बुद्ध धम्मामध्ये कोणताही धार्मिक विधी असो, मग तो घरगुती असेल, बुद्धविहारातील असेल किंवा सार्वजनिक ठिकाणचा असेल तेव्हा सर्व ठिकाणी त्रिशरण पंचशीलापासून कार्यक्रमाला सुरुवात होते. (जी बुद्ध धम्मातील सर्वात महान आणि पवित्र अशी गाथा आहे.) आणि धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता केल्या जाते. ही बुद्ध धम्माची परंपरा २५०० वर्षांपासून चालत आलेली आहे आणि ती यापुढे सुद्धा चालू राहणार आहे. यामधील धम्मपालन गाथा शेवटच्या चरणात आपल्याला काय संदेश देते किंवा काय शिकवण देते. याकडे जरा बारकाईने पाहिलं ती गाथा अशी.
नात्थिमें सरणं अय्यं, बुद्धो में शरणं वरं
एतेन सबवज्जेनं, होतु मे जयमंगलं ।।१।।
नात्थिमे सरणं अय्यं, धम्मो में शरणं वरं
एतेन सबवज्जेनं, होतु मे जयमंगलं ।।२।।
नात्थिमे सरणं अय्यं, संघो में शरणं वर
एतेन सबवज्जेनं, होतु मे जयमंगलं ।।३।।
वरील तीनही गाथांचा अर्थ असा आहे की, बुद्ध धम्म संघ हेच माझे श्रद्धास्थान आहे. आश्रयस्थान आहे आणि शरणस्थान आहे. यांच्याशिवाय मला कोणताही दुसरा आधार नाही किंवा आसरा नाही. म्हणून मी या त्रिरत्नाशिवाय माझ्या शरिराला कुठेही झुकविणार नाही. वाकविणार नाही जे जर सत्य असेल तर त्या सत्यवचनाने माझे जयमंगल होणे, कल्याण होवो.
या गाथांचा इतका सरळ अर्थ असताना आणि तो त्यांना समजत असताना समाजातील सुशिक्षित वर्ग, कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्ग असा पाहण्यात आला की, जे दररोज ही गाथा बुद्धविहारात येऊन म्हणतात, मात्र सकाळी आपल्या घरी कुणी साईबाबा, कुणी गुणवंत महाराज, कुणी गजानन महाराज, कुणी हिंदू देवी देवतांना नतमस्तक होतात. तर कुणी न चुकता दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन पुजा करतात. अशा लोकांना बुद्धविहारात धम्मपालन गाथा म्हणतांना पाहिले की, असे वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिकलेल्या बाबत जे बोलले होते ते हेच महाभाग होत. शिकलेले असूनही त्यांना त्या गाथेचा कवडीचाही अर्थ समजू नये याचे नवल वाटते. त्यामानाने अशिक्षित लोक शंभर पटीने बरे! कारण त्यांना त्या गाथांचा अर्थ इतका खोलवर तर समजत नाही. तरीही ते बुद्ध, धम्म, संघाशिवाय कुणापुढे तर झुकत नाहीत आणि कुण्या मंदिरातही जात नाहीत. ते लोक पक्के बौद्ध आहेत असे दिसून येते. मात्र समाजात हा वर्ग संख्येने कमी आहे. तसेच जो वर्ग खराखुरा सुशिक्षित आहे. ज्याने बावीस प्रतिज्ञा पूर्णपणे समजून घेतल्या आहेत. तो हाताच्या बोटावर मोजण्याइतका वर्ग स्वाभिमानी आहे. हे दोन वर्ग सोडले तर बाकीच्यांच्या बाबतीत ना शिकले धड ना राहिले असे म्हणणे अतिशोक्ती ठरू नये.
