बुद्ध धम्मात मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्व! - भन्ते अश्वजीत

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बुद्ध धम्मात मार्गशीर्ष पौर्णिमेचे महत्व! - भन्ते अश्वजीत

Importance of Margashirsha Purnima in Buddha Dhamma!

Importance of Margashirsha Purnima in Buddha Dhamma!


Social24Network

या मार्गशीर्ष पौर्णिमेला दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. पहिली घटना म्हणजे परिव्राजक सिद्धार्थ गौतमाची राजा बिंबिसार यांची भेट. दुसरी म्हणजे देवदत्ताने नालागिरी नावाचा हत्ती भगवान बुद्धावर सोडला. कपिलवस्तू सोडल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा विचार केला. कपिलवस्तू ते राजगृह पायवाटेने ४०० मैल अंतरावर होते. सिद्धार्थ गौतम अनुप्रिया, वैशाली, पाटलीपुत्र आणि नालंदा मार्गे गंगा नदीच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेले. राजा बिंबिसार येथे राज्य करीत होता. मोठ मोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले निवासस्थान बनविले होते. राजा बिंबिसार हा वयाने सिद्धार्थ गौतम पेक्षा ५ वर्षांनी लहान होता. त्या राजाने सिद्धार्थ गौतम यांना खूप समजावले आणि गृहत्यागाचा मार्ग सोडून त्यांनी पुन्हा आपले राजवैभव भोगावे. परंतु सिद्धार्थ गौतम आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटचा पर्याय म्हणून राजा बिंबिसाराने आपले अर्धे राज्य त्यांना देऊ केले व म्हणाले की, "ठीक आहे तुमची कपिलवस्तुस पुन्हा जाण्याची इच्छा नसेल तर, माझे अर्धे राज्य मी तुम्हाला देतो त्यावर तुम्ही राज्य करून राजवैभव भोगावे." परंतु सिद्धार्थ गौतम आपल्या निश्चयापासून जराही ढळले नाहीत. शेवटी राजा बिंबिसार आपले दोन्ही हात जोडून म्हणाला, "तुमची इच्छा पूर्ण करण्यास माझी काहीही हरकत नाही. तुम्हाला जे जे काही करायचे आहे ते ते  सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा करा!" पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन सिद्धार्थ गौतमाकडून घेतल्यानंतर राजा आपल्या सेवकांसह राजवाड्याकडे परतला. राजा बिंबिसार व सिद्धार्थ गौतम यांच्या प्रथम भेटीचा दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमा इ.स.स. पूर्व ५३४.

दुसरी घटना देवदत्ताने नालागिरी हत्ती बुद्धावर सोडला. देवदत्त हा सिद्धार्थ गौतमाचा आत्येभाऊ होता. पण देवदत्त हा स्वभावताच इर्षाखोर वृत्तीचा, दुष्ट स्वभावाचा व हेवा करणारा होता. लहानपणापासूनच तो सिद्धार्थ गौतमाचा विरोध करीत असे. सिद्धार्थ गौतम राजपुत्र असतांना जसा तो त्यांना पाण्यात पहायचा तसाच सिद्धार्थ गौतम बुद्ध झाल्यावरही त्यांचा विरोधच करायचा. ही विरोधाची ठिणगी त्यांच्या लहानपणीच पडली. देवदत्ताने आपल्या धनुष्याने उडत्या राजहंसाला जखमी केले. त्या जखमी राजहंसाला सिद्धार्थ गौतमाने जीवदान दिले. तिथे देवदत्त आला व म्हणाला, "राजहंस माझा आहे, कारण मी त्याची शिकार केली आहे." त्यावर सिद्धार्थ गौतमाने राजहंस देवदत्त यास देण्यास नकार दिला. तो वाद राजदरबारी जाऊन निकाल सिद्धार्थ गौतमाच्या बाजूने लागल्यापासून दोघांमध्ये संबंध चांगले राहिले नव्हते.

