लोक बुद्धविहारात का जात नाहीत? - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

लोक बुद्धविहारात का जात नाहीत? - भन्ते अश्वजित

लोक बुद्धविहारात का जात नाहीत - भन्ते अश्वजित


Social24Network 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २४ आणि २५ नोव्हेंबर १९५६ रोजी सारनाथ येथे आपले शेवटचे भाषण करताना आपल्या लेकरांना सांगितले की, “यापुढे तुम्ही तुमच्यात फूट ठेवून चालणार नाही, तुम्ही सर्व एकजूट असले पाहिजे. त्यासाठी तुम्ही मोक्याच्या जागा काबीज करा त्यावर प्रशस्त सभागृह असलेले बुद्धविहार बांधा आणि दर रविवारी आपले आद्यकर्तव्य समजून आपल्या कुटुंबासह बुद्धविहारात जा.' डॉ. बाबासाहेब अखेरच्या संदेशात जे सांगतात ते समाजाचे संघटन मजबूत होण्यासाठी आहे. कारण सतत बुद्धविहारात येत राहिल्याने श्रद्धा वाढीस लागून मन निर्मळ होऊन मैत्री दृढ होईल. दै. वृत्तरत्न सम्राटसुद्धा आपल्या आवाहनातून लोकांना बुद्धविहारात जाण्याचे सांगतो. भिक्खूही आपल्या प्रवचनातून तसेच मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे समाज प्रबोधनकार, गायकमंडळीसुद्धा आपल्या गायनातून लोकांना बुद्धविहारात जाण्याचे सुचवितात. इतके सगळे लोक सांगत असताना लोक बुद्धविहारात का जात नाहीत? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता दोनच कारण समोर येतात. पहिले म्हणजे घमेंड असणे आणि दुसरे म्हणजे अक्कल कमी असणे. घमेंड असणाऱ्या समुहाचा अभ्यास केला असता असे दिसून आले की, ज्यांच्याकडे नोकरी आहे, 


पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे त्यांना असे वाटते की, आपल्याला काय कमी आहे किंवा आपल्याला काय गरज आहे. बुद्धविहारात जाण्याची? यातील काहीजणांचे तर सर्रास म्हणणे आहे की, मी शिकलो म्हणून नोकरीवर लागलो आणि शिकलो नसतो तर नोकरीवर कसा लागलो असतो अशा लोकांना कोणी सांगावे? कसे सांगावे? की डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून शिक्षण मिळाले आणि शिक्षण मिळाले म्हणून नोकरी मिळाली. परंतु काही लोक त्यांचे उपकार जाणीत नाही अन मानीतही नाहीत एवढे त्यांच्या घमेंडीने त्यांना अहंकारी बनविले. जो मजूर वर्ग आहे, गरीब वर्ग आहे, अशिक्षित वर्ग आहे, बुद्धविहारात जाणे हे त्यांचेच काम आहे. त्यांच्याशी आपला काही एक संबध येत नाही. असेच त्यांना वाटते परंतु प्रत्यक्षात त्यांचा किंवा त्यांच्या घरच्या सदस्यांना त्रिशरण, पंचशीलसुद्धा व्यवस्थित म्हणता येते की, नाही कुणास ठाऊक? दुसरा जो वर्ग आहे त्याला मुळातच अक्कल कमी असल्याने कोणी कितीही सांगितले, तरी ते त्याच्या डोक्यात उतरत नाही. त्यांना असे वाटते की, विहारात जाणे, वंदन म्हणणे, भिक्खूचे प्रवचन ऐकणे हे रिकाम्या लोकांचे काम आहे. 


