जे आकर्षित करतं ते तारुण्य.... जे सम्मोहित करतं ते तारुण्य... जे चैतन्य फुलवितं ते तारुण्य.... संपूर्ण अस्तित्वाशी एकरस होतं ते तारुण्य... जीवनाला आलेलं फुल म्हणजे तारुण्य..... आणि जीवनफुलाचा खरा सुगंध म्हणजे तारुण्य.... परंतु आजच तारुण्य पाहिलं की या तारुण्याला तारुण्य कसं म्हणावं हाच प्रश्न पडतो? तरुणांच्या चित्ताची ही चैतन्यहिन अवस्था पाहिली की, कोमेजून गेलेल्या फुलाचं दृश्य समोर येतं.
आमच्या जवळ तारुण्य असतं तर? यज्ञ, देवी आणि देवतांच्या नावावर करोडो रुपयाचा सत्यानाश झाला नसता. माणूसकीला काळीमा फासणा-या बलात्काराच्या घटना घडल्या नसत्या. दिवसाढवळ्या चो-या, हाणामा-या, डाके आणि दरोडे पडले नसते. क्षुल्लक कारणावरून माणसाने माणसांचे मुडदे पाडले नसते. सगळ्या दुर्गुणांनी पोखरून गेलेल्या या राष्ट्राला वाचवता आलं असतं जर आमच्याजवळ तारुण्य असतं तर!
खरं पाहिलं तर परिवर्तनाची कल्पना सत्यात उतरविण्याची ताकद तरुणांमध्ये निश्चितच आहे. सकारात्मक परिवर्तनाचे कार्य ते अत्यंत प्रभावीपणे करू शकतात यात शंका नाही पण तरुणांच्या सामर्थ्याचा, संवेदन शिलतेचा गैरवापर करून घेणारे द्रोणाचार्य आजही या एकलव्यांच्या अंगठ्याप्रमाणे तरुणांच्या बलस्थानाची छाटणी मोठ्या सफाईनं करीत असल्यानं तरुणातील खरे तारुण्य, खरा जोश लुप्त झाल्यासारखा वाटत आहे. आपल्या देशात जो स्वत:ला नेता, पुढारी अथवा लिडर समजून घेतो त्याची दिनचर्या मोठी अजब आहे. स्वार्थ आणि नुसता स्वार्थ त्याच्या नसोनसी भिनल्यानं लोभ आणि मोहात तो इतका गुरफटून गेला की, तो वेळप्रसंगी प्रेमाचेच काय तर रक्ताचे नातेसुद्धा पायदळी तुडवतो. त्याच्या बोलण्यात बारोमास पूर्ण न होणारी गोड आश्वासने असतात बाराही महिने त्यांच्या चेह-यावर निर्लज्ज हसणे असते. हे लोक बोलण्यात खुपच तरबेज असतात. कसंही करुन आणि काहीही करून संघटनेच्या गोंडस नावाखाली एक फळी उभी करतात. ही फळी एकदाची उभी झाली आणि संपूर्ण फळीचा विश्वास संपादन केला की, मग या नेत्यांचे खरे कार्य सुरू होते. त्या फळीतील तरुणाई रुपी इंधनाला अस्मितेच्या आगपेटीने आग लावून देण्यासाठी प्रक्षोभक भाषणाच्या ज्वालाग्रही रॉकलने भडका उडवून देतात. आणि मग तरुणाईच्या सरणावरती आपल्या सुप्त राजकीय उद्दिष्टांचे स्वादीष्ट भोजन मस्तपैकी फस्त करतात. त्यांची ही खेळी, त्यांचा हा कावेबाजपणा तरुणांच्या लक्षात येऊ नये हे केवढे थोर आश्चर्य? आणि ही त-हा बहूअंशी भारतीय नेत्यांची झाली असल्याने कोण खरा कोण खोटा हे ओळखणे तरुणांना कठीण तर होऊनच बसले त्यातही असाह्य. व्यसनी तरुण त्यांच्याकडे जास्तीत जास्त संख्येने आकर्षित झाल्याने त्या तरुणांना ना त्या नेत्याचे घेणे देणे असते ना त्या संघटनेशी घेणे देणे असते अशा अवस्थेत त्यांना गुंतून ठेवण्यात बहूतेक नेते तरबेज आहेत. तरीही त्याला तारुण्य म्हणावेे काय? आणि ते ही म्हणावं तरी कसं?
