धम्मगुरुंचा आदर करावा! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

धम्मगुरुंचा आदर करावा! - भन्ते अश्वजित

समाज मोठ्या श्रद्धेने पोसत आहे म्हणून भिक्खू दिसत आहे. असे म्हणणे योग्य असले तरी भिक्खू आहे म्हणून समाज खऱ्या अर्थाने जिवंत आहे. हे सुद्धा तितकेच सत्य आहे. याचा प्रत्यय ग्रामीण भागातून जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यासाठीच तथागतांनी समाजाचा आणि भिक्खूचा संबंध एकाच भिक्षापात्राने जोडला आहे. जेणेकरून भिक्खुचा आणि समाजाचा वेळोवेळी संपर्क होईल आणि त्यातून समाजाला योग्य दिशा मिळेल. 



भिक्खू हा अखिल मानवजातीचा शिक्षक असतो. तो मार्गदर्शन करताना जात, धर्म, पंथ, वर्ण, सांप्रदाय असा कोणताही भेद न पाळता सर्वांना मानवतेचा धर्म शिकवितो. या जगामध्ये जगताना माणसाने माणसाशी कसे बोलावे? कसे वागावे? या जीवनात जगत असताना त्याने कसे जगावे? आणि हे जीवन जगताना काय त्यागावे? असा माणसाचा जीवन जगण्याचा खरा व्यावहारिक मार्ग तो शिकवितो. म्हणूनच तो वंदनीय आहे. पूजनीय आहे आणि त्यालाच धम्मगुरु (धर्म गुरु नव्हे) असे म्हणतात. अशा धम्मगुरुंना ते दिसताक्षणीच 'वंदामि भन्तेजी' म्हणत आपले दोन्हीही हात छातीशी जोडून आणि शरीराला थोडेसे वाकवून त्यांना अंजलीबद्ध प्रणाम करावा. कारण झुकणे, वाकणे हे जिवंतपणाचे लक्षण असते. याउलट ताठ राहणे हा मुडद्याचा स्वभाव आहे. म्हणून फोनवर अथवा मोबाईलवर बोलतानासुद्धा 'वंदामि भन्तेजी' म्हणतच आपल्या बोलण्याची सुरुवात करावी. भन्तेजी जर कोठे निवांत बसलेले असतील आणि आपल्याला वेळ असेल तर त्यांना पंचाग प्रणाम करावा. कारण त्यांना पंचाग प्रणाम केल्याने फायदा आमचाच होईल.


ज्यावेळी आम्ही पंचाग प्रणाम करून बुद्ध, धम्म, संघाला तीन वेळा अभिवादन करतो. त्यावेळी त्याचा अर्थ हे धरतीमाता तुला साक्ष ठेवून मो बुद्धाला शरण जातो. हे धरतीमाता तुला साक्ष ठेवून मी धम्माला शरण जातो हे धरती माता तुला साक्ष ठेवून मी संघाला शरण जातो, असा होतो. जगातील सर्वश्रेष्ठ रत्नांना कितीही वेळा वंदन केले, तरी कल्याण आमचेच होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या जगातील सर्वात महान, या जगातील सर्वात पवित्र आणि तत्काळ फळ देणारा बुद्धमय आम्हाला देऊन आज तब्बल ६४ वर्षे झालीत. तरीही आमच्या धम्मगुरुंना काय म्हणावे लागते? हे माहित नसणे म्हणजे आमच्यासारखे अज्ञानी आम्हीच. याबाबतीत ग्रामीण भाग मात्र शहरी भागापेक्षा खूपच पुढे आहे. असे प्रत्यक्ष दिसून येते. ग्रामीण भागातील मायमाऊल्या भिक्खु दिसताक्षणीच त्यांना 'वंदामि भन्तेजी' म्हणत आदरपूर्वक नमस्कार करतात. काही महिला तर रस्त्यावर पंचाग प्रणाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी त्यांना बरेच समजावून सांगावे लागते. 


