नवीन वर्षाचे स्वागत असे करावे ! - भन्ते अश्वजित || Welcome to the New Year

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नवीन वर्षाचे स्वागत असे करावे ! - भन्ते अश्वजित || Welcome to the New Year

 Welcome to the New Year 




Social24Network


इंग्रजी कॅलेंडर नुसार हे वर्ष डिसेंबर अखेर संपेल आणि १ जानेवारीपासून नवीन वर्ष सुरु होईल. ते म्हणजे १/१/२०२१. या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी झाडून पुसून सारी तरुणाई कामाला लागली आहे. कोणत्या बार मध्ये, कोणत्या धाब्यावर, कोणत्या हॉटेलवर जायचे कोणती दारू घ्यायची. खाण्यासाठी कशाची ऑर्डर द्यायची आणि कोणत्या डीजेच्या भेसूर आवाजावर कोणता 'डान्स' करायचा. या कामाची आखणी नवयुवक मंडळी मोठ्या उत्साहाने करीत असल्याचे दिसत आहे. यामध्ये युवावर्गच असतो असे नाही. तर त्यांच्या जोडीला उच्चभ्रू लोक, व्यावसायिक, अधिकारी, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कर्मचारी, (काही अपवाद वगळता.) सारेच्या सारेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. आणि विशेष म्हणजे हा प्रकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसून येतो. यामध्ये वैचारिक मनाला एक प्रश्न पडतो हे कसले नवीन वर्षाचे स्वागत आहे? ही पद्धती आली कुठून? अशा पद्धतीने स्वागत केले नाही तर नवीन वर्ष येणार नाही का? ते तर त्याच्या गतीने येणारच.
 
भारत हा संस्कृती प्रधान देश आहे, या देशाच्या शालिन संस्कृतीने अख्ख्या जगाला भुरळ घातली आहे. मग अश्या देशाने नवीन वर्षाचे स्वागत कसे केले पाहिजे? तर ३१ डिसेंबरच्या रात्री सजग राहून स्वतःला भानावर ठेवून सद्विवेकबुद्धीने  आम्ही मनाशी ठाम आणि पक्का निर्धार केला पाहिजे. तो असा की माझ्या मध्ये काही दुर्गुण असतील तर मी आजपासून त्यातील एकेक दुर्गुण सोडून देण्याचा इमाने-इतबारे प्रयत्न करून समाजाला अभिप्रेत असलेला माणूस बनण्याचा प्रयत्न करीन. असा दृढ निश्चय मनाशी पक्का करणे म्हणजे खऱ्या अर्थाने नवीन वर्षाचे स्वागत करणे होय. तरच १-१-२०२१ ही तारीख धन्य होईल.
 
गतवर्षी मी कशा पद्धतीने जगलो ती माझ्या जगण्याची पद्धत योग्य होती काय? माझ्याने मागच्या वर्षी काय काय चुका घडल्या, ज्या चुका घडल्या त्या कशा दुरुस्त करायच्या. या सर्व प्रश्नांवरती  स्वतःच स्वतःशी खल करून योग्य उत्तरे शोधून येणाऱ्या वर्षात आपल्या जीवनाला नवा आयाम द्यावा. कारण माणूस म्हणून जन्म होणे हे निसर्गाची फार मोठी देणगी मानवाला मिळाली आहे. आणि या जन्माचे याच जन्मी सार्थक करण्यासाठी ती संधी मला मिळाली आहे.असे प्रत्येकाने स्वता:ला वाटू द्यावे. कोणालाही असे वाटते की मला चांगले म्हटले पाहिजे. तर मग ३१ डिसेंबरच्या रात्री रात्रभर इंग्रजी, मराठी, गावरान दारू पिऊन डान्स करून झिंगलेले डोळे, निस्तेज चेहरा, थकलेले शरीर, दुर्गधी काया घेऊन सकाळी सकाळी घरी येणाऱ्याला किंवा रस्त्याने चालणार्‍याला  कोण बरे चांगले म्हणेल? आणि जो म्हणत असेल त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणीच नसेल! त्याच्याबद्दल,"अरे हा तर सुज्ञ तरुण आहे? अरे, तो तर ग्रॅज्युएट आहे? अरे बापरे! पलीकडून लपून-छपून चालला तो तर समाज प्रबोधनकार आहे. तो समाजाला जगण्याची योग्य दिशा आपल्या भाषणातून सांगताना म्हणतो," की दारू ही जीवनाची राखरांगोळी करणारी ज्वाला आहे! दारू ही घराची बरबादी करणारी अवदसा आहे!ती एकदा तोंडाला लागली म्हणजे तो तिचा गुलाम बनतो आणि पाहता पाहता त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करते!" अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजातून येतात.
 