ज्यात आग नाही, क्रांतीची ज्वाला नाही, रुपांतराची ताकद नाही जे अन्याय अत्याचार जोरजबरदस्तीनं झुकून जातं त्याला तुम्ही तारुण्य म्हणाल काय? या तारुण्याला योग्य दिशा दाखविण्याचं खरं कार्य करतं ते शिक्षण. परंतू आजचं शिक्षण हे खरं कार्य करण्यात असमर्थ ठरलं आहे. लाखो रुपयाचा चुराडा करून बांधलेल्या टोलेजंग इमारतीमधून दिल्या जात असलेल्या या शिक्षणातून माणसाचं व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य अव्याहत सुरू असले तरी सुद्धा पूर्ण व्यक्तिमत्वात प्रफुल्लीत झालेला एक तरी विद्यार्थी आज दिसतो का? माणसाच्या अंत:करणाची ही अपूर्णतेची अवस्था पाहिली की, शाळा, कॉलेज, शिक्षण आणि मार्गदर्शन हे कोठेतरी कमी पडत आहे असे वाटते. शिक्षण ही एक पवित्र प्रक्रिया आहे. शिक्षण माणसाच्या व्यक्तिमत्वाला पूर्ण उजाळा देतं आज या उजाळा देण्याच्या पद्धतीत कुठेतरी चूक होत आहे असे दिसते.
मॅट्रीक झालेल्या मुलाला विचारा पुढे काय करशील? तर तो म्हणतो मी पुढे कॉलेजात जाईन आणि कॉलेजच्या विद्यार्थ्याला विचारलं तर तोही म्हणतो मी पुढे शिकेन. तर शिक्षण ही एक अशी प्रक्रिया आहे की, शिकणाराचं आयुष्य संपेल पण शिक्षण संपणार नाही. बरं इतकं शिकूनही त्याचे हाती का ? तर उदासी उदासीने ग्रासलेले अंत:करण मोडून तोडून पडलेल्या व्यक्तीमत्वाचा हा तरुण... शोधीत फिरतो नोकरी करिता शिक्षण घेतल्या नंतरही जी मिळत नाही ती नोकरी असा शिक्षणाबद्दल संशय निर्माण झाला आहे. आणि संशयाने ग्रस्त झालेल्या तरुणाकडून राष्ट्रउभारणीची अपेक्षा करणं चुकीचं आहे. जीवनासोबत शिक्षणाची तडजोड झाल्याशिवाय संशयाचे निराकरण होणार नाही. यासाठी प्रत्येक मोहल्ल्यातील, प्रत्येक गावातील व प्रत्येक शहरातील तरुणाने आता तरी भानावर आलं पाहिजे. आपण या भूतलावरील दिसणाच्या न दिसणाच्या असंख्य कोटी जीवांपैकी सर्वात बुद्धिमान आणि विवेकशील प्राणी आहोत याची जाण अंत:करणात जागृत केली पाहिजे. आपण कोण आहोत? किंवा समाजाला आपल्यापासून काय अपेक्षा आहेत? किंवा समाज आपल्यापासून ज्या अपेक्षा करते त्या आपण पूर्ण करतो की नाही? आपल्याच खांद्यावर लोकशाहीचा एक स्तंभ असून तो आपण शाबूत ठेवला आहे का? आपल्या देशात आलेल्या व येणा-या विदेशी कंपन्यांचं खरं गुपीत काय? शिक्षणाचे बाजारीकरण भावी पिढीला कोणत्या स्थरावर नेऊन सोडेल? खाजगीकरण, जागतिकरण कशाची नांदी आहे? भ्रष्टाचारानं हे राष्ट्र आणखी किती पद्धतीनं कसं कसं पोखरलं जात आहे? न्यायपालिकेत आणि पोलिस खात्यात वाढलेला भ्रष्टाचार भविष्यात सामान्य माणसाला जगू देईल की नाही?
या सर्व बाबींचा इमाने इतबारे विचार करून तरुणांना आपली खरी दिशा ठरवायची खरी वेळ आजच येऊन ठेपली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच तुमच्याशी एकरूप होऊन मिळवावे लागतील. त्यासाठी तुम्हाला चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल आणि स्वत:ला जवळ ठेवावं लागेल. नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणा, स्पष्टपणा आणि इमानदारी कायम ठेवली की, कोणतेही कठीण कार्य सिद्धीस जातेच असा थोरपुरुषाचा आदर्श सदा आपल्यासमोर असला पाहिजे. मात्र कोणतेही शिक्षण घेत असताना मन आणि शरीर पवित्र ठेऊन शिक्षा ग्रहण करावी म्हणजे ती आपोआप आत्मसात होते. शिक्षणाचे प्रकांडपंडित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 'ज्या शिक्षणाला शीलाची जोड नाही ते शिक्षण कुचकामी असून तशा शिक्षितांकडून समाजाच्या अपेक्षा पूर्ण होत नसतात आणि त्याच्याही अपेक्षा पूर्ण होत नसतात.
