आमची अध्यात्मिक प्रगती कशी होईल ! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आमची अध्यात्मिक प्रगती कशी होईल ! - भन्ते अश्वजित

धम्मचक्राची कास धरित आम्ही ६६ वर्षाचे झालोत. पण ज्यावेळी आम्ही मागे वळून पाहिले त्यावेळी अध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने आमची ६६ वर्षे पूर्णपणे वाया गेली असे वाटले. कारण जितक्या जोराने आमची शैक्षणिक, आर्थिक, भौतिक, बौध्दिक आणि सामाजिक प्रगती झाली तितक्या वेगाने आमची अध्यात्मिक प्रगती झालीच नाही. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आमचा सर्वागिण विकास अद्यापही झाला नाही. समाज एकजूट असला पाहिजे तो स्वाभिमानी असला पाहिजे. तो समाज धम्ममार्गावर आरूढ असला पाहिजे आणि त्याने धम्म टिकवून ठेवला पाहिजे. इतर लोकांच्या मनात आदर निर्माण होईल अशी समाजाची वर्तणूक असली पाहिजे. बाबासाहेबांना समाजाची अशी प्रगती अभिप्रेत होती.




म्हणूनच १३ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथील श्याम हॉटेलमध्ये तरुण भारतच्या पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी छातीठोकपणे सांगितले होते की, “माझा बौध्द समाज हा आचरणाने ओळखू येईल. त्याचं चालणं, बोलणं आणि वागणं हे उच्च दर्जाच असेल. तो निव्यर्सनी असल्याने तो उच्च जातीचा माणूस म्हणून शोभून दिसेल. तो शीलवान असेल, नितीवान असेल. आणि धैर्यवान असेल!" इथे आज प्रश्न उपस्थित होतो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जितक्या ताकदीने बोलले तितक्या ताकदीने त्यांचा समाज घडला का? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर नाही असेच येते. म्हणून खऱ्या अर्थाने आमची ६३ वर्षे वाया गेली असे म्हणावेसे वाटणे साहजिक आहे. ।


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आम्हाला जागतिक बुध्द धम्म दिला. आणि १५ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी दोन तास भाषण दिले. त्या भाषणात ते एका ठिकाणी म्हणतात 'नरकातून सुटलो !' तर बाबासाहेबांनी आम्हाला हिंदु धर्म नावाच्या नरकातून बाहेर काढले आणि पवित्र अशा बुध्द धम्म नावाच्या स्वर्गात आणले. तेंव्हापासून आमचा चेहरा मोहराच बदलला. पहिली गोष्ट म्हणजे आमची ओळख बदलली. पुर्वी महार म्हणून सांगतांना आम्हाला घृणा वाटत होती आणि स्वतः विषयी तिरस्कार वाटत होता. आता बौध्द म्हणून सांगतांना आम्हाला अभिमान वाटतो. कारण बौध्दांचा इतिहास हा गौरवशाली आहे. आणि बुध्द धम्म हा संपुर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच आता बौध्द म्हणून पाहतांना इतरांच्या दृष्टीकोनात बदल जाणवतो. जशी आमची ओळख बदलली तसेच आमच्या नावात सुध्दा परिवर्तन झाले. इतरांना तुच्छ वाटतील अशीच आमच्या पुर्वजांची नावे होती. चिंध्या, बोंदया, दगडया, नथ्या, कचऱ्या, सु-या, धोंडया, पुंजा इत्यादी. आता मात्र धम्मरत्न, धम्मबोधि, बुध्दपाल, विनयपाल, अश्वजित, रत्नदिप, विश्वजित, प्रेमानंद, अमरदिप, हर्षवर्धन, जयशील प्रणित अशी मुलांची तर मुलींमध्ये पंचशीला, श्रावस्ती, विदिशा, पुष्पलता, रत्नमाला, सुजाता, पूनम, दीक्षा, अनुमती, विशाखा अशी सुंदर नावे आहेत. धम्मक्रांतीने आमच्यात झालेला हा दुसरा बदल होय.