या जगातील पहिले सर्वज्ञानी, या जगातील पहिले डॉक्टर, या जगातील वैज्ञानिक, या जगातील पहिले मार्गदर्शक, या जगातील पहिले प्रबोधनकार तथागत बुद्ध म्हणतात दारू पिणे किंवा नशायुक्त मादक पदार्थाचे सेवन करणे व त्यात मशगुल राहणे, रममाण असणे, नुकसान कारक आहे. कारण त्यापासून एकूण ६ प्रकारची हानी होते. त्यातील पहिली हानी ही अन्नद्रव्याची होते. अपार कष्ट करून रक्ताचे पाणी करून महत्प्रयासाने मिळवलेले धन माणूस दारुसाठी खर्च करतांना कोणताही विचार करीत नाही किंवा त्याला त्याची किंमतही वाटत नाही. जवळचा पैसा गेल्यानंतर आणि नशा उतरल्यानंतर त्याला पश्चाताप होतो. परंतु तो क्षणिक असतो. सूर्य उतरणीला आला की त्याचा निर्धार हरलेले योध्याप्रमाणे गळून पडतो. आणि मग त्याची पावले नकळत दारूच्या दिशेने 'एकच प्याला' साठी वळतात. यापासून दुसरी होणारी हानी म्हणजे नशा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनाचा ताबा नशेचा अंमल घेत असतो. मग तो त्यात वाट्टेल ते बोलतो त्यामुळे वाद होतात,भांडणे होतात, वेळप्रसंगी हाणामारी होऊन अशी व्यक्ती मार सुद्धा खाते. त्यावेळी मात्र आवरायला कोणी जात नाही हे विशेष! घरातील असो, दारातील असो, मित्रपरिवारातील असो, किंवा शेजारी असो, प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य निघते,"बरं बरं, त्याला तसेच पाहिजे त्याने कशाला. प्यावं!"
 
दारू पिल्याने होणारी तिसरी हानी म्हणजे त्याचे शरीर दुर्बल होते. कारण दारू पिण्याच्या नादात त्याच्या शरीराला आवश्यक तो योग्य वेळी आहार मिळत नाही. हे लोक नशा उतरल्यानंतर, शरीराला थकावटपणा आल्यानंतर कधी मध्यरात्री, कधी दुपारनंतर ,तर कधी कधी सकाळीच सपाटून भूक लागल्याने अधाशासारखे खातात. त्यामुळे त्यांची पचन क्रिया पार बिघडून जाते. मग असे लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात  डोळे कमजोर होणे, आतड्यावर सूज येणे, भूक मंदावणे, हृदय धडधडणे, हातापायाला कंप सुटणे, कपाळासहीत चेहऱ्यावर घाम येणे. अशा एक ना अनेक व्याधी त्यांना जडतात. अशा व्यक्तींचे आयुष्य सरासरी १५ वर्षांनी कमी होते हे सर्वात मोठे नुकसान होय. याबाबत जागतिक बँकेचा अहवाल तर फारच धक्कादायक आहे. महाराष्ट्रसंबंधी जागतिक बँक सांगते की, ३० लाख दारुड्यांच्या उपचारासाठी प्रतिवर्षी १५०० कोटी रुपये खर्च होताहेत. याशिवाय ३० लाख कुटुंबे उध्वस्त होतात ते वेगळे. भारत सरकारने केलेल्या २०१९ मध्ये केलेल्या एका सर्वेनुसार देशातील १० ते ७५ वयोगटातील १४.६ टक्के म्हणजेच १६ कोटी लोक मद्य सेवन करतात. छत्तीसगड, त्रिपुरा, पंजाब, अरुणाचल प्रदेश,महाराष्ट्र आणि गोवा या राज्यात सर्वाधिक मद्य सेवन केलं जातं.
  
