राजकारणाचे सुत्र म्हणजे 'सम्यक क्रांती' ! - भन्ते अश्वजीत

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राजकारणाचे सुत्र म्हणजे 'सम्यक क्रांती' ! - भन्ते अश्वजीत




Social24Network


भारतीय लोकशाहीचे आजचे स्वरूप पाहिल्यास आमचे अस्तित्व फार मोठे प्रश्नचिन्ह ठरलेले दिसत आहे. याची जाणीव आमच्या नेत्यांना होणे आवश्यक आहे. आमची लोकशाही रा.स्व.संघ व भारतीय जनता पक्षाच्या हातात शेवटचे श्वास घेत आहे असे वाटते. दसऱ्या महायुद्धाला समर्थन देतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे १८ जुलै १९४२ रोजी शे.का.फे. ची स्थापना करतेवेळी जो इशारा दिला होता त्याची आठवण भारतातील लोकशाहीवादी राजकीय नेत्यांना करून देण्याची आवश्यकता येऊन पडली आहे. 


बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले की, "हे लोकशाही आणि हकूमशाही यातील युद्ध आहे. ती सुद्धा उदारमतवादी कल्याणकारक हकूमशाही नव्हे तर ती अत्यंत रानटी स्वरूपाची हकूमशाही होय. तिचा पाया नीती नसून वांशिक उद्धटपणा आहे. पूर्णत: नायनाट करण्याजोगी जर कोणती हकूमशाही असेल तर ती हीच नीच नाझी हकूमशाही होय. नाझीझमचा विजय झाल्याने जी भयंकर विपत्ती ओढावणार आहे. तेवढी भयंकर गोष्ट अजून घडली नाही आणि भविष्यातही कदाचित दुसरी घडणार नाही, हे आपण विसरून जाण्याची शक्यता आहे. तिचा वंशावर आधारलेला पाया हा भारतीय लोकांना अधिक धोकादायक ठरणार आहे ही बाब फार महत्वाची आहे. परिस्थिती संबंधीचे हे विचार जर बरोबर असतील तर या जगाच्या पाठीवरून माणसामाणसांतील संबंधाचे योग्य पालन करविणारे लोकशाही तत्व लुप्त होऊ नये म्हणून लक्ष देणे आपले जबरदस्त कर्तव्य ठरते असे मला वाटते. आपला जर त्यावर विश्वास असेल तर आपण त्याच्याशी एकनिष्ठेने व सत्याने वागले पाहिजे. आपला लोकशाहीवर खंबीर विश्वास असूनच भागणार नाही, तर समता, स्वातंत्र्य व बंधुभाव या तत्वांना मुळासह नाश करणाऱ्या लोकशाहीच्या शत्रूंना कोणत्याही कृत्याने आपण मदत करणार नाही असा दृढनिश्चय आपण केला पाहिजे.” किती अनमोल विचार आहेत बाबासाहेबांचे! आजच्या घडीला प्रत्येक राजकीय पक्षाने, प्रत्येक राजकीय पक्षांच्या युतीने यासंदर्भात थोडेतरी आत्मचिंतन करून काहीतरी बोध घेतला पाहिजे. 


आंबेडकरवादी राजकारण ही काही केवळ दलितोद्धाराचीच मर्यादित अवस्था नाही. तर 'सम्यक क्रांती' हे या राजकारणाचे सुत्र आहे. गांधीवाद, साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद किंवा तथाकथित बहुजनवाद आणि त्याचसारखे अन्य संकीर्ण भाषीक, प्रांतिक आणि जात-जमातवाद यांच्या निर्दालनासाठी आंबेडकरवाद हे एक प्रभावी शास्त्र आणि शस्त्र आहे. सर्व प्रथम आपण आंबेडकरवाद म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. एक व्यक्ती-एक मूल्य हे तत्व मान्य करून स्वातंत्र्य, समता व बंधुत्व म्हणजेच सामाजिक नीतिमत्ता स्वीकारून माणसाचा सर्वांगिण कल्याण साधण्याचा सांसदीय लोकशाहीयुक्त जीवनमार्ग म्हणजे आंबेडकरवाद. परंतु ते समजण्यासाठी आमची वैचारिक आणि बौद्धिक कुवत आणि राजकीय क्षमता यांचे अतिशय विलोभनीय मिश्रण आमच्या नेतृत्वात असले पाहिजे. त्यादृष्टीने आजचे आमचे संभ्रमावस्थेत कधी तांडवनृत्य तर कलगीतुरा करणारे जे नेते आहेत त्यांनी जरा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. निव्वळ 'आंबेडकर' नावाचा जप करून किंवा उरबडवेपणा वा गगनचुंबी शब्दच्छल करून आम्ही प्रभावी राजकीय शक्ती निर्माण करू शकत नाही हे आम्हाला कळले पाहिजे. 


