धम्मचक्र प्रवर्तनाची सम्यक क्रांती गतिमान असावी. - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धम्मचक्र प्रवर्तनाची सम्यक क्रांती गतिमान असावी. - भन्ते अश्वजित

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ आक्टोबर १९५६ रोजी नागपुरच्या दीक्षाभुमीवर केलेले धम्मचक्र प्रवर्तन, त्यानंतर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी चंद्रपूर येथे संपन्न झालेला धम्मदीक्षा समारंभ यामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुनः प्रवर्तित केलेला बुध्दविचार ही आमची प्रेरणा आहे. ऊर्जा आहे. तिचा विसर पडणे म्हणजे केवळ आत्मप्रतारणा नसून तो आत्मनाशही आहे हे सुध्दा आम्हाला कळेनासे झाले आहे. मी संपुर्ण भारत बौध्दमय करीन." अशी गर्जना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्याला सम्यक क्रांतीचे गंतव्य आहे. हे आम्हाला विसरता येणे शक्य नाही.'

 

Dr. B. R. Ambedkar



आज बुध्दाचा पाडाव करण्यासाठी प्रतिक्रियावादी आणि प्रतिक्रांतीवादी शक्ती गतिमान झालेल्या आहेत. बुध्दगयेच्या महाबोधी-महाविहाराच्या गाभाऱ्यात पिंड स्थापन करणारे, तालिबानमधील बुध्द प्रतिमांचा विध्वंस करणारे, बुध्दगयेत बॉम्बस्फोट घडविणारे, बाबरी मसज्जीत उध्वस्त करणारे, मुंबईवर हल्ला करणारे मालेगाव बॉम्बस्फोट घडविणारे, खैरलांजी हत्याकांड घडविणारे आणि गोध्रा हत्याकांडापासून उना प्रकरणापर्यंत गुजरात पेटत ठेवणारे हे सर्व एकाच प्रवृत्तीचे प्रतिनिधी आहेत. याचे भान आम्ही बाळगले नाही तर आमच्या स्वाभिमानाचे आम्हाला रक्षण करता येणार नाही.


ज्या बुध्दांना आम्ही अनुसरले त्यांच्या संघशक्तीचे जतन करून समाज अधिक बलशाली करून प्रतिक्रांतीवाद्यांच्या जबडयातून बाहेर पडण्याची गरज आहे. हा प्रश्न केवळ बौध्द धम्माची दीक्षा घेण्यापुरताच सिमीत नाही. जे बौध्द आहेत त्यांनी केवळ आपली संघशक्ती केवळ संख्येच्या बळावरच नव्हे, तर प्रज्ञा, आत्मतेज आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातही अधिक भक्कम करण्याची गरज आहे. 'भारतामधील प्रत्येक नागरिक हा हिंन्दू आहे.' अशी डरकाळी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवत 'प्रत्येक भारतीय बौध्दमय व्हावा' अशी प्रतिज्ञा आपण घेऊ या! हा मार्ग जेवढा राष्ट्रोध्दाराचा आहे तेवढाच तो आत्मोध्दाराचाही आहे.


दीक्षाभूमी ही बौध्दांची प्रेरणाशक्ती आहे असे म्हटल्याने अध्यात्मवादाला आम्ही बळी पडलो आहोत अशी मल्लिनाथी आमचे काही विद्रोही विचारवंत करतील. या पवित्र भूमिवर सामान्य जनतेच्या श्रध्दांचा बाजार मांडला जातो अशा प्रतिक्रिया या विद्वानांनी यापूर्वीही व्यक्त केल्या आहेत. दीक्षाभूमीवर येणारे लाखो बौध्द दीक्षाभूमीची माती कपाळाला लावतात त्यामुळे पापक्षालन होते अशी आंधळी श्रध्दा त्यांची नसते. तर ज्या भुमीवर बहुजनांचे कैवारी डॉ. बाबासाहेब यांचे पाऊले लागली ती पवित्र भूमी म्हणून लोक श्रध्देने कपाळाला लेवून घेतात. ज्या मातीने माणसाच्या गुलामीच्या जोखडांना झुगारून दिले, ज्या चातुर्वण्यवादी हिन्दू म्हणजेच ब्राम्हणशाहीने येथे मानसिक व बौध्दिकदृष्टया बहुजनांना अस्पृश्य केले व त्यांच्यावर जनावरांनाही लाजवणारे संस्कृतिहीन जिणे लादले त्यांना पायाखाली तुडवून माणूसकीचा, सद्धम्माचा महान विचार दिला त्या मातीची शपथ घेऊन हे बौध्द बांधव संघर्षरत राहण्याची येथे दीक्षा घेतात. त्यांच्या या समर्पणाला अधिक भक्कम, अधिक प्रेरणादायी आणि शक्तिशाली होण्यासाठी दीक्षाभूमिचे संचालन आणि अन्य बुध्दिवादी मंडळी यांनी या बौध्द बांधवांना नेहमीच प्रेरणादायी नवविचारांची जाणीव करून देण्यासाठी कर्तव्यदक्ष झाले पाहिजे.