त्यांना दूसरे असे वाटते की, जो वर्ग बुद्धविहारात जात नाही त्याच तर काहीच बिघडत नाही? तो तर मस्त खातो, पितो आणि मजा करतो. मग आपले काय बिघडणार? असे समजून ते बुद्धविहारात जाणाऱ्यांना नुसते भामट्यासारखे पाहतात. पाहतच नाही तर त्यांची टिंगल टवाळी करून त्यांच्या मनाचे खच्चीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. या सर्व गोष्टींचा हिशेब केला, तर असे दिसून येईल की, वरील प्रकारच्या दोनही वर्गाला बुद्धविहारच समजले नाही ते कशासाठी आणि कोणासाठी बांधले तेही उमजले नाही मात्र विहार बांधतांना त्यांनी जे दान दिले तर कदाचित इतरापेक्षा जास्त असू शकते. म्हणून बुद्धविहारात नियमित गेल्याने कोणकोणते लाभ होतात, हे जर सविस्तर माहित झाले तर काही प्रमाणात का होईना बुद्धविहारात जाणाऱ्यांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल, असे वाटते.


सर्वप्रथम जो पहाटे झोपेतून उठतो, त्याला निसर्ग पहाटे वाटीत असलेल्या पाच गोष्टींचा लाभ होतो. परंतु आमच्या सर्वांच्या आधी कोंबडा उठत असल्याने त्या पाचही गोष्टी पहिल्यांदा त्याला मिळतात. म्हणून तो सदासर्वकाळ सतर्क, फ्रेश, निरोगी,चंचल, उत्साही आणि कमालीचा सावध असतो. त्या पाच गोष्टी म्हणजे 

१) पहाटे उठल्याने आमचे शरीर स्वास्थ्य पुढील २४ तासापर्यंत तरतरीत राहते. 

२) आमच्यातील आळस जातो. 

३) जगाचा व्यवहार पाहिला तर इथले लोक खरे दुःख विकत घेऊन खोट्या सुखाच्या मागे लागलेले आपल्याला दिसतात. पण आम्हाला मात्र खरे सुख लाभते. 

४) भरपूर आनंद लाभतो.

५) कोणतेही काम आम्ही सजगतेने, उत्साहाने आणि त्वरेने करतो. 


पहाटे उठून जर आम्ही वाचन केले, तर (विशेषतः विद्यार्थी वर्गाला) आठ प्रकारचे लाभ होतात ते असे 

१) मानसिक ताण, तणाव दूर करण्यास व चिंता हलकी करण्यास वाचन मदत करते. 

२) आपला शब्दसंग्रह वाढतो. 

३) वाचन नितिमत्ता व व्यवहार शिकविते.

४) वाचन सहनशिलता शिकविते.

५) वाचनामुळे कल्पनाशक्तीला चालना मिळते.

६) वाचनामुळे स्वत:चा शोध घेण्यास मदत होते. 

७) वाचनामुळे मनाचा, बुद्धीचा आणि विचारांचा अर्थात सर्वागिण विकास होतो. 

८) वाचाल तर वाचाल या म्हणीचा खरा अर्थ समजतो. 

या संपूर्ण पृथ्वीतलावरील सर्वश्रेष्ठ असलेल्या बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना बुद्धविहारात जाऊन नियमित सकाळ-संध्याकाळ अभिवादन केल्याने आम्हाला चार प्रकारचा लाभ होतो. 

१) आमचे आयुष्य काही वर्षांनी आपोआप वाढते. 

२) आमची काया सतेच होते. 

३) ज्या क्षणी आम्ही त्रिरत्नांचे शरण गमन करतो, त्या क्षणी आमचे डोळे विलक्षण तेजाने तळपू लागतात. खऱ्या सामाजिक स्वातंत्र्याच्या अनुभवाने आमचे हृदय स्पंदन करू लागले. शब्दातही व्यक्त करता येणार नाही. अशा आनंदाची लहर आमच्या अंत:करणात दौडत जाऊन आम्हाला खऱ्या सुखाचा आस्वाद घेता येतो. 

४) आमचे बल वाढेल. हे झाले आमचे अध्यात्मिक लाभ, नियमित अभिवादनाने पाठीचा, कंबरेचा, मानेचा, गुडघ्याचा आणि पोटाचा व्यायाम होऊन त्यात असलेले दुखणे आपोआप कमी कमी होत जाते. हे शारीरिक लाभसुद्धा आम्हाला होता.


बुद्ध धम्मातील सर्वात महत्वाची पवित्र आणि तत्काळ फळ देणारी गाथा म्हणजे पंचशील होय. या गाथेचे काया, वाचा आणि मनाने काटेकोट पालन केले की, आम्हाला सात प्रकारचे लाभ होतात. 