हा सर्वे ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात करण्यात आला. त्यातील राष्ट्रीय स्तरावर १८६ जिल्ह्यातील २ लाख १११ घरात संपर्क केला आणि ४  लाख ७३ हजार ५६९ लोकांशी चर्चा केली. गेल्या १२ महिन्यात सुमारे २.८ टक्के म्हणजेच ३ कोटी लोक नशेच्या  पदार्थांचा वापर करतात असे आढळून आले. भारतात पाच पैकी एक जण मध्ये सेवन करतो. चवथी हानी म्हणजे असा माणूस नशेबाज, बेवडा, म्हणून ओळखला जाऊन समाजात बदनाम होतो. अशा व्यक्तीला समाजात स्थान नसते त्याची कुणीच किंमत करीत नाही. भले ती व्यक्ती हुशार असली, अभ्यासू असली तरी लोक अशा व्यक्तीला तुच्छ नजरेतून पाहतात. दारू पासून होणारी पाचवी हानी म्हणजे नशेच्या धुंदीमध्ये त्याच्याकडून त्याच्या शरीराचे असभ्य प्रदर्शन घडत असते. त्याला नशेचा इतका अंमल चढतो की, तो मर्कट चेष्टा करीत असतांना पाहणाऱ्याला सुद्धा लाज वाटते. त्या वेळी आपल्या आईसमान, बहिणीसमान, मुलीसमान किंवा नातीसमान कोणतीही स्त्री त्याला दिसत नसते. त्याच्या डोळ्यातील वासनेला दिसते ती फक्त भोगवस्तू त्यामुळे त्याच्याकडून अक्षम्य असे गुन्हे घडतात. म्हणून त्याच्याकडून चांगल्या अवस्थेतील वर्तणूक सुद्धा मग समाज स्विकारीत नाही; त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी त्याला घरी येऊ देत नाहीत. त्याच्याशी कोणी मैत्री करीत नाही त्याच्याशी कोणी चांगले बोलत नाही. सगळे कसे फटकून वागतात. दारूपासून सहावी आणि आणि शेवटची हानी म्हणजे त्याच्या बुद्धीमत्तेचा र्‍हास होत जातो.नित्य दारू सेवनाने मेंदू पोखरून पोखरून बुद्धीचा खोका बनतो. अशाप्रकारे सहा प्रकारची हानी होऊन या संपूर्ण पृथ्वीतलावरील सर्व प्राण्यात विद्वान आणि विवेकशील असलेला माणूस नावाचा प्राणी मातीमोल होऊन जातो. खरं म्हणजे विचार करण्यासारखी बाब ही आहे की, दारूच्या दुष्परिणामांना १५ ते २४ वयोगटातील तसेच अल्प उत्पन्न असलेली माणसे सर्वाधिक बळी पडतात. कारण त्यांना दारू पासून होणाऱ्या अपायांची कल्पनाच नसते. त्यांना दारूचे व्यसन जर कोणी लावले असेल तर ती म्हणजे निवडणूक होय! निवडणूक कोणतीही असो दिवसभर उमेदवाराचा प्रचार करणारे प्रचारक रात्री उशिरापर्यंत बारमध्ये, दारू ढोसून मटणावर ताव मारतात. काही बडबड करतात, काही कसेतरी जेवतात, काही ताटावरच जिंकतात तर काही चक्क झोपतात. त्यातील वयोगटाला पाहून मन स्वतःला विचारते 'हेच का ते या स्वतंत्र भारताचे आधारस्तंभ?' आणि उमलत्या पिढीने यांच्यापासून कोणता आदर्श घ्यावा.
 
म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्री भरपूर दारू पिऊन नाच-गाणे करुन नव्या वर्षाचे स्वागत करण्याची भयंकर पद्धती आता तरुणांनी मोडली पाहिजे. आणि मनाशी सम्यक संकल्प करून चांगले जीवन जगण्याचा मार्गावर आरूढ झाले पाहिजे. समाजाला, माणुसकीला, देशाला आणि माणसाला शोभणारा माणूस बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच नवीन वर्ष सुखाने हसत - खेळत येईल!
सर्वांचे मंगल होवो!
          

भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!







टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

sujay म्हणाले…
वंदामी भंन्तेजी,
खुप छान लेख आहे.
साधू साधू साधू!