लहान मुलांचेही तसेच भिक्खू गावात आल्यानंतर सर्व मुले-मुली त्यांच्या भोवती जमा होवून 'वंदामि भन्तेजी' म्हणत पटापट अभिवादन करतात. महिला चहापाणी देऊन विचारपूस करतात. तेवढ्याने भिक्खूला बरे वाटत असते. कारण समाजाशिवाय या जगात त्याचे दुसरे कोणीही नसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकदा म्हणाले होते, मी दिलेला धम्म टिकवून ठेवण्याचे काम ग्रामीण भागातील अशिक्षित महिला इमाने इतबारे करीत आहेत आणि यापुढे सुद्धा करतील असा मला विश्वास आहे. डॉ. बाबासाहेबांचे हे विधान किती सत्य आहे, याची सत्यता प्रत्यक्ष ग्रामीण भागातून आजही फिरले म्हणजे दिसून येते. याउलट शहरी भागातील महिलांची स्थिती आहे. काही शहरातून काही महिला मंडळे जागृत असल्याने त्यांनी थोड्याफार प्रमाणात धम्म टिकवून ठेवल्याचे दिसते. 


शहरातील काही महिला तर आपल्या वस्तीत भिक्खू आला असता त्या खिडकीतून किंवा दारातून अशा पाहतात की, त्या जणू बौद्ध समाजाच्याच नाहीत. त्यांच्या घराच्या दारावर पाहिले तर भलं मोठं धम्मचक्र, कोणाच्या दारावरच्या चौकटीत, तथागत बुद्धाचे आणि डॉ. बाबासाहेबांचे फोटो लावलेले पण भन्तेजींना वंदामि तर सोडाच साधं बोलतसुद्धा नाहीत. त्यामुळे त्या भीमनगरात जाणाऱ्या भिक्खूला घरं भीमाची तर दिसतात, परंतु त्यात राहणारी भीमाची लेकरे कुठेच दिसत नाहीत. त्यावेळी मनामध्ये प्रश्न उपस्थित होतो की, त्यांना कळत नाही की, त्या जाणिवपूर्वक तशा वागतात. काही वस्त्यांतून गेले म्हणजे काहींची लहानमुले मात्र भंतेजी आले, असे म्हणतात... परंतु तत्क्षणीच त्यांच्या आईने किंवा बापाने वटारलेले डोळे त्या निष्पाप बालकांचे पुढचे शब्द तलवारीसारखे छाटून टाकतात. असा प्रसंग मात्र चक्रात टाकणारा आहे.


भिक्खू हा दुसरीकडे कुठे तयार होत नसतो. तर तो समाजाचाच एक घटक असून, समाजातूनच आलेला असतो. काही भिक्खू लहान वयातच प्रवज्जित झालेले असतात काही मध्यमवर्गीय संसार, घरदार, आई बाप, पत्नी, मुले आणि संपत्तीचा त्याग करून धम्मकार्य करण्याच्या उद्देशाने प्रवज्जीत होतात तर काही उतार वयात भिक्खू बनतात. असे भिक्खू बुद्धांच्या काळातही होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील. बसस्थानकावर, रेल्वे स्टेशनवर किंवा गदींच्या ठिकाणी भिक्खू सहज ओळखू येतो. त्याने केलेले मुंडन, परिधान केलेले चिवर, हातात असलेले भिक्षापात्र आणि खांद्यावर अडकविलेली बॅग सर्वसामान्यांपेक्षा तो वेगळा दिसतो, वेगळा असतो. 


बौद्ध लोक आपसात एकमेकांना भेटल्यानंतर जयभीम करतात. कोणी अदबशीरपणे प्रतिउत्तर देऊन जयभीम करतात, कोण एका हाताने करतात, कोणी नुसतेच जयभीम बोलतात, कोणी नुसती मान खालीवर करतात. हा लोकधर्माचा शिष्टचार झाला. परंतू जो विनयाने बांधलेला आहे. ज्याने वैराग्य पत्करलेले आहे. ज्याने त्याग केलेला आहे, तो धम्मगुरु होय, म्हणून त्यांना वंदामि भन्तेजी म्हणावे, कारण भिक्खू आणि गृहस्थामध्ये जसा फरक आहे तसा त्यांच्याशी केलेल्या शिष्टाचारातसुद्धा फरक असायलाच पाहिजे. जर आपण भिक्खुला सुद्धा जयभीम भंते म्हटले, तर गृहस्थी लोकांमध्ये आणि भिक्खूमध्ये कोणता फरक उरला? आणि इतर लोकांना काय वाटेल? आपल्या धम्मगुरुंचा आपणच आदर केला नाही तर कोण करेल? बऱ्याच लोकांना आजही माहीत नसल्याने ते जयभीम भंते साहेब म्हणतात काही लोक पाय लागू भिक्खू महाराज म्हणतात. काही भागात भंतेजी बाबा म्हणतात, काही भागात नमस्कार भंतेजी म्हणतात, तर काही लोक जाणूनबुजून भिक्खूना जयभीम भते म्हणतात... 