अश्लील हिंदी गाणे मोठ्या आवाजात लावून तो मोबाईल खिशात ठेऊन रस्त्याने ऐटीत चालणा-या बेसावध तरुणांपैकी आमची जात नाही हे समाजाला तुमच्यापासून दाखवावं लागेल. दूरदर्शन किंवा व्हि.डी.ओ. मधील पाश्चात्य संस्कृतीचे हिडीस प्रदर्शन करणा-या जाहिराती व चित्रपट पाहून आपला अमूल्य वेळ फुकट खर्ची करणारे युवक आमच्या वर्गात नाहीत हे तुम्हाला सिद्ध करून दाखवावे लागेल. अन ते ही तुमच्यापासूनच. क्रिकेटच्या सामन्यात भारत हरला काय अन जिंकला काय? याच्याशी आपला कवडीचाही संबंध नसताना आपण तासंतास तो खेळ पाहण्यात आपला अमूल्य वेळ गमावतो. ती शाळा आपली नाही हे तुम्हाला तुमच्यापासून दाखवून द्यावं लागेल. नशील्या पदार्थांच्या किंवा दारुच्या आहारी जाणारी युवा पिढी आमच्या वस्तीत तुम्हाला औषधालाही सापडणार नाही याची खात्री तुम्हाला स्वतः पासून द्यावी लागेल. म्हणून माझ्या तरुण युवकांनो समाज तुमच्याकडे फार मोठ्या अपेक्षा ठेऊन आहे. ज्या समाजात तुमचा जन्म झाला, ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो. ज्या समाजाच्या छत्र छायेखाली आपण वावरलो त्या समाजाचे आपण निश्चितच ऋणी आहोत. त्या समाजाचे ऋण फेडण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे याची खुणगाठ प्रत्येक तरुणानं आपल्या अंत:करणात बांधून अधिक मजबूत केली पाहिजे. हा मान्यतेचा भाग नाही तर तो व्यवहारिक जीवन जगण्याचा खरा मार्ग आहे. प्रत्येक माणूस आपल्या स्वत:च्या विचाराने घडत असतो. म्हणून आपल्या बुद्धीने जसा विचार करतो तो तसेच ठरवून आपल्या बुद्धीने जसा विचार तसा आचार व जसा आचार तशी जीवनात फळे मिळत असतात. माणसाचा विचार हाच ख-या अर्थाने त्याच्या जीवनाला घडवित असतो म्हणून आपले विचार जर श्रेष्ठ असतील तर आपले जीवन श्रेष्ठतम घडेल. मानव समाजातील बौद्ध धर्मीय कसा असावा याबाबत तथागतांनी तरुण युवक सिगालो यास याबाबत महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले आहे. 'मज्झिम निकाय' मध्ये सिगालोवाद सुत्त म्हणून बुद्धाचा उपदेश बौद्ध जगतात सुप्रसिद्ध आहे. सिगालो नावाच्या त्या तरुणाला एकाच दिवशी कळले की, माणूस नावाच्या माणसाचा जगण्याचा व्यवहारिक धर्म नेमका कोणता आहे, आणि त्याने कसे आचरण केले पाहिजे म्हणजे तो माणूस होऊन पुरेल अन उरेलही तेव्हापासून तो तथागतांनी सांगितलेल्या मार्गावर चालू लागला व त्याने आपल्या जीवनाचे सोने करून घेतले. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या बोधीसत्वाची वाणी ऐकून पिटर नावाचा कुत्रा ख-या इमानी कुत्र्यासारखा वागू लागला. त्याला सुद्धा त्याचा व्यवहारिक जीवन जगण्याचा मार्ग सापडला होता. परंतु आमचं जगणं, वागणं, बोलणं, चालणं पाहिलं की, त्या पिटर नावाच्या कुत्र्यापेक्षाही आपली लायकी घसरली की काय ? अशी न जाणो वारंवार शंका का येते हेच कळत नाही.
"text-align: justify;">
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार,
आरती नगर,औरंगाबाद.
मो.नं. ९६७३२९२२९७.
भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !
संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन
0 टिप्पण्या