या गाथेला दुसऱ्या बाजूने पाहू या, तर बुद्ध, धम्म, संघाशिवाय माझे चौथे कोणतेही शरणस्थान नाही आणि म्हणून त्रिरत्नाला शरण गेल्यानेच माझे जयमंगल होवो. असे सकाळ-संध्याकाळ निव्वळ म्हणत राहिल्यानेच जयमंगल मुळीच होणार नाही तर तसे आचरण करावे लागेल. तर सर्वप्रथम आपल्याला तीन रत्न समजून घ्यावे लागतील. त्यापैकी पहिले रत्न म्हणजे बुद्ध होय. तर बुद्धाला शरण जाणे म्हणजे काय? तर बुद्ध म्हणजे ज्यांना सम्यकसम्योधि प्राप्त झाली आहे. बुद्ध म्हणजे जे स्वयंप्रकाशित आहेत. बुद्ध म्हणजे जन्म मरणाच्या दु:खद भवचक्रातून मुक्त झालेले सत्व बुद्ध म्हणजे प्रत्येक चल अचल वस्तुंचा उदय त्यांची स्थिती आणि त्याचा अंत जाणणारी दिव्यदृष्टी तर बुद्ध कोण्या व्यक्तीचे नाव नसून ते मनाच्या सर्वोच्च स्थितीचे अथवा अवस्थेचे नाव आहे. अशा प्रकारे बुद्धाला शरण जाणे होय.धम्माला शरण जाणे म्हणजे काय? तर धम्म म्हणजे निती, निती म्हणजे सदाचरण, सदाचरण म्हणजे पापाला भिणे, पापाला भिणे म्हणजे पंचशीलेचे पालन, पंचशीलेचे पालन म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे निती म्हणजेच पंचशीलेचे काटेकोरपणे पालन करून खया जीवन जगण्याची कला हस्तगत करणे होय आणि अशा उच्चत्तम जगण्याला शरण जाणे होय.
संघाला शरण जाणे म्हणजे काय? तर संघ म्हणजे लोकांचा समूह परंतु कोणत्या लोकांचा समूह जो भगवंताचा श्रावक संघ बनलेला आहे. जो सन्मार्गावर आरूढ आहे. जो संघ श्रोतापती, सकृदागमी, अनागामी व अर्हत अशा चार जोड्यात विभाजित असलेल्या आठ प्रकारच्या श्रेष्ठ पुरुषांनी बनलेला आहे. असा भगवंतांचा श्रावकसंघ जो प्रणाम करण्यास, स्वागत करण्यास, आमंत्रित करण्यास आणि दान देण्यास योग्य असून जगातील सर्वश्रेष्ठ संघ आहे आणि अशा श्रावक संघाला शरण जायचे आहे आणि अशा पद्धतीने जर आम्ही इमाने इतबारे बुद्ध, धम्म आणि संघाला शरण गेलो तरच आमचे जयमंगल होईल.
एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य हे आहे की, आम्ही म्हणतेवेळी बुद्ध, धम्म, संघ अशा सर्वोत्तम आणि सर्वोच्च शिखराला शरण जातो असे म्हणतो आणि प्रत्यक्ष कृतीत शेंदूर माखलेल्या दगडधोंड्यासहित, अवलिया, बाबा, महाराज, देवी-देवता यांना नतमस्तक होत असू तर म्हणायचे उच्च आणि कृती मात्र निच करायची अशातला प्रार होईल. आणि त्यामुळे जयमंगल तर दूरचपण साधे सुखही मिळणे दुर्मिळ होईल म्हणूनच बौद्ध समाजाकडे पाहिलं की, जयमंगल कुठेच दिसत नाही. अशा दोगलेपणाने ते यापूर्वीही झाले नाही आणि पुढेही होणार नाही. म्हणून आम्ही इमाने इतबारे बुद्ध, धम्म, संघाला शरण गेलो पाहिजे. तरच बौद्धवस्तीचं चित्र बुद्धनगरीसारख शोधून दिसेल आणि सर्वांचे जयमंगलही होईल.
भन्ते अश्वजित
सदधम्म बुद्धविहार, आरती
नगर, औरंगाबाद
मो. नं:- ९६७३२९२२९७
बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !
संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन
0 टिप्पण्या