Adinnadana Vermani Sikkapadam Samadiyami!
Social24Network
बौद्ध धम्मामध्ये सर्वात महत्त्वाची, सर्वात पवित्र आणि तात्काळ फळ देणारी कोणती गाथा असेल तर ती म्हणजे त्रिशरण पंचशील होय. म्हणून आम्ही ती गाथा आमच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सर्वात प्रथम म्हणतो मग तो कार्यक्रम घरगुती असो, सामुदायिक असो, विहारातील असो की सार्वजनिक असो. थोडक्यात ती गाथा म्हटल्याशिवाय आमचा कोणताही कार्यक्रम पुढे सरकत नाही. एवढे आमच्यासाठी पंचशील सर्वश्रेष्ठ आहे. या पंचशीलातील दुसरी गाथा आहे आदीन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि ! तर प्रथम या गाथेचा आपण विस्तृत अर्थ पाहू अदीन्ना म्हणजे न दिलेले. दुसऱ्या अर्थी कोणाकडून न मिळालेले. याचा उच्चार बरेच लोक म्हणतांना आदीन्न असा करतात ते योग्य नाही अदींन्ना हेच बरोबर आहे. दाना म्हणजे दान, देणगी, बक्षीस. वेरमणी म्हणजे न रमणे, अलिप्त राहणे, न स्वीकारणे. सिक्खा म्हणजे शिक्षा, शिकवण. समादियामी म्हणजे स्वीकारणे, अंगीकारणे, अनुसरणे, ग्रहण करणे. याचा सरळ मराठीत अर्थ लावला तर तो असा होईल न दिलेली कोणतीही वस्तू मी स्वीकारण्यात रमणार नाही, असे शिक्षापद मी ग्रहण करतो. याचा दुसरा अर्थ असा होतो की मी चोरी करणार नाही असे शिक्षापद ग्रहण करतो. त्याऐवजी मी दान करीन. जर आपण रस्त्याने चाललो तर रस्त्यात पैसे किंवा सोन्याचांदीचा एखादा दागिना अथवा कोणतीही मौल्यवान वस्तू आपल्याला दिसली तर आपण स्वतःच विचार करावा की ही वस्तू आपल्या मालकीची नाही किंवा ही वस्तू आपल्याला कुणी दिलेली नाही. म्हणून आपण ती वस्तू उचलू नये. ती उचलून घेतली तर अशा वृृत्तीला तथागतांनी चोरी करणे होय असे म्हटले आहे.
या जगातील जी बौद्ध राष्ट्र आहेत. त्या राष्ट्रात पंचशीलाचे काटेकोरपणे पालन होत असल्याने कुणाची कोणतीही वस्तू कुठे हरवली तरी त्याला ती बरोबर मिळते. यासंदर्भात भिक्खू धम्मबोधी थेरो यांनी थायलंड देशातील सांगितलेला एक किस्सा असा आहे की, तेथील एका नगरपरिषद कार्यालयात शिपाई झाडलोट करीत असतांना कार्यालय झाडल्यानंतर तो बाहेर झाडू मारत असतांना त्याच्या झाडण्यात एक सोन्याची अंगठी असल्याचे त्याला दिसून आले. त्याने ती उचलली आणि साहेबांच्या टेबलावर आणून ठेवली. साहेब आल्यानंतर त्या शिपायाला म्हणाले हे काय? तर शिपाई म्हणाला की, ती अंगठी सकाळी माझ्या झाडण्यात आली ती कदाचित आपली असावी म्हणून मी ती आपल्या टेबलावर आणून ठेवली. त्यावर साहेब म्हणाले की, नाही ही अंगठी माझी नाही. मग साहेबांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना विचारले त्या सर्व कर्मचाऱ्यांनी सांगितले की ती अंगठी आमची नाही. त्यानंतर साहेबांनी त्यासंदर्भात एक जाहिरात कार्यालयामार्फत दिली आणि चार दिवसांनी तिथे एकच इसम आला आणि खात्री पटल्यानंतर साहेबांनी ती अंगठी त्याच्या स्वाधीन केली. या प्रसंगावर थोडे चिंतन व्हावे ते यासाठी की कोणाच्याही मनात लोभ किंवा मोह निर्माण झाला नाही. ना शिपायाच्या मनात, ना कर्मचाऱ्यांच्या मनात, ना साहेबांच्या मनात. आणि चार दिवसानंतर तिथे एकच इसम आला. जवळपास अशी परिस्थिती बौद्ध राष्ट्रांमध्ये आहे. मग ते जपान असेल, श्रीलंका असेल, ब्रह्मदेश असेल, थायलंड असेल, म्यानमार असेल, तायवान असेल, मंगोलिया असेल म्हणजेच या देशातून सुद्धा कोणाचे काही हरवले तर त्याला वरील पद्धतीने मिळतेच. याच शीलाचे नाही तर ते लोक पाचवी शीलांचे काया, वाचा, मनाने पालन करतात. म्हणून ते देश खऱ्या अर्थाने सुखी आहेत आणि वैभवशाली आहेत. या सर्वात वरचा क्रमांक जपानचा लागतो. म्हणूनच मेड इन जपान असलेली कोणतीही वस्तू नंबर एकची असते. त्यात कोणीही फसवेगिरी करीत नसते. त्या देशातील लोक पंचशीलाचे पालन करूनच कोणतेही काम करतात. मग ते घरगुती असो, कार्यालयिन असो, सामाजिक असो, सार्वजनिक असो.