त्यावर भिक्खू त्यांना सुखी हो, मंगल होवो. असे म्हणतात मग मात्र तो दरडावणीच्या सुरात भिक्खूला म्हणतात, का हो भन्तेजी आपण जयभीमचा अपमान का केला? तुम्हाला माहित आहे जयभीम म्हणजे काय? असे बोलून मग ते जयभीमची लांबलचक व्याख्या सांगतात. (वास्तविक : त्यांनाच जयभीमचा जन्म कधी झाला, त्याचा जनक कोण आहे आणि जयभिमच खरा अर्थ काय आहे, यातील काही एक माहीत नसते) त्यावेळी ते बोलत नसतात, तर दोन बुके वाचून त्यांच्यामधील निर्माण झालेला अहंकार बोलत असतो. त्यांच्यातील घमेंड आणि मीपणा बोलत असतो. आपण भिक्षूपेक्षा काय कमी आहोत असा त्याचा गैरसमज बोलत असतो. परिणामी ते धम्मगुरुला आपल्या बरोबरीचा समजून जयभीम करीत असतात. काही महाशय तर हात मिळविण्यापर्यंत मजल मारतात. तसे करण्यात त्यांना कोण मोठेपणा वाटतो कुणास ठाऊक? स्वत:ला उपासक म्हणवून घेणारे असे लोक गृहस्थीच्या व्याख्येतही बसत नसतात. याउलट मात्र काही प्रसिद्ध साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, कलावंत, वकील, न्यायाधिश, उच्च पदावर असलेले क्लासवन अधिकारी आणि संपादक मंडळी भिक्खूशी मोबाईलवर बोलताना अदबशीरपणे वंदामि भंतेजी म्हणून आपल्या बोलण्याची सुरुवात करतात. कारण त्यांना माहित आहे की, शेवटी धम्मगुरु हे धम्मगुरू  असतात आणि ते आपल्यापेक्षा उच्चस्थानी असतात. 


इथे काही लोकांचे म्हणणे असे येईल की, जे चिवरधारी भिक्खूच्या संज्ञेला पात्र ठरत नसतील, जे भिक्खू तथागतांच्या शिकवणीप्रमाणे विनयाप्रमाणे आचरण करीत नसतील, जे भिक्खू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या भिक्खू वर्गाच्या संकल्पनेत बसत नसतील. जे भिक्खु बुद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे काम सोडून ब्राह्मणासारखे विधी करण्याचे काम करीत असतील. जे भिक्खू ज्यांच्यामध्ये विनय, शांतता आणि सहनशीलता नसेल, तरीही त्यांना वंदामि भंतेजीच म्हणावे काय? यावर माझे उत्तर होय असेच राहील. 


मी  भिक्खू आहे म्हणून नाही तर तो आपला शिष्टाचार आहे आणि त्याच्या अंगावर असलेल्या दहा पारमितायुक्त चिवराचा तो सन्मान आहे. उरता प्रश्न उरला त्या भिक्खुचा तर बुद्ध म्हणतात, "कराल ते भराल अन्पे राल तेच उगवेल या निसर्गनियमानुसार प्रत्येकालाच आपापल्या कर्माचे बरे वाईट फळ इथेच मिळत असते. मग तो गृहस्थ असो, उपासक असो, श्रामणेर असो, भिक्खु असो, थेरो असो की महाथेरो असो त्यामुळे ज्याचं पापपुण्य तो पाहत बसेल. आपण मान धम्मगुरू या नात्याने आपले काम करावे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरसुद्धा १४ ऑक्टोबर १९५६ रोजी गुरु चंद्रमणीकडून दीक्षा घेण्यापूर्वी पाच लाख जनसमुदायासमक्ष आपल्या धम्मगुरांपुढे झुकले होते. वास्तविक त्या दोघांत विद्वत्तेच्या बाबतीत जमीन आसमानाचे अंतर होते. ही गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे.


सर्वांचे मंगल हो!


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, 

आरती नगर,औरंगाबाद.

मो.नं. ९६७३२९२२९७










भन्ते अश्वजीत यांचे आणखी लेख वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा...

बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 

दुःखाचे कारण आणि उपाय  सर्वप्रथम बुद्धांनीच सांगितले!












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या