बालक वर्गातील परिवर्तनाने मन प्रफुल्लीत झाले! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बालक वर्गातील परिवर्तनाने मन प्रफुल्लीत झाले! - भन्ते अश्वजित


Social24Network

सहा महिन्याच्या अंतराने वरूड तालुक्‍यातील तिवसा घाट येथे गेलो. मला पाहताक्षणीच धम्मसंस्कार वर्गाच्या विद्यार्थ्यांनी 'वंदामि भन्ते! म्हणत 'एकच कल्लोळ केला आणि भराभर जमा झाले. मग एकच किलकिलाट सुरू झाला. हा काय सांगतो तर तो काय म्हणतो, मध्येच कुणी काही सांगण्याचा प्रयत्न करतो, कुणी कोणाची तक्रार करतो, कुणाचं काय नि कुणाचं काय ही गडबड होत असताना मी सर्वांना शांत राहण्याचे सांगितले. आणि काही एक न बोलता बुद्धविहाराकडे निघालो. सर्व विद्यार्थी माझ्या मागोमाग आले. आम्ही सर्वांनी प्रथम अभिवादन केले नंतर त्यांना त्रिशरण पंचशील दिले आणि मग त्यांना म्हणालो आता एकेक जण सांगा. दुसरीची विद्यार्थीनी दिव्या म्हणाली 'भन्तेजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कोणीच दिवाळी साजरी केली नाही. आम्ही सकाळ संध्याकाळ बुद्धविहारात येत होतो. वंदना म्हणून झाल्यानंतर तुम्ही जी पुस्तक दिले त्यातील दिवाळी बौद्धाचा सण नाही, ते आम्ही इथे वाचत होतो आणि आम्ही घरातसुद्धा सांगितले की, दिवाळीचे फराळ घरात बनवायचे नाही. आम्ही सर्व लहान मुले बुद्धविहारात येत होतो पण मोठी मुलं मात्र येतच नव्हती. “अशीही शेवटी तिने तक्रार केली. त्यावर ६ वी ची कल्याणी म्हणाली “हो भन्तेजी मोठी मुले कोणीच येत नव्हती ती अमिशा, सुहानी, यश, अदिती, विशाल, सुनित, हादींक, देवांशू असे १५-१६ मुले आम्ही जमत होतो. मोठयापैकी फक्त माधुरी ताई येत होती.'' त्यावर ९ वी चा कुणाला म्हणाला, “खोटं बोलते मी सुद्धा येत होतो.'' विक्की लगेच बोलला, “भन्तेजी हा फक्त दोनच दिवस आला घरी असूनही येत नव्हता टि. व्ही. वर मॅच पाहत होता. त्यावर चिडून कुणाला म्हणाला, “मॅच नाही लॉर्डबुद्धा चॅनल पाहत होतो,” असा हो नाहीचा गदारोळ संसदेतील लोकसभा सदस्यांसारखा वाढताच मी हस्तक्षेप करीत म्हटले, “हं थांबा सर्वजण थांबा ! पहिल्यांदा मला हे सांगा मी, सांगितल्याप्रमाणे २२ प्रतिज्ञा कुणाच्या पाठ झाल्या? बुद्धविहारात येण्याचे ३२ लाभ कोण सांगू शकेल? पंचशीलेच काटेकोरपणे पालन केल्याने जे सात प्रकारचे लाभ होतात ते कोणाला माहीत आहेत? अशा प्रश्‍नांची सरबत्ती केल्यावर सगळी मुलं गप्प झाली. 


मग हळूच कल्याणी म्हणाली की, “भन्तेजी आमचं पाठांतर सुरू आहे. तुम्ही पुढच्या वेळेला आले म्हणजे आम्हाला विचारा आम्ही नक्कीच सांगू असे म्हणून तिथे एकदम शांतता पसरली. सगळी मुलं एकमेकांकडे अपराध्यासारखी बघत होती. मनामध्ये विचार आला की, या मुलांनी एवढं केलं तरी! त्यांना विहार म्हणजे काय ते समजलं, विहारात कशासाठी गेलं पाहिजे ते कळालं, धम्म समजून घेण्याच्या मार्गावर ते आहेत. त्यांना बौद्धाचे सण माहीत झाले. त्यांच्यावर बौद्ध धम्माप्रमाणे संस्कार होऊ लागल्याची चिन्हे त्याच्यात दिसली. आज भलेही त्यांचं पाठांतर झालं नाही पण कळलं तर खरी. त्यांची प्रगती पाहून मनामध्ये संतोष पसरला, धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण जिथून १० कि. मी. अंतरापासून मध्यप्रदेश सुरू होते त्या तिवसा घाट ता. वर्ड जि. अमरावती येथे ज्यावेळी पहिल्यांदा पाऊल टाकलं होत. त्यावेळी हिच समोर बसलेली मुलं मुली एकमेकांना सांगत होती, “अरे, ते बघ आपल्या गावात टकला साधू आला" ! ते ऐकून त्यावेळी धक्काच बसला होता आणि आम्ही बौद्ध धम्माची दिक्षा घेवून झालेल्या ६२ वर्षांत यांना भिक्खूची ओळख असूनये याचं आश्चर्य वाटलं म्हणून मी त्या गावात धम्मसंस्कार वर्ग सुरू केला. 


दर बुधवारी विद्यार्थी केवळ त्या वर्गामुळे सकाळपासून उल्हासित असत. वर्गामध्ये त्यांना जे काही शिकविल्या गेले त्याचा परिणाम आणि मुलांमध्ये झालेले परिवर्तन पाहनू मन फारच प्रफुल्लीत झाले. “भन्तेजी आज वर्ग घेणार नाही का?” शालू आई पाटील यांच्या या प्रश्‍नानं मी विचाराच्या तंद्रीतून बाहेर आलो, हो, हो का नाही जारे जे विद्यार्थी घरी राहिले असतील त्यांना बोलावून आणा”, म्हणून मुलांकडे निर्देश केला आणि शालू आईकडे पाहिलं तर त्यांचे दोन्हीही डोळे आसवांनी भरून आले होते. कंठात बोलण्याचे बळ आणत त्या म्हणाल्या, “भन्तेजी तुम्ही आले नसते तर या गावाचं काय झाले असतं? आज तुमच्या अवतीभवती बसणारी मुले कुठें भटकत असती? आम्हाला धम्माची माहिती कुणी दिली असती?” असं म्हणत त्या रडायला लागल्या. मी स्तब्धपणे पहात राहिलो. झाडाला मध लागल्यानंतर मधमाशा गोळा व्हाव्यात तशी मुलं भरभर बुद्धविहारात “वंदामि भन्ते” म्हणत जमा होऊ लागली. शालू आईने मुलावर एकनजर टाकली आणि मला दोन्हीही हात जोडून अंजली बुद्धप्रणाम केला आणि आपल्या घराकडे निघून गेल्या. गावात भिक्षू यावा, त्यांनी मुलांवर योग्य संस्कार घडण्याचे शिक्षण द्यावे आणि आम्हाला वंदना शिकवून धम्मज्ञान द्याोवे अशी तळमळ त्या माऊलीचीच.


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या