Sura-meray majjapamadatthana veramani sikkapadam samadiyami!
Social24Network
ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो, ती इमारत खूप वर्षे टिकते. एखाद्या इमारतीची अकाली पडझड झाली की, आपण सहज म्हणतो तिचा पाया कमजोर असल्याने पडली, नाही तर काही वर्षे ती अधिक टिकली असती. काही इमारती अकाली कोसळण्याचे दुसरे कारण म्हणजे त्या इमारतीच्या बांधकामासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असते. अशावेळी आपण म्हणतो की, बांधकामासाठी इतक्या हलक्या दर्जाचे साहित्य वापरल्यावर ती मध्येच पडणार नाही, तर काय? मग शरीररुपी इमारतीला सुद्धा पाया असेल ना? आणि ती इमारत जास्त दिवस टिकण्यासाठी तिच्या पोटात जाणारे मटेरियल चांगल्या दर्जाचे लागेल ना? तेव्हाच कुठे शरीररुपी इमारत जास्त दिवस टिकेल, अन्यथा ती मध्येच कोसळून तिचाही अकाली अंत होऊ शकतो. तर मग शरीररुपी इमारतीचा पाया तरी कोणता आहे? तो पाया म्हणजे सुरा-मेरय, मज्जपमादठ्ठाना वेरमणी, सिक्खापदं समादियामि. ही पंचशीलातील शेवटची गाथा होय. हा पाया ज्या शरीराचा मजबूत आहे. ते शरीर जास्त दिवस टिकते. आता या गाथेचा सविस्तर अर्थ पाहू या.
सुरा म्हणजे पक्की दारू (यामध्ये हातभट्टीवर मिळणारी गावरान दारू, देशी दारू, बिअर बारमध्ये मिळणारी इंग्रजी दारू, ताडी आणि माडी यांचा समावेश होतो) मेरय म्हणजे मादक पदार्थ, उत्तेजित करणारे पदार्थ. मज्ज म्हणजे कच्ची दारू(यामध्ये अफिम, गांजा, चरस, विडी, सिगारेट, तंबाखू, घोटा, गुटखा पुडी आणि ज्या पदार्थापासून नशा येते, अशा सर्व वस्तूंचा यात समावेश होतो) पमा म्हणजे प्रमादकारक, दट्ठाना म्हणजे सेवन करणे, खाणे. वेरमणी म्हणजे न रमणे,अलिप्त राहणे. सिक्खापदं म्हणजे शिक्षापदं, समादियामि म्हणजे धारण करतो, आचरण करतो, स्वीकार करतो, अंगिकार करतो, किंवा अनुसरतो. या शब्दांचा अर्थ लावून सरळ वाक्य बनविले, तर ते असे होईल. मी कच्ची, पक्की, दारू व मादक पदार्थांचे सेवन करण्यात न रमण्याचे शिक्षापद ग्रहण करतो.
तथागत बुद्ध म्हणतात, दारू पिणे किंवा नशायुक्त मादक द्रव्यांचे सेवन करणे, व त्यात मश्गूल राहणे, रममाण असणे नुकसानकारक आहे. त्यापासून एकूण सहा प्रकारची हानी होते. त्यापैकी पहिली म्हणजे धन द्रव्याची हानी होते. कष्ट करून रक्ताचे पाणी करून महत्प्रयासाने मिळविलेले धन, माणूस दारुसाठी खर्च करतांना कोणताही विचार करीत नाही किंवा त्यावेळी त्याला त्याची किंमतही वाटत नाही. जवळचा पैसा गेल्यानंतर आणि नशा उतरल्यानंतर त्याला पश्चाताप होतो. पण तो क्षणिक असतो. सूर्य उतरणीला आला की, त्याचा निर्धार हरलेल्या योद्धयाप्रमाणे गळून पडतो. त्याची पावले नकळत दारूच्या दिशेने 'एकच प्यालासाठी' वळतात. यापासून दुसरी हानी म्हणजे नशा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनाचा ताबा नशेचा अंमल घेत असते. मग तो त्यात वाटेल. ते बोलतो. त्यामुळे वाद होतात. भांडणे होतात. वेळप्रसंगी हाणामारी होऊन अशी व्यक्ती मारसुद्धा खाते. त्यावेळी मात्र आवरायला कुणी जात नाही. हे विशेष. घरातील असो दारातील प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य निघते, त्याला तसेच पाहिजे त्याने कशाला... प्यावे? त्यामुळे त्याच्या घरातील वातावरण सुद्धा दुषित होते.
दारूपासून होणारी तिसरी हानी म्हणजे त्याचे शरीर दुर्बल होते. कारण दारू पिण्याच्या नादात त्याच्या शरीराला आवश्यक तो आहार मिळत नाही. त्यात वेळेचे कोणतेही बंधन नसते. हे लोक नशा उतरल्यावर, शरीराला थकावटपणा आल्यानंतर कधी मध्यरात्री, कधी दुपारी तर कधी कधी सकाळीच सपाटून भूक लागल्याने अधाशासारखे खातात. त्यामुळे त्यांची पचनक्रिया पार बिघडून जाते. मग असे लोक वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात. आतड्यांवर सुज येणे, डोळे कमजोर होणे, भूक मंदावणे, हृदय धडधडणे, हातापायांना कंप सुटणे, कपाळावर, चेहऱ्यावर घाम येत राहणे, अशा एक ना अनेक व्याधी त्यांना जडतात. अशा व्यक्तीचे आयुष्य सरासरी १५ वर्षानी कमी होते. हे सर्वात मोठे नुकासन होय.जागतिक बँकचा अहवाल तर फारच भयानक आहे. महाराष्ट्रासंबंधी जागतिक बैंक सांगते की, ३० लाख दारुड्यांच्या उपचारासाठी प्रतिवर्षी १५०० कोटी रुपये खर्च होत आहेत. याशिवाय ३०लाख कुटुंबे उदध्वस्त होतात, ते वेगळे. चौथी हानी म्हणजे असा माणूस नशेबाज, बेवडा म्हणून ओळखला जावून समाजात बदनाम होतो. अशा व्यक्तीला समाजात स्थान नसते. त्याची कुणीच किंमत करीत नाहीत. भलेही अशी व्यक्ती हुशार असली, तरी लोक तिला बेवड्याच्याच नजरेतून पाहतात.
