पालन करायचे असेल तर आपल्या मनावर आणि जिभेवर माणसाला किती नियंत्रण ठेवावे लागेल. हे वरील अर्थावरून लक्षात येते. 


या जगामध्ये आपल्याला मिळालेल्या माणूस या जन्माचे सार्थक माणसाला करायचे असेल तर या शीलाचे पालन त्याने इमाने इतबारे करून जगलेच पाहिजे. तरच तो माणूस या संज्ञेला पात्र राहील. तो खालील सात प्रकारच्या लाभाचा धनीसुद्धा होईल. 

१) अशा व्यक्तीला निसर्गदत्त कार्यक्षमता लाभते.

२) अशा व्यक्तीच्या उच्चारण व भाषेत स्पष्टता असते.

३) जे उपयोगाचे आहे तेच तो बोलतो.

४) अशी व्यक्ती कधीही बेचैन नसते.

५) त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर खरेपणा स्पष्टपणे झळकून चेहरा नेहमी प्रफुल्लीत असतो.

६) अशा व्यक्तीच्या शब्दाला घरादारात, समाजात, नातेवाईकात, मित्रमंडळीत आणि सार्वजनिक ठिकाणी किंमत असते.

७) नेहमी सत्य बोलत असल्याने त्याला मऊ आणि लवचिक जीभ प्राप्त होते.



म्हणून माणसाने नेहमी सत्यवादी असले पाहिजे. राहुलला उद्देशून राजगृहाच्या वेळूवनात तथागत बुद्धांनी जो उपदेश दिला तो या संदर्भात फारच महत्त्वाचा आहे. बुद्ध म्हणाले, "जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही. त्यांने शक्य असलेले कोणतेही पापकर्म बाकी ठेवलेले नाही, असे मी म्हणतो. म्हणून राहुल! तू अशी शिस्त लावून घे की, थट्टेतसुद्धा खोटे बोलले जाणार नाही. तसेच प्रत्येक गोष्ट करतांना व प्रत्येक शब्द बोलतांना व प्रत्येक विचार मनात आणतांना तू पुन्हा चिंतन कर. तुला एखादी गोष्ट करावयाची असेल, तेव्हा तू नीट विचार कर की, ती करण्याने तुला, इतरांना किंवा दोघांनाही अपाय होतील काय? आणि म्हणून ती दु:खोत्पादक किंवा दुःखपरिणत आहेत काय? विचारांती जर तुला वाटले की, ती तशीच आहेत तर ती करू नकोस. पण जर तुझी खात्री पटली की, तिच्यात अपाय नसून हिताचं आहे तर ती तू करावी."(भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म पान नं. ४०४)



एकदा तथागत बुद्धांनी दुराचरण म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर देतांना फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात की, "याचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. यामध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देतांना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहित नाही, जे पाहिले नाही ते पाहिले आहे, जे पाहिले आहे ते पाहिले नाही, अशा त-हेची स्वार्थासाठी अथवा अल्प लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणूनबुजून साक्ष देतो." अशा प्रकारच्या घटना शासकीय कार्यालयातून, दिवाणी फौजदारी न्यायालयातून, पोलीस स्टेशनमधून आपल्याला सहज ऐकायला मिळतात. आपल्या हे सुद्धा ऐकण्यात येते की, ज्यावेळी सत्य समोर येते, त्यावेळी मात्र खोटे बोलणाराची अथवा खोटी साक्ष देणाराची काय फजिती होते. काही खोट्या साक्षी त्यांच्या जीवावर उठल्याचेही दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणाने ग्रासलेला मनुष्य, माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी पडलेल्या गोष्टी तिथे सांगत असतो. असा मनुष्य माणसा-माणसातील ऐक्य मोडणारा, कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. कलागती हे त्याचे सुख आणि आनंद असतो.

परंतु त्याच्या अशा स्वभावाने समाजाचे किती नुकसान होते. याच्याशी त्याला काही घेणे देणे नसते. म्हणून आज समाजाची काय अवस्था आहे. सद्धम्माचे पालन नाही. विहारात येण्यासाठी कुणाला वेळ नाही. बापलेकात मेळ नाही, भावाभावात पटत नाही, सून सासूचे ऐकत नाही अन् सासूही आपल्या वजनाने राहत नाही, मायलेकीत जमत नाही, शेजाऱ्याशेजाऱ्यातून विस्तव जात नाही,लहान मुलावर संस्कार नाहीत आणि तरुण पिढी कुणाच्या बापाला दबत नाही. एवढ्या मोठया समाजाच्या काही वस्त्यांची अशी दिशाहीन अवस्था जर कुणी केली असेल तर ती कळलावी प्रवृत्ती होय. काही थोडेफार शिकलेल्यांना समाजातील संघर्ष समाजातच पेटत ठेवण्याची जशी कला अवगत झाली तशी त्यांच्या पोटापाण्याची सोय झाली. पण समाजाच्या दारिद्र्याची रेषा मात्र खाली आली.



तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या व्यक्तीची वाणी कडवट असते त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मर्मभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. त्यामुळे आज आपण पाहतो, ऐकतो किंवा वृत्तपत्रातून वाचतो, भांडणे, कलह तंटा, हाणामाऱ्या आणि खूनखराबा या घटना अशाच घडत असल्याची आपल्या लक्षात येते. चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडतांना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकारक बोलतो की नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही असतो आणि नितीही नसते. काही तरी शूद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुधा नाही शेंडा नाही अशी निरर्थक बडबड नेहमी करीत असतो. अशी व्यक्ती आपल्यावर सात प्रकारची नुकसान ओढवून घेते.

१) अश्या व्यक्तीच्या बोलण्यावर लोक (खरे की खोटे) या संभ्रमात राहतात आणि फार कमी विश्वास ठेवतात.

२) समाजात त्याची बडबड्या, लबाड अशा अर्थाने ख्याती पसरते.

३) त्याचेशी लोक सहसा बोलण्याचे टाळतात. कारण त्याच्याशी बोलले की, समोरच्या व्यक्तीचा एक तास फुकट जाईल अशी त्याला भिती वाटते.

४) अशा व्यक्तीला कोणी सल्ला विचारत नाही.

५)त्याच्याशी कुणी मैत्री करीत नाही.

६) अशा व्यक्तीला समाजात मान नसतो.

७) अशा व्यक्तीच्या शब्दाला घरादारात, नातेवाईकांत व मित्रमंडळीत किंमत नसते.



म्हणून माणसाने या जगामध्ये जगताना आपल्या जिभेवर साखर ठेवून कुणाशीही बोलताना गोड बोलले पाहिजे. मधूर बोलले पाहिजे. सत्य बोलले पाहिजे. स्पष्ट बोलले पाहिजे. संयमित बोलले पाहिजे. बोलण्याआधी विचार करून बोलले पाहिजे. अशाच व्यक्तीची किर्ती दाहीदिशा पसरते आणि अशाच व्यक्तीचा लोक आदर करतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या शीलाचे पालन करण्यापासून जी कुशल फळे प्राप्त होणार आहेत, ती येथे आणि आताच आपण मिळवू शकतो. हीच बुद्धांची शिकवण असून, हाच बुद्ध जीवनमार्ग आहे.


 

भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या