१४ ऑक्टोबर १९५६ च्या अगोदर आमच्या वस्त्यांची नावे महारवाडा, मांगवाडा या पलिकडे नव्हती. आज मात्र आमच्या वस्त्यांची नावे एकतानगर, समतानगर, आदर्शनगर, भीमनगर, दीक्षानगर, भीमवाडी अशी धम्माशी निगडीत असणारी नावे आहेत. १९५६ च्या अगोदर आम्हाला राहायला घरेच नव्हती. मोडकी तोडकी झोपडी असायची ती ही गावाबाहेर. आज गावाच्या किंवा शहराच्या मध्यभागी आमच्या इमारती उभ्या असून त्यांची नावे सुध्दा राजगृह, तथागत अपार्टमेंट, रमाई, भिमाई निवास अशी नावे आहेत. त्याचप्रमाणे आमच्या शहरांची, रस्त्यांची नावे सुध्दा अस्तित्वात आली. म्हणजे एकंदरीत १९५६ नंतर आम्ही पार बदलून गेलो आमचे राहणीमान बदलले, आमचे खाणे पिणे बदलले, आमचे पेहराव बदलले, आमचे अभिवादन बदलले, आमचे साहित्य बदलले, आमच्यात राजकीय बदल झाला. पुर्वी आम्हाला शिक्षण घेण्याचा हक्कच नव्हता आज मात्र शैक्षणिक क्षेत्रात बौध्द समाजाने अशी भरारी मारली की, कोणतेही क्षेत्र बाकी नाही की, ज्यात बौध्दांचा समावेश नाही. अधिकारी, प्राध्यापक, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, वैमानिक, डॉक्टर अशी सर्व क्षेत्रे बोध्दांनी आपल्या बौध्दिक कौशल्याने काबीज करून घेतली. हे सर्व कोणामुळे शक्य झाले तर ते फक्त आणि फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. त्यांनी सिध्दार्थ कॉलेज आणि मिलिंद महाविद्यालयाची जशी स्थापना केली तशी बौध्द समाजाने शिक्षणात गरुड झेप घेतली आणि प्रचंड प्रमाणात शैक्षणिक क्रांती केली.


वरील सर्व बदल घडत असतांना मात्र आमच्या वर्तनात आणि आचरणात सकारात्मक बदल आम्हाला घडवून आणता आला नाही. म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असल्यापर्यंत आमची अध्यात्मिक प्रगती मुळीच झाली नाही. विहारात येणे, वंदना घेणे आणि निघून जाणे याला धम्ममार्गावर वाटचाल मुळीच म्हणता येणार नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जास्तीत जास्त आचरणावर भर देण्याचा आदेश दिला आहे. आमची अध्यात्मिक प्रगती का झाली नाही? याच सर्वात मोठं कारण म्हणजे बाबांच्या पुण्याईने ज्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि जे शिकून सवरून मोठे साहेब झाले. अशा लोकांपैकी मोजक्याच लोकांनी बाबासाहेबांशी, त्यांच्या समाजाशी आणि बुध्दविहाराशी इमान राखले. असे लोक नियमित बुध्द विहारात येतात, समाजात मिसळतात आणि समाजाबरोबर सामाजिक व धार्मिक कार्य करतात. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे आपला स्वाभिमान जपतात. अशा लोकांना भरभरून मंगल कामना. कारण अशा लोकांमुळेच आज धम्म जीवंत आहे.


परंतु त्यापेक्षा जास्त संख्येने असलेला अधिकारी, उद्योजक वर्ग, सधन वर्ग बुध्दविहारापासून अलिप्त आहे. यात पुढारी किंवा नेते म्हणवून घेणारांचे जास्त प्रमाण आहे. हा वर्ग समाजापासून, विहारापासून, बाबांच्या शिकवणीपासून आणि आचरणापासून कोसो दुर आहे. हे लोक कधीच विहारात येत नाही कधी समाजात मिसळत नाहीत, सामाजिक कार्यक्रमात कधी दिसत नाहीत. ते समाजामध्येच स्वतःला उच्च वर्गाचे समजतात. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे समाजापासून आपले काहीच अडत नाही अशी त्यांची चुकीची धारणा झालेली आहे. विहारात जाणे हे रिकामटेकडयांचे काम आहे अशी त्यांची समजूत झाली आहे. पण ज्यावेळी त्यांचे घरी लग्नकार्य होते किंवा मरणधरण होते त्यावेळी मात्र त्यांना समाज आठवतो. आणि अशा प्रसंगीच लोकांना समजूत येते आणि मग ते म्हणतात 'अरे !' हे तर आपले साहेब आहेत? आणि मग लोक आश्चर्यचकित होतात.