१४ आक्टोबर १९५६ हा दिवस काही साक्षात्काराचा दिवस नव्हता. खरे तर बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही साक्षात्कारी घटनांना मानत नव्हते. बुध्दांनी जे धम्मचक्रप्रवर्तन केले त्यासाठी त्यांनी जीवनातील दु:खाचा शोध घेतला व त्यांच्या प्रज्ञेला जे गवसले त्यातून त्यांनी दुःखाच्या विनाशाचे मार्ग प्रवचिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुध्दा अस्पृशांच्या, बहुजनांच्या आणि समग्र मानवमुक्तीच्या लढयाचे अध्ययन करित होते. बाबासाहेबांचे क्षितिज खुपच विस्तारलेले होते आणि सर्व जगाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जाणीवांचे ते वेध घेत होते. त्यांच्या वैचारिक अधिष्ठानावर बुध्दाच्या चरित्राचा, चारित्र्याचा आणि त्यांनी दिलेल्या धम्माचा जबरदस्त प्रभाव होता. या सखोल अध्ययनातूनच त्यांनी आम्हाला खरा बुध्द दिला आणि त्यांचे युगसापेक्ष कल्याणकारी विचारधनही दिले. म्हणूनच त्यांनी केलेले धम्मचक्रप्रवर्तन केवळ धर्मातर नव्हते, केवळ हिन्दू धर्म त्यागण्याची संकुचित अशी त्यांची दृष्टी नव्हती. तो जेवढा निषेध होता हिन्दूधर्माचा त्याच्या कितीतरी पटीने तो बुध्दांच्या सर्जनशील धम्मविचारांचा स्विकार होता, स्वधर्माचा स्विकार होता. 


काही विचारवंत म्हणतात की, हिन्दू धर्मातून अस्पृश्यता आणि जातीभेद वगळले तर हिन्दू धर्मासारखा दुसरा चांगला धर्म दुसरा नाही. ब्राम्हणशाही जोपासणाऱ्यांना असे सारखे वाटत राहते. परंतु हे दुष्टचक्र आहे याचे आम्ही भान ठेवले पाहिजे. हिन्दू किंवा वैदिक धर्माने केवळ ब्राम्हणांच्या कल्याणाचाच विचार केलेला आहे. म्हणूनच तर एकीकडे बुध्दाला ईश्वरी अवतार मानायचे आणि दुसरीकडे त्यांच्या भिक्षूच्या कत्तलीची खैरात वाटायची हा ब्राम्हणी कावा आम्ही समजून घेतला पाहिजे. बुध्द आणि त्यांचे तत्वज्ञान ज्या सामाजिक वातावरणातुन उजागर झाले तेच सामाजिक वातावरण वैदिक वा हिन्दु धर्माचेही असेल. परंतु बुध्दांचे आकलन हे हिन्दू आकलनाच्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने क्रांतीकारी, कल्याणकारी आणि युगसापेक्ष परिवर्तनशील विज्ञानवादी जीवन धारणांच्या संदर्भात अनोखे आहे. त्यामुळेच हिन्दू मानसिकता जपणारा बौध्द ठरूच शकत नाही.