१) अशा व्यक्तीला सुखाने झोप येते आणि उत्साहवर्धक जाग येते. त्याला भितीदायक अथवा वाईट स्वप्न पडत नाहीत. 

२) अशी व्यक्ती सर्व माणसांना प्रिय असते. 

३) अशा व्यक्तीचे अमनुष्यांशी मैत्रीचे नाते जडते. 

४) अशी व्यक्ती कोणत्याही समेत निर्भयपणे बोलते, कुठेही निर्भयपणे वागते म्हणजे भीती, धास्ती त्याच्या आसपासही थांबत नाही.

५) लोकधर्माने अशा व्यक्तिचे चित्त कधीच विचलित होत नाही. (लाभ, हानी, सुख-दुःख, यश-अपयश, स्तुती-निंदा हे आठ प्रकारचे लोकधर्म आहेत.) 

६) देवता अशा व्यक्तीचे रक्षण करतात. बुद्ध धम्मामध्ये देवता म्हणजे असा महापुरुष की, जो अत्यंत ज्ञानी असून ज्याने सर्व विकारावर विजय मिळविला आहे व जो राग, लोभ, द्वेष आणि मोहातून पूर्णपणे मुक्त झाला आहे. 

७) अशा व्यक्तीचे अग्नीत होरपळून, पाण्यात वाहनू, विषाने तडफडून, शस्त्र लागून किंवा अपघाती निधन कधीच होत नाही म्हणजेच तिला सुखाने मरण येते व ती त्याचे स्वागत करते.


आपल्या चित्ताला विमुक्त करणाऱ्या मैत्रीभावनेनुसार आचरण केले असता तिचे चिंतन करीत राहिल्याने, तिचा सतत अभ्यास करीत राहिल्याने, आपल्या मनात तिचा विस्तार होऊ दिल्याने, तिलाच मुख्य आधार मानल्याने, तिचे अनुष्ठान केल्याने, तिला योग्यरितीने आत्मसात केल्याने, तिच्या भावनेत पूर्णतः रममान झाल्याने आम्हाला एकूण ११ प्रकारचे लाभ होतात त्यात वरील ७ प्रकारचे लाभ जसेच्या तसेच आणि त्यापुढील लाभ खालीलप्रमाणे...


८) त्याचे चित्त तत्काळ स्थिर होऊन त्याला लवकर समाधी लागते. 

९) अशा व्यक्तीला येणारे मरण दिसते. 

१०) अशा व्यक्तीचा कोणताही प्राणी शत्रू नसतो. मग तो दोन पायाचा असो, चार पायाचा असे, सहा पायाचा असो, असंख्य पायाचा असो, विनापायाचा म्हणजे सरपटणारा असो पाण्यात पोहणारा असो, आकाशात उडणारा असे, दिसणारा असो की, न दिसणारा असे, अशा सर्व प्राण्यांशी त्याचे मैत्रीचे नाते असते. 

११) अशी व्यक्ती अर्हतपदापर्यंत पोहचू शकली नाही, तरी ती निश्चितच ब्रह्मलोकात उत्पन्न होते. (करुणा, मुदिता, मैत्री आणि अपेक्षा या भावनांचा जिथे सतत विहार असतो, त्या स्थळाला ब्रह्मलोक असे म्हणतात.) 


नियमित बुद्धविहारात जाण्याचे अर्थात धम्माचरणाचे लाभ पुढीलप्रमाणे -


१) बुद्धविहारात सतत येत राहिल्याने श्रद्धा वाढीस लागून मन निर्मळ होऊन मैत्री दृढ होईल. 

२) स्वैर आणि भरकटलेल्या मनाला नियंत्रित करता येईल. 

३) मनाला सन्मार्गावर वाटचाल करण्याचे वळण लावता येईल. 

४) धम्म म्हणजे निती, निती म्हणजे सदाचरण, सदाचरण म्हणजे पापाला भिणे, पापाला भिणे म्हणजे पंचशीलाचे पालन, पंचशीलाचे पालन म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे निती हे क्रमाक्रमाने समजून घेता येईल. 