अशा प्रकारच्या अहंकारी आणि घमेंडी लोकांमुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. कारण अशा लोकांच्या आजुबाजूला ज्या लोकांचे वलय असते ते सुध्दा त्यांचेच अनुकरण करित असतात. आणि अशा लोकांना एक फार वाईट सवय असते ती म्हणजे हे लोक तर बुद्धविहारात जात नाहीत अन कोणत्या कार्यक्रमातही सहभागी होत नाहीत. पण जे लोक विहारात जातात त्यांची मात्र टिंगल करतात, त्यांना टोमणे मारून नाउमेद करण्याचं महापाप ते करित असतात. त्यामुळे धम्ममार्गावर आरूढ होऊ पाहणाऱ्याच्या मनाचे खच्चीकरण होते. बुध्दविहारात येणाऱ्यांना किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांना अडथळा करणे यापेक्षा दुसरे कोणते मोठे पापकर्म असेल असे वाटत नाही.


ज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौध्द धम्माची दीक्षा दिली त्याचवेळी एक इशारा सुध्दा दिला होता तो म्हणजे "मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ आणि पवित्र असा बुध्दांचा धम्म देत आहे. पण तुम्ही लोकांनी जर धम्माच्या शिकवणीनुसार आचरण केले नाही तर उदया दुसरे म्हणतील हेच म्हणतील की, महारांनी बुध्द धम्म निंदाजनक स्थितीत आणून ठेवला. म्हणून तुम्ही योग्य रित्या धम्माचे पालन केले पाहिजे." याठिकाणी बाबासाहेबांनी धम्माचरण करण्यावर भर दिला आहे. म्हणजेच आम्ही आमची अध्यात्मिक प्रगती साधली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो..


त्यासाठी आम्हाला खालील गोष्टी कराव्याच लागतील.

१) आमचे घरात जमिनीपासून साडेतीन फुट उंचीवर बुध्दरूपाचे अधिष्ठान असावे. जेणेकरून आम्ही आमच्या घरात खुर्चीवर, पलंगावर किंवा सोफ्यावर बसलो तरी बुध्दीमुर्ती आमच्या डोक्याच्या वरच आली पाहिजे.

२) आमच्या घरात आम्हाला दररोज सकाळ-संध्याकाळ त्रिशरण पंचशील आम्ही घेतलेच पाहिजे. आणि त्याचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार आचरण केलेच पाहिजे.

३) दर महिन्याला आम्हाला चार उपोसथ करावेच लागतील (एक पौर्णिमा. एक अमावस्येचा आदला दिवस आणि दोन्ही अष्टमी.) आणि अष्टशीलेचे पालन करावेच लागेल.

४) आमच्या घरातील सर्व सदस्यांना घेऊन आम्ही दर रविवारी बुध्द विहारात गेलेच पाहिजे.

५) बुध्दविहारात किंवा सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात आम्ही कुटुंबासहित उपस्थित राहिलेच पाहिजे.

६) आम्ही सर्वांशी मैत्रीपुर्वक आणि बंधुभावाने वागले पाहिजे. 

७) १४ एप्रिल, १४ ऑक्टोबर, प्रत्येक पौर्णिमा, प्रत्येक अष्टमी आणि प्रत्येक अमावस्या या सहा सणाव्यतिरिक्त आमचे घरात कोणतेही सण साजरे होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली पाहिजे. (म्हणजे हिंदू संस्कृती नुसार येणारे नागपंचमी पासून तो दिवाळीपर्यंत आम्ही कोणतेही सण साजरे करता कामा नये.)

८) आमच्या घरातील सर्व सदस्यांना त्रिशरण पंचाशील, बुध्दपुजा, बुध्दवंदना आणि २२ प्रतिज्ञा पाठ असायलाच पाहिजे. त्याचप्रमाणे त्याचा अर्थ सुध्दा माहित असायला पाहिजे.

९) आमच्या घरातील वयोवृध्दांशी आम्ही आदरयुक्त वागले पाहिजे व त्यांचा मान सन्मान केला पाहिजे.

१०) आमच्या घरातील स्त्री वर्गाशी आणि बाहेरील महिला वर्गाशी आम्ही मानाप्रमाणे वागले पाहिजे.

११) आमच्या घरातील लहान मुलांवर आम्ही धम्माचे योग्य ते संस्कार टाकले पाहिजे. त्यांना धम्ममय मार्गाने जीवन जगण्याची कला शिकविली पाहिजे.

१२) आमच्या घरातील कोणतीही समस्या आम्ही सर्वांनी बसून घरातच सोडविली पाहिजे. किंवा कोणताही निर्णय घरातच सर्वानुमते घेतला पाहिजे.

१३) आमच्या घरामध्ये आम्ही दै. वृत्तरत्न सम्राट हे वृत्तपत्र लावूनच घ्यावे किंवा रोज विकत आणून त्याचे घरातील सर्व सदस्यांनी वाचन केलेच पाहिजे. कारण ते वृत्तपत्र नसून ती एक प्रभावी धम्मचळवळ आहे.