पाचवी हानी म्हणजे नशेच्या धुंदीमध्ये त्याच्याकडून शराराचे असभ्य प्रदर्शन घडत असते. त्याला नशेचा अंमल इतका चढतो की, तो मर्कट चेष्टा करीत असतांना पाहणाऱ्याला सुद्धा लाज वाटते. त्यावेळी त्याला आईसमान, बहिणीसमान, लेकीसमान किंवा नातीसमान कोणतीच स्त्री दिसत नाही. त्याच्या डोळ्यातील वासनेला दिसते ती फक्त भोगवस्तू त्यामुळेच त्याच्याकडून अक्षम्य असे गुन्हे घडतात. म्हणून त्याच्याकडून चांगल्या अवस्थेतील वर्तणूकसुद्धा मग समाज स्वीकारत नाही. त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. नातेवाईक, मित्रमंडळी त्याला घरी येऊ देत नाहीत. त्याच्याशी कुणीही मैत्री करीत नाही. त्याच्याशी कुणी बोलत नाही. सगळे कसे फटकून वागतात. सहावी हानी म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेचा ऱ्हास होतो. नित्य दारू सेवनाने मेंदू पोखरून बुद्धीचा खोका बनविते. अशा प्रकारे शरीर नावाच्या इमारतीची सहा प्रकारे हानी होऊन ती खिळखिळी होते. म्हणजेच त्या इमारतीचा पायाही पक्का नाही. आणि वापरलेले मटेरियलसुद्धा चांगले नसल्याने ती इमारत १०० वर्षे टिकेल तरी कशी? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दारूच्या दुष्परिणामांना १५ ते २४ वयोगटातील तसेच अल्प उत्पन्न गटातील माणसे सर्वाधिक बळी पडतात. कारण त्यांना दारूपासून होणाऱ्या अपायाची कल्पनाच नसते.
आजकालच्या निवडणुकींनी तर कहरच केला आहे मग ती कोणतीही निवडणूक असो. दिवसभर उमेदवाराचा प्रचार करणारे प्रचारक रात्री उशिरापर्यंत बारमध्ये दारू ढोसून मटनावर ताव मारतात. काही जेवतात, काही झिंगतात, काही बडबडतात तर काही चक्क झोपतात. त्यामधील वयोगटांना पाहून मन स्वत:ला विचारते,"हेच का ते या स्वतंत्र भारताचे आधारस्तंभ! आणि उभरत्या पिढीने यांच्यापासून कोणता आदर्श घ्यावा?" बहुजन समाजामध्ये आणखी एक वाईट प्रथा सुरू झाली, ती ही की ज्या घरी मुलीचे लग्न असेल त्या घरी लग्नाच्या आदल्या दिवशी मुलीचा बाप १५ ते २१ वयोगटातील मुलांना दारुचा बॉक्स आणि त्यासोबत खायला काही आणून देतो. मग ही धावणारी मंडळी खाऊन पिवून कामाला लागतात, मंडपाचे सामान आणणे, स्वयंपाकाचे भांडे आणणे, पाणी आणणे, स्वयंपाक करण्याच्या कामी मदत करणे आणि रात्रभर डीजेवर नाचणे. याबाबत चौकशी केली असता उत्तर मिळते की, लोक लग्नकार्यामध्ये हातभार लावत नाहीत म्हणून या पोरांना हाताशी धरावे लागते आणि असे काही दिल्याशिवाय ही पोरे कामच करीत नाहीत. त्यांची अशी व्यवस्था केली की, मग ते पंगतीला वाढ करण्यापर्यंतची सर्व कामे अगदी सहज करतात.
अशीच परिस्थिती मुलाकडील तरुणाईची असते. नवरदेव निघायच्या अगोदर त्यांची सोय लावावी लागते त्यावेळी वाजत गाजत वरात निघते. ही प्रथा बौद्ध समाजामध्ये ग्रामीण भागासहित शहरातूनही पसरल्याने समाजाच्या लग्न कार्याची फारच वाईट अवस्था झाली आहे. एकतर या धिंगाण्यामुळे कोणतेही लग्न वेळेवर लागत नाही. डीजेमुळे पैशाचा चुराडा होतो, अन्नाची नासाडी होते. भांडण, तंटे होतात ते वेगळे ! म्हणून असल्या जीवघेण्या प्रथा बंद करण्यासाठी समाजातील माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा पुढील लग्नकार्यातील चित्र फार भयानक असेल.
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार,
आरती नगर,औरंगाबाद.
मो.नं. ९६७३२९२२९७.
भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !
संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन
0 टिप्पण्या