प्रत्येक पौर्णिमा बौद्धांचा पवित्र सण आहे, उत्सव आहे. कारण बुद्ध धम्मात तथागतांच्या जीवनात ज्या काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. त्यांचा प्रत्येक पौर्णिमेशी फार जवळचा संबंध आलेला आहे. या दिवशी प्रत्येक बौद्धांनी आपल्या नजीकच्या बुद्धविहारात जाऊन तिथे उपस्थित असलेल्या भिक्षू कडून अष्टशील ग्रहण करून पुढील चोवीस तासापर्यंत आठ शिलाचे काटेकोरपणे पालन करावे. हीच खऱ्या अर्थाने पौर्णिमा साजरी करण्याची उच्च दर्जाची रीत आहे.
या भूमीवर जे जे बौद्धधर्मीय राष्ट्रे आहेत जसे श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश, म्यानमार, जपान इत्यादी देशात दर पौर्णिमेला सरकारी सुट्टी असते. ती याचसाठी की या दिवशी प्रत्येक बौद्धांना पहाटे (सूर्य उगवण्याच्या आधी) बुद्ध विहारात जाऊन अष्टशील ग्रहण करता आले पाहिजे. अष्टशील ग्रहण केल्यानंतर सर्व लोक घरी जातात आणि आपापली दैनंदिन कामे उरकून पुन्हा विहारात येतात. विहारात ते अकरा वाजेपर्यंत पूजा वंदना घेऊन भिक्खूंची धम्मदेसना श्रवण करतात. अकरा वाजता घरी जाऊन बारा वाजेच्या आत भोजन करतात, थोडा आराम केल्यानंतर पुन्हा विहारात येतात आणि पुन्हा वंदना करून धम्म श्रवण करतात. त्यादिवशी रात्रीचे भोजन करण्याचे नसल्याने पुन्हा ते लोक बुद्ध विहारात येतात आणि रात्री उशिरापर्यंत धम्म श्रवण करतात. म्हणजे पोर्णिमेच्या दिनी त्यांचा संपूर्ण वेळ हा विहारातच जातो आणि असे केल्याने कुशल कर्म तर संचित होते परंतु शारीरिक लाभ सुद्धा होतात.
आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये बऱ्याच लोकांना अष्टशिलाबद्दल माहिती नाही. ज्यांना माहिती आहे ते अष्टशील पालनाकडे लक्ष देत नाही. बरेच भारतीय बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी साक्षगंध, मंगल परिणय, गृहप्रवेश अशासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या उपोसथकर्त्यांचे भोजन दुपारी बाराच्या आत होत नाही. मग काही कट्टर उपोसथकर्ते भोजन घेत नाहीत. तर काहींना नाईलाजाने विकाल भोजन करावे लागते. म्हणून बौद्धांनी या दिवशी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करू नये. कारण पौर्णिमा म्हणजे अष्टशील पालनाचाच दिवस असतो. या दिवशी पालन करावयाचे अष्टशील पुढील प्रमाणे
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि!
म्हणजे मी अष्टशील ग्रहण केल्यापासून कोणत्याही प्राण्यांची कायेने किंवा वाचेने अथवा मनाने हत्या करणार नाही, याउलट मी सर्व प्राणिमात्रांशी मैत्री करील त्यांच्यावर दया करील.
२) अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि!
म्हणजे मी चोरी करणार नाही त्याऐवजी दान करीन.
३) अब्रम्हाचरिया वेरमणी सिक्खापदं समादियामि!
म्हणजे मी लैंगिक विचार करणार नाही तर मी तर मी माझ्या शरीराला आणि मन शुद्ध ठेविण.
४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि!
म्हणजे मी माझ्या वाचेद्वारे कुणाची निंदा करणार नाही, कुणाची चुगली करणार नाही, कोणाशी कठोर बोलून कुणाचे मन दु:खी करणार नाही आणि खोटे बोलणार नाही. तर मी सत्य तेच बोलीन.
५) सुरामेरयमज्ज पमादट्टाना वेरमणी सिक्खापदं समादियामि!
म्हणजे मी कोणत्याही प्रकारची कच्ची पक्की दारू व नशील्या पदार्थांचे सेवन करणार नाही, मी माझे शरीर निर्मळ व पवित्र ठेविल.
६) विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामि!
म्हणजे मी दुपारी बारा वाजेनंतर भोजन करणार नाही अर्थात रात्रीसुद्धा भोजन घेणार नाही म्हणजेच दिवसातून बाराच्या आत एकदाच भोजन घेईन.
७) नच्च-गीत-वादित-विसूक-दस्सन माला गन्ध-विलेपन-धारण मण्डन-विभूसनठाना वेरमणी सिक्खापदं समादियामि!
म्हणजे मी नाच-गाणे-वाद्य अश्लील दृश्य पाहणार नाही, ऐकणार नाही. आणि माझ्या शरीराला या दिवशी मी कोणत्याही सौंदर्य प्रसादनाने सजवणार नाही, केसात फुलांची माला घालणार नाही.
८) उच्च सयना महा सयना वेरमणी सिक्खापदं समादियामि!
म्हणजे मी या दिवशी उंच आसनावर किंवा मौल्यवान आसनावर झोपणार नाही, तर खाली जमिनीवर अंथरून टाकून मी झोपेल. अशाप्रकारे प्रत्येक बौद्धाने प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व जाणून अष्टशीलाचे पालन करून उपोसथ करणे महान कल्याणकारक आहे.
माघ पौर्णिमा म्हणजेच आजच्या दिनी तीन महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत. त्या सुवर्णाक्षरांनी अंकित करून ठेवण्यासारख्या आहेत.
१) तथागत भगवान गौतम बुद्धांनी वैशाली येथे आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली. (इ. स. पूर्व ४८४)
२) भ. बुद्धांनी आपले भिक्षापात्र वैशालीच्या लिच्छविंना भेट दिले. (इ. स. पूर्व ४८४)
३) याच पौर्णिमेला तथागतांचा उपस्थापक राहिलेल्या भदंत आनंदचे परिनिर्वाण झाले.
४) तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतरची आहे, ती अशी की, याच पौर्णिमेला इ. स. १९५८ रोजी तथागत भगवान बुद्ध यांच्या धातू (अस्ति) अवशेषांवर बांधलेल्या स्तुपाचा शोध लागला.
सदधम्म बुद्धविहार,
आरती नगर,औरंगाबाद.
मो.नं. ९६७३२९२२९७
भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...
बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !
संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन
0 टिप्पण्या