डॉ.बाबासाहेब आंबेडकर दि. २४ सप्टेंबर १९४४ रोजी मद्रास (चेन्नई) येथे शे.का.फे. च्या वतीने आयोजित एका समारंभात म्हणाले होते की, "आपले उद्दीष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनने हे आमचे उद्दीष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराघराच्या भिंती भिंतीवर ते कोरून ठेवा म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, किंवा ज्याच्यासाठी आपण लढत आहोत ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही. थोडयाशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसाठी आपला लढा नाही. आमच्या अंत: करणातील आकांक्षा फारच मोठया आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. ती कृतीत उतरवण्यासाठी केवढे अथक परिश्रम करावे लागतील ते मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ निवेदनाच्या किंवा शब्दांचा काही उपयोग होणार नाही." उपरोक्त विचार आंबेडकरवाद्यांच्या राजकीय उद्दीष्टांचा शिलालेख आहे. खरे तर आजच्या आंबेडकरवाद्यांना डॉ. बाबासोहब आंबेडकरांच्या विचारांची महत्ती सांगण्याची गरज नाही. त्याचे कारण म्हणजे हे आंबेडकरवादी नेते बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाने चिंब झालेले असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरूनच दृष्टोत्पत्तीस येते. मग आंबेडकरवादी राजकारणाची आज हतबल, दारूण आणि आत्मसंहारक अशी अवस्था का व्हावी? हा एक गंभीर प्रश्न आहे. 


आज भारतीय राजकारणाचे विश्लेषण करतांना ज्या काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक उत्तरदायित्व सिद्ध केले, त्या पक्षाची झालेली पडझड व समाजवादी, साम्यवादी यासारख्या राजकीय पक्षांची निष्प्रभ, पोथीनिष्ठ आणि कुपमण्डूक अवस्था भारतीय राजकारणात नाझी प्रवृत्तीच्या भारतीय जनता पक्षाच्या घोडदौडीला खऱ्या अर्थाने कारणीभुत आहे. बहुजनांच्या नावावर नेत्यांचे जे तथाकथित राजकीय पक्ष आहेत त्यांना अजूनही भारतीय राजकारणाचा सुर गवसलेला नाही. त्यामुळे हे राजकीय पक्ष किंवा राजकीय गट आपले अस्तित्वही निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे या गटांना इतर राजकीय पक्षांचे लाचार, हुजरे याशिवाय अन्य अर्थ उरला नाही. जो बहुजन समाज पक्ष बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग करतो त्या पक्षाचे नेतेही नाझीवादी पक्षाचे मांडलिक कसे झाले हे त्यांनाही कळले नाही. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "केवळ एखादा पक्ष शक्तीशाली आहे म्हणून, आपली तेथे कदर होवो की न होवो, त्याच्याशी संगनमत करणे हा भिकाऱ्याचा मार्ग असून ती लज्जास्पद शरणागती आहे, आणि कोणतेही सभ्य लोक ती सहन करू शकत नाही."


ज्या पार्श्वभुमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली ती पार्श्वभुमी समजून घेतांना त्यांनी जे राजकीय विश्व निर्माण केले होते त्याचा मागोवा घेतल्याशिवाय रिपब्लिकन नेतृत्व सक्षम होऊ शकत नाही. केवळ प्रासंगिक डावपेच हाच राजकारणाचा मूळ गाभा आहे, असे ज्यांना वाटते ते नेते राजकीय शक्ती प्रभावीपणे निर्माण करू शकणार नाही हे त्यांना उमगले पाहीजे. आज पुन्हा नव्या उर्मीने रिपब्लिकन ऐक्याच्या घोषणा कानावर येत आहेत. पावसाळी छत्र्याप्रमाणे या घोषणा अशाच विरून जातात. आणि आमचे नेते पुन्हा परस्परांविरूद्ध बेबनाव निर्माण करण्यासाठी आपले कसब पणाला लावतात. एकीकृत रिपब्लिकन पक्ष ही जशी काळाची गरज आहे तद्वतच “आंबेडकरी राजकारण" ही भारताच्या अभ्युदयाची गुरुकिल्ली आहे. गेल्या १०-१५ वर्षात ज्या युवक नेत्यांनी राजकारण केले ते आज रिपब्लिकन पक्षाचे गटनेते म्हणून मिरवित आहेत. यौवनाच्या उन्मादाची जागा अनुभव, संधी आणि पद प्राप्ती यांच्यामुळे वैचारिकतेने, विवेकनिष्ठेने आणि अव्यभिचारी प्रामाणिकपणाने जर घेतली नाही तर हे गट नेतृत्व आंबेडकरी राजकारणाचे मारेकरी ठरल्याशिवाय राहणार नाही.


“एकता ही सर्वात मुल्यवान बाब आहे. वेळ आहे तोपर्यंतच या शिकवणीचा आपण सदुपयोग करून तिला आपल्या हृदयात स्थान दिले पाहिजे.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. आपल्या आजच्या वैयक्तिक सुखापेक्षा उद्याचे यशस्वी सामाजिक उत्तरदायित्वाचे सुख अमर्याद आनंददायी व समाधान देणारे असेल याचे भान आमच्या नेत्यांना होवो, यातच त्यांच्या कर्तृत्वाचे सार्थकत्व आणि सम्यक क्रांतीचे यश अंतर्भूत आहे.



भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या