डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाची जाण ठेवा! - भन्ते अश्वजित

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागाची जाण ठेवा! - भन्ते अश्वजित




पंजाब दौऱ्यावर केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे निवडणुकीचे भाषण आहे त्यांनी हे भाषण २७ ऑक्टोबर १९५१ रोजी रामदासपूर, जालंधर येथे केले. त्या भाषणामध्ये ते म्हणतात, "परदेशातून अर्थशास्त्राची उच्च पदवी धारण करून येणारा केवळ अस्पृष्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातून मी पहिला माणूस होतो. मी मुंबईत उतरल्यावर ताबडतोब मुंबई सरकारने मला राज्य-अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाची नोकरी देऊ केली. मी ती नोकरी स्वीकारली असती तर आज मला फार मोठा पगार मिळाला असता. परंतु मी ती नोकरी नाकारली. कारण मला माहित होते, की तुम्ही एखादी सरकारी नोकरी पत्करल्यावर स्वभावत:च लोकांची सेवा करण्याच्या तुमच्या इच्छेवर बंधने येऊन पडतात. माझा उदरनिर्वाह होऊन स्वतंत्र असावे म्हणून कायद्याच्या शिक्षणासाठी एक किंवा दोन वर्षानंतर मी पुन्हा इंग्लंडला गेलो. आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या कोणावरही जो अवलंबून नसतो तोच माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो.


'बार-ॲट-लॉ' ची पदवी प्राप्त करून इंग्लंडमधून परत आल्यावर पुन्हा मला डिस्ट्रिक्ट जज्जच्या जागेचे, तीन वर्षाच्या आत हायकोर्ट जज्जाच्या जागेवर पदोन्नती करण्याचे आश्वासन देऊन नेमणूक करण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. त्याकाळी माझे मासिक उत्पन्न १०० रुपये सुद्धा नव्हते. अत्यंत गरीब लोकांसाठी मुद्दाम बांधलेल्या मुंबईतील एका चाळीतील एका खोलीत  त्यावेळी मी राहत होतो. परंतु ही जज्जाची  फार मोठ्या पगाराची होती. तरी जन्मभर मला पैशाची ददात भासणार नव्हती. तरीसुद्धा ती जागा मी नाकारली. कारण ती जागा मी स्वीकारली असती तर स्वभावत:च माझ्या आयुष्याचे ध्येय गाठण्यात म्हणजे माझ्या लोकांची उन्नती करून त्यांची स्थिती सुधारण्याच्या माझ्या अंगीकृत कार्यात अडचण निर्माण झाली असती.


१९४२ साली पुन्हा एकदा अशाच प्रसंगाशी मला सामना करावा लागला. आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकणारी आणि दहा वर्षे नोकरी झाल्यावर पुढील आयुष्य मी सुखासमाधानात  घालवू शकलो असतो अशी हायकोर्ट जज्जाची जागा मला देऊ करण्यात आली. व्हाइसरॉयच्या कौन्सिलमध्ये सुद्धा जागा देण्याची मला आश्वासन देण्यात आले. माझे जीवनध्येय डोळ्यापुढे ठेवून मी दुसरी जागा स्वीकारली. प्रत्येकाने आपल्या लोकांची सेवा करण्यात आपले आयुष्य वेचले पाहिजे व सेवेतच मरण पत्करले पाहिजे!"


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वरील भाषण प्रत्येकाने काळजीपूर्वक, मन लावून आणि अंतर्मुख होऊन वाचावे आणि त्यांनी लोभ, मोह कसा बाजूला सारला याचाही अभ्यास करावा. केवळ समाजासाठी आणि केवळ समाजासाठी ते कसे जगले हे सुद्धा अभ्यासावे. म्हणून खरोखर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा 'पिता' नाही असेच म्हणावे लागेल.


आम्ही त्यांना बाबासाहेब म्हणतो म्हणजेच आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लेकरे आहोत असे आम्ही समजतो. खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही समाजासाठी काय करतो?  हा प्रश्न आपल्या सर्वांपुढे उभा आहे. खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग म्हणजे त्यागच आहे. त्यांच्या मनामध्ये जराही अभिलाषा निर्माण झाली नाही. त्यांनी मोहाला, लोभाला आवरून सावरून आपल्यासाठी केवळ आपल्यासाठी कसे कष्ट घेतले आणि आपल्याला उजेडात आणले माणसात आणले. म्हणून १४ एप्रिल दिनी त्यांची जयंती साजरी करताना आम्ही यातील काहीतरी घेतले पाहिजे आणि आयुष्याची पुढील वाटचाल चालले पाहिजे. एवढेच याप्रसंगी सांगणे.




भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, आरती

नगर, औरंगाबाद

मो. नं:- ९६७३२९२२९७


बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या