५) जीवनात येणाऱ्या समस्यांना विवेकाने तोंड देता येईल. 

६) सत्कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, दुष्कृत्य टाळता येतील. 

७) सत्य मार्गावर वाटचाल असल्यामुळे आयुष्य वाढेल. सुख लाभेल, आनंद प्राप्त होऊन बल वाढेल. 

८) समाजात मान सन्मान प्राप्त होईल. 

९) मोठ्यांचा-वृद्धांचा आदर व त्यांची सेवा सुश्रूषा करण्याची भावना निर्माण होईल.

१०) धम्मप्रचारासाठी कार्य करण्याची मानसिक तयारी होण्याची प्रेरणा मिळेल. 

११) आपल्यामध्ये विवेकी नेतृत्व विकसित होईल. 

१२) समाजाला प्रभावित करणारे वक्तृत्व समाजात निर्माण होईल. 

१३) चळवळीचा इतिहास जिवंत ठेवता येईल.

१४) समाजात जागृतीचा विस्तव पेटता ठेवता येईल. 

१५) इतरांसाठी आदर्श ठरेल अशा समाजाची निर्मिती करता येईल.

१६) जातीच्या संकुचित वृत्तीतून बाहेर पडता येईल. 

१७) जातीय भावनेऐवजी राष्ट्रीय भावना विकसित होईल. 

१८) मानसिक, बौद्धीक आणि वैचारिक विकास साधता येईल. 

१९) उद्याच्या पिढीपुढे चांगला आदर्श उभा करता येईल.

२०) सतत संपर्कात असल्याने बौद्धामध्ये संघटन शक्ती निर्माण करता येईल. 

२१) सामाजिक व धार्मिक तसेच राजकीय लढे लढण्यासाठी मनुष्य बळ व द्रव्य बळ निर्माण करता येईल. 

२२) लोकशाही व संविधानाचे संवर्धन करणारा वर्ग प्रत्येक गावात निर्माण करता येईल. 

२३) आपसी हेवेदावे, भांडणे कमी करता येतील. 

२४) बौद्धांची सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक शक्ती उभी करण्यास मदत होईल. 

२५) आपसी सहकार्यामुळे समाजाचा पैसा समाजातच जिरविता येईल. 

२६) गावात सामाजिक लोकशाही अर्थात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही तत्वप्रणाली प्रस्थापित करण्यास मदत होईल. 

२७) बुद्ध विहाराला गाव पातळीवरील बौद्ध विद्यापीठ म्हणून विकसित करता येईल. 

२८) बुद्धविहाराला गाव पातळीवर लोकशाहीचे प्रतिक म्हणून विकसीत करता येईल. 

२९) भारत बुद्धमय करण्याची प्रक्रिया सुरू करता येईल. 

३०) बुद्धविहारांना समाज नियमनाचे केंद्र बनविता येईल. 

३१) बुद्धविहारांना समाज प्रबोधनाचे केंद्र बनविता येईल. 

३२) समस्त बौद्धजन बंधुभावाने नांदतील.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला नुसताच आदेश दिला नाही, तर ते प्रत्यक्ष विहारात गेले. वरील सर्व लाभ त्यांनी मिळविले आणि नंतर आम्हाला सांगितले. ते यासाठीच की, हे सर्व लाभ आपल्या लेकरांनासुद्धा झाले पाहिजे आणि समाज सुखी झाला पाहिजे. त्याचे दारिद्रय दूर झाले पाहिजे. म्हणून प्रत्येक बौद्धाने आपले आद्यकर्तव्य समजून आपल्या कुटुंबासह दर रविवारी बुद्धविहारात जाऊन वरील प्रकारचे लाभ होतात की नाही हे आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून अनुभवावे. जर ते लाभ खरोखरच होत असतील तर निश्चितच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाचे इमाने इतबारे पालन करून आपले जीवन सार्थकी लावावे. हाच बौद्ध जीवन मार्ग होय आणि याच मार्गाने माणसाचे कल्याण होते, मंगल होते आणि माणूस खरा सुखी होतो.


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७.


भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या