१४) आपल्या घरात भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन चरित्र, रमाई कादंबरी, मिलिंद प्रश्न आणि बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ आणि पुस्तकेच असावी.

१५) आपल्या घरामध्ये नेहमी धम्मिक चर्चा व्हावी.

१६) आपल्या कमाईचा विसावा हिस्सा समाजासाठी दान करावा. कारण जो दान करतो त्याचे दारिद्रय नष्ट होऊन सुख शांती आणि वैभव त्याला शोधीत येत असते.

१७) आपल्या घरातील कलह बाहेर जाणार नाही आणि बाहेरील भांडण आपल्या घरात येणार नाही. याची घरातील प्रत्येक सदस्याने खबरदारी घ्यावी.

१८) विहारात जातांना आपण एकतरी व्यक्ती सोबत नेण्याचा प्रयत्न करावा. तो जर सन्मार्गावर आरूढ झाला तर ते कुशल कर्म निश्चित आपल्या पदरी पडते.

१९) दरवर्षी बुध्दविहारात होणाऱ्या वर्षावासाच्या कार्यक्रमात आमच्या घरातील दररोज एकातरी सदस्याने हजर राहिले पाहिजे.आणि तिथे जे काही ऐकले ते त्याने घरातील इतर सदस्यांना सांगितले पाहिजे.

२०) आपल्या बुध्दविहारात कोणत्याही भन्तेजींचे प्रवचन असो की कोणत्याही प्रबोधनकाराचे प्रबोधन असो त्यासाठी घरातील सर्व मंडळींनी धम्म श्रवण करण्यासाठी गेलेच पाहिजे..

२१) आणि सर्वात शेवटी धम्म पुस्तकात नाही, धम्म ग्रंथात नाही. धम्म विहारात नाही, धम्म मंदिरात  नाही. धम्म वंदनेत नाही, धम्म गाण्यात नाही, धम्म सांगण्यात नाही, धम्म ऐकण्यात नाही. धम्म पाहण्यात नाही, धम्म दिसण्यात नाही, 

धम्म आचरणाशिवाय कुठेच नाही. ही गोष्ट आम्ही पक्की आमच्या लक्षात ठेवली पाहिजे. आचरणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही हेच आम्ही आमच्या अंतःकरणात अगदी खोलवर कोरून ठेवले पाहिजे आणि त्यानुसार वाटचाल केली पाहिजे. म्हणजेच आमचे पाऊल धम्ममार्गावर आपोआप पडेल अर्थातच आमची अध्यात्मिक प्रगती होईल. आमची अध्यात्मिक प्रगती झाली म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला योग्य समाज निश्चित घडेल जो माणसांच्या वस्तीला अधिक शोभून दिसेल.


सर्वांचे मंगल हो!





भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७



भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!












टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

एम जी मोरे म्हणाले…
वंदन भंते जी.....
६३वर्षात बौद्ध समाजाची अध्यात्मिक प्रगती झाली का..? फार छान आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा लेख आहे. सुशिक्षित उच्च पदावर असणाऱ्या बौध्चजन यातून आत्मपरीक्षण करतील असा विश्वास वाटतो. आपण ढोंग करीत आहोत का..? हे तपासणे गरजेचे आहे. आपली आत्म् शुध्दी दर रोज होती का..? आत्माशुध्दी म्हणजे मनाच्या कक्षा वाढविणे, Broaden the True Mind सगळ्यांना सामावून घेणे म्हणजेच बुद्धांचा सत्याचे मार्ग म्हणजे "चार ब्रम्ह विहारात" जगणे. हे आपण किती प्रमाणात करतो..? हे च्यार ब्रह्माविहरच तुमची अध्यात्मिक प्रगतीस कारणीभूत ठरतात.. म्हणून चार चार ब्रह्मविहरचा सराव हा प्रत्येक बुद्ध विहरतून शिकविला गेला पाहिजे. विशेष उच्च पदस्थ विहारात जात नसल्याने त्यांच्या कडून पाप कृत्ये घडत असतात जसे डॉ आंबेडकरांनी उभारले आंबेडकर भवन एका उच पदस्थ गृहस्थाने एका रात्री जमीनदोस्त.केले की ज्याचा बापाला बॅरिस्टर होण्यास.मदत केली होती..! अशा दुर्भागी समाज घटकाचे काय होणार..?