चोरी समस्या ही भगवान बुध्दांच्या काळात देखील होती. गृहस्थांनी चोरी केली तर एकदाचे ते समजता येईल, परंतु काही भिक्खू देखील चौर्यकर्मात सहभागी झाल्याचे पाहून तथागतांना काही नियम करावे लागले. एकदा भिक्खू धनियाने राजाची परवानगी न घेता आपली कुटिका तयार करण्यासाठी बिंबिसार राजाच्या राज्यसीमेतील वनातून लाकडे आणली होती. ज्यावेळी राजाला हे कळले त्यावेळी राजाने त्या भिक्खुला राजदरबारात दोषी ठरवले. ही गोष्ट तथागतांना जेंव्हा समजली त्यावेळी तथागतांनी त्या भिक्खुला बोलावून दोषी ठरविले आणि असा नियम केला की न दिलेली वस्तू घेणे म्हणजेच किंवा कोणाच्या परवानगीने न आणलेली वस्तू ही चोरी होय. म्हणून तथागतांनी सर्व भिक्खुना सांगितले की, गावातून किंवा अरण्यातून न दिलेली आणणे (म्हणजे चोरीची वस्तू) त्याला चोरी करण्याचा दोष लागेल.
लोक चोरी का करतात?
१) लोभी माणूस लोभामुळे चोरी करतो.
२) झटपट श्रीमंत होता यावे म्हणून काही लोक चोरी करतात.
३) आळशी लोक आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी चोरी करतात.
४) काहीलोक मस्करी म्हणून दोस्त मित्रांमध्ये चोरी करतात. जर चोरी उघड झाली तर मस्करी केली म्हणतात आणि चोरी उघड झाली नाही तर ती चोरीची वस्तू त्याला पचनी पडत असते.
५) काही लोक आपली दहशत बसावी म्हणून चोऱ्या करतात त्याला दरोडा टाकणे असे म्हटले.
६) काहीही न करता कोणाची कोणतीही वस्तू आपल्या मालकीची व्हावी यासाठी काही लोक चोर्या करतात.
७) काही लोक आपला शौक पुरा व्हावा म्हणून चोऱ्या करतात
यामध्ये चोरी करतांना किंवा केल्यानंतर त्याच्यावर चोराचा शिक्का बसतो आणि त्याला समाज नेहमी संशयित नजरेने पाहतो. विशेष म्हणजे अशा व्यक्तीला कोणी आपल्या घरी सुद्धा बोलावत नाही. याउलट एखादी व्यक्ती चोरी करूनही न्यायालयातून निर्दोष सुटते आणि उजळ माथ्याने समाजात वावरते. तेंव्हा त्याला असे वाटते की आपले कोणीही काहीच बिघडवू शकत नाही. परंतु "कराल ते भराल, अन पेराल ते उगवेल" या बुद्धाच्या सत्य वचनाने त्याला याच जन्मी त्याची फळे मात्र भरून द्यावीच लागतात. कारण बुद्ध वचन कधीही खोटे ठरले नाही. आजही नाही आणि उद्या खोटे ठरणार नाही. म्हणून समाजातील प्रत्येक मानवाने पंचशीलामधील या एका गाथेचे काया - वाचा - मनाने पालन केले तर त्याला खालीलप्रमाणे लाभ होतील.
१) जो चोरी न करता दान करतो त्याची कीर्ती दाहीदिशा पसरते.
२) अशा व्यक्तीला कुटुंबात समाजात मित्रमंडळी व नातेवाईकात मानसन्मान मिळतो.
३) अशा व्यक्तीची मित्रमंडळी दिवसागणिक वाढतच जाते.
४) अशा व्यक्तीवर कोणत्याही गुन्ह्याचा संशय एकदम घेतला जात नाही.
५) अशा व्यक्तीवर लोक पटकन विश्वास टाकतात.
६) अशा व्यक्तीच्या मनाला खरे सुख-समाधान लाभते.
७) अशा व्यक्तीच्या चित्तामध्ये पुण्य संखार संग्रहित होत असतात व ते दीर्घकाळपर्यंत त्याला फळे देत असतात.
सर्वांचे मंगल होवो!
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार,
आरती नगर,औरंगाबाद.
मो.नं. ९६७३२९२२९७.
भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !
संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन
1 टिप्पण्या
साधू साधू साधू!