भिक्खुंचा मानसन्मान होतो. आपलाही आदर-सत्कार व्हावा म्हणून देवदत्त भिक्खूसंघात आला. त्यावेळी उपासकात तथागतांची लोकप्रियता व भक्ती वाढली होती. लोक भगवंतांची सेवा करीत होते. सर्वांनी आपली श्रद्धा तथागता चरणी ओतली होती. याबद्दल देवदत्तास ईर्षा वाटत होती. तो सारखा मनात जळत होता. बुद्धास संघातून दूर सारून आपण धम्म प्रमुख व संघ प्रमुख व्हावे अशी स्वप्ने तो पाहत होता. एकदा श्रमण देवदत्त भगवान बुद्धांकडे आला व म्हणाला, "श्रमण गौतम आपण आता वृद्धत्वाकडे झुकला आहात. विशाल भिक्खू संघाची देखरेख करणे आता आपल्याला शक्य होणार नाही. तेव्हा आपण मला आपला उत्तराधिकारी नेमावा." त्यावर भगवंत म्हणाले, "माझ्या पश्चात माझा धम्मच माझा दायाद (उत्तराधिकारी) व मार्गदर्शक असेल!"

आपल्याला संघ प्रमुख न करता सारीपुत्त आणि मोगल्यायन यांना ते स्थान दिले याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धावर रोष होता. त्याने संघातील आपल्या विचाराचे व अविनयशील भिक्खू घेऊन वेगळा संघ स्थापन केला. देवदत्ताने भगवान बुद्धावर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले. पण तो एकदाही यशस्वी झाला नाही. एकदा बुद्ध गृध्रकूट पर्वताच्या पायथ्याशी सावलीत येरझारा करीत होते. देवदत्त वर चढला आणि एक भलामोठा दगड खाली बुद्धाच्या दिशेने लोटून दिला. पण तो एका दुसर्‍या खडकावर आदळला आणि तिथेच अडला. फक्त त्याचा एक लहानसा तुकडा तथागतांच्या पायावर येऊन पडला त्यामुळे तथागतांचे थोडेफार रक्त वाहीले. दुसऱ्यांदा देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला. काही लोकं देण्याची मागणी केली. अजातशत्रूने लोकांना सांगितले की, "जा आणि देवदत्त तुम्हाला सांगेल तसे करा," देवदत्ताने त्या व्यक्तीस सांगितले की, "जा मित्रा श्रमण गौतम अमुक ठिकाणी आहेत त्यांची हत्या कर." काही वेळाने तो मनुष्य परत आला आणि त्यास म्हणाला, "मी तथागताचे प्राणहरण करण्यास असमर्थ आहे."

देवदत्ताने मग तथागताचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला. ह्यावेळी राजगृहातील नालागिरी नावाचा क्रूर आणि जंगली हत्तीला त्यांनी भरपूर प्रमाणात मद्य पाजले व तो हत्ती बुद्धाच्या दिशेने सोडला. भगवान बुद्धांनी आपल्या मैत्री भावनेच्या संपन्न चित्ताने त्या हत्तीच्या चित्तास संयत करून एक हात उंचावून त्यास आशिर्वाद दिला व "शांत हो!" एवढे म्हटल्याबरोबर बेभान झालेला पिसाळलेला हत्ती शांत झाला. संबुद्धांच्या तेजोबल व आत्मबला पुढे तो हत्ती नतमस्तक झाला. आणि तथागतांना तीन प्रदक्षिणा घालून शांततेने आपल्या मार्गाने निघून गेला. ही गोष्ट अजातशत्रूचा मातापित्यास नजर कैदेत असतांना समजली. देवदत्ताच्या सांगण्यावरून अजातशत्रूने आपले माता पिता नजर कैदेत टाकले होते. त्याचवेळी त्यांनी दोघांनीही एकाच वेळी प्राण सोडला. ज्या दिवशी भगवान बुद्धांनी नालागिरी हत्तीवर विजय मिळवला. तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमा इ.स.स.पूर्व ४८७. 

या दिवशी प्रत्येक  बौद्धाने आपल्या नजीकच्या बुद्धविहारात जाऊन तिथे उपस्थित असलेल्या भिक्खूकडून अष्टशील ग्रहण करावे. आणि अष्टशील ग्रहण केल्यानंतर २४ तास पर्यंत आठ शीलांचे काटेकोरपणे पालन करावे. त्याचप्रमाणे आपल्याने जे जे शक्य होईल ते ते दान करावे. म्हणजेच त्याचे कुशल कर्म, सत्कर्म, पुण्यकर्म संचित होऊन त्याचे रक्षण होईल! सर्वांचे मंगल होवो!


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!








टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

sujay म्हणाले…
वंदामी भंन्तेजी,
साधू साधू साधू!