आम्ही धम्मचक्रप्रवर्तनाच्या क्रांतीकारी संदेशाचे संदर्भ आणि त्याचे अर्थ नीट समजून घेतले पाहिजेत. आपला धम्म केवळ जन्म, मृत्यु, विवाह यांच्या संस्कारापुरता सिमित नाही. तो सद्धम्म आहे. म्हणजे या धम्मजाणिवांनी अस्पृश्य, आदिवासी, बहुजन, शेतकरी, कष्टकरी यांच्याप्रमाणेच जगातील समस्त मानवसमूहाच्या मुक्तीचे मार्ग प्रशस्त केले पाहिजेत. धम्मचक्र प्रवर्तनाने भारतीय बौध्दांना व बहुजनांना जागतिक पातळीवर बौध्द राष्टांचेही समान ध्येय आणि सहजाणिवा यांनी युक्त असे बंधुत्व मिळालेले आहे. केवळ बुध्दाच्या मुर्ती आणि स्तुप व विहारे यांच्या निर्मितीसाठी त्यांच्याकडून आर्थिक मदत एवढया सिमित संदर्भात या बंधुत्वाला बंदिस्त न ठेवता भारतीय बौध्दांना जगात सन्मानाने जगता यावे म्हणून आर्थिक, सांस्कृतिक आणि संरक्षणात्मक बाबींच्या संदर्भात हे आदानप्रदान भक्कम केले पाहिजे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुध्द आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाच्या तिसऱ्या खंडामध्ये धम्म म्हणजे काय ? अधम्म म्हणजे काय ? सद्धम्म म्हणजे काय ? ही प्रकरणे बौध्दांनी मन लावून वाचली आणि त्यावर चिंतन, मनन केले की, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्काच्या प्राप्तीसाठी निश्चितच लढे उभे करता येतात. वेगवेगळे समाजघटक समान ध्येयाने प्रेरित होऊन समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी कसे एकत्र येऊ शकतील याचे विश्लेषण करण्याची शक्ती आमच्या विचारवंतांनी हस्तगत केली पाहिजे. सद्धम्माचा विचार हा सामाजिकही आहे, आर्थिक न्याय व समतेचाही आहे. प्रजासत्ताक अशा सांसदीय लोकशाही मूल्यांचाही हा विचार आहे. आणि याच विचाराने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटून सन्मानाने स्वाभिमानाचे जीवन जगता येऊ शकेल.


बुद्धांचे चरित्र आणि चारित्र्य हे निर्मळ पाण्याच्या प्रवाहासारखे आहे. बुध्द म्हणजे करूणेचा महासागर आहे. म्हणून त्यांना महाकारूणिक म्हणतात. बुध्द रंजल्या गांजल्याचे कैवारी, सखा, मित्र आणि मार्गदर्शक होते. जगाच्या इतिहासात अशी माणसे अपवादात्मकच असतात. अशा सम्यक सम्बुध्दांना अनुसरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यापुढे सर्जनशील आदर्श निर्माण केला आहे. बुध्द-बाबासाहेब हे आमच्या सर्वकष मुक्तीचे मार्गदर्शक आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाचे युगसापेक्षत्व आम्हाला टिकवून ठेवायचे आहे. धर्माध शक्तींचे आपल्या पुढे मोठे आव्हान आहे. आमच्या शैक्षणिक आणि धार्मिक विपन्नावस्थेचा गैरफायदा घेण्यासाठी बहजन समाजातील लोकांचे अन्य धर्मात धर्मातर केले जात आहे. धर्म लढयाच्या नावावर हजारो दिन दुबळयांचा नरसंहार होत आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचे उत्तरदायित्व पुन्हा एकदा तपासून पाहिले पाहिजे. धम्मचक्रप्रवर्तनानंतर बौध्दांच्या मानसिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाच्या बाबासाहेबांच्या ज्या योजना होत्या त्यांना निदान आता तरी आम्ही कार्यान्वित केले पाहिजे. 


आमच्या समाजातील प्रबोधनाची प्रक्रिया केवळ वाचाळ राहता कामा नये. बुध्दाच्या सदधम्माची जाणीव झाल्याबरोबर आम्ही आमच्या समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय सांस्कृतिक विकासाच्या कार्यक्रमाचीही निर्मिती केली पाहिजे. बौध्द भिक्खू व उपासक वर्ग यांची प्रशिक्षण केंन्द्रे, विहारामध्ये संस्कार केंद्रे, शैक्षणिक संस्थामध्ये वैचारिक प्रबोधनाचे कार्यक्रम राबवून समाज नेहमीच चिरतरूण ठेवला पाहिजे. त्यादृष्टीने आम्ही अविलंब कार्याला लागले पाहिजे. बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे मार्गदाता आहेत. त्यांनी आम्हाला सन्मार्ग उपलबध करून दिला आहे. त्यावरून आम्हाला मार्गक्रमण करावयाचे आहे. त्यासाठी स्वयं प्रकाशित होऊन आम्ही बुध्द, धम्म व संघ यांच्याप्रती एकनिष्ठ राहून धम्मचक्रप्रवर्तनाची सम्यक क्रांती गतिमान ठेवली पाहिजे.


सर्वांचे मंगल हो!





भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७



भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या