देवदत्ताने बुद्धावर नालागिरी हत्ती सोडला तो दिवस... - भन्ते अश्वजीत

Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

देवदत्ताने बुद्धावर नालागिरी हत्ती सोडला तो दिवस... - भन्ते अश्वजीत

फोटो सौजन्य गुगलhttps://khaasre.com/wp-content/uploads/2017/09/buddha-and-elephant-nalagiri.jpg




बुद्ध कालामध्ये अनेक राजे, श्रेष्ठी, महाश्रेष्ठी बुद्ध वाणी ऐकून त्यांचे उपासक बनत असत. त्यांचप्रमाणे कोशल नरेश तथागताचा उपासक झाला होता. त्याच्या राज्यातील रयतेने धम्मदीक्षा घेतली होती. उपासकात तथागतांची लोकप्रीयता व भक्ति वाढली होती. लोक भगवंताची सेवा करित होते. सर्वांनी आपली श्रद्धा तथागत चरणी ओतली होती, देवदत्तास इर्षा वाटत होती. तो मनात जळत होता. बुद्धास संघातून दूर सारून आपण धम्म प्रमुख व संघ प्रमुख व्हावे अशी स्वप्ने तो पाहत होता. त्यासाठी त्याने कपटनीती स्विकारली. द्वेष त्याच्या मनात खदखदत होता. तो बेचैन होता. मगधनरेश बिंबिसार यांचा मुलगा अजातशत्रु यास आपल्या कटात सामिल करून त्याने बिंबिसारास कैदेत टाकण्यास सांगितले. अजातशत्रूने तसेच केले व तो राजगादीवर बसला. 


एकदा श्रमण देवदत्त भगवान बुद्धाकडे आला आणि म्हणाला -"श्रमण गौतम ! आपण आता वृद्धत्वाकडे झुकला आहात. विशाल भिक्खूसंघाची देखरेख करणे आता आपल्याला शक्य होणार नाही. तेव्हा आपण मला आपला उत्तराधिकारी नेमावा." भगवंत म्हणाले . माझ्या पश्चात माझा धम्मच माझा दायाद (उत्तराधिकारी) व मार्गदर्शक असेल." आपल्याला संघप्रमुख न करता सारिपुत्त आणि मोग्गलायनांना ते स्थान दिले ह्याबद्दल देवदत्ताचा भगवान बुद्धावर रोष होता. त्याने संघातील आपल्या विचारांचे अविनयशील भिक्खू घेऊन वेगळा संघ स्थापन केला. देवदत्ताने भगवान बुद्धांवर तीनदा प्राणघाताचे प्रयत्न केले; पण एकदाही यशस्वी झाला नाही.एकदा बुद्ध पर्वताच्या पायथ्याशी चक्रमण करीत असतांना देवदत्ताने एक मोठा दगड खाली लोटून दिला. पण तो एका खडकावर आदळला आणि तिथल्या तिथे गाडला गेला. फक्त त्याचा एक लहान तुकडा तथागतांच्या पायावर येऊन आदळला आणि त्यामुळे थोडे रक्त आले. त्या जखमेवर वैद्य जीवकाने  उपचार केला. 


त्याने दुसऱ्यांदा भगवान बुद्धाचे प्राणहरण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी देवदत्त राजकुमार अजातशत्रूकडे गेला आणि म्हणाला - "मला थोडे लोक दे." आणि अजातशत्रूने आपल्या लोकांना आज्ञा केली. “ देवदत्तं तुम्हाला सांगेल तसे करा.  मग देवदत्ताने एकास आज्ञा केली "जा मित्रा श्रमण गौतम अमुक जागी आहेत. त्यांची हत्या करा." आणि तो मनुष्य परत आला आणि त्याला म्हणाला मी तथागताचे प्राण हरण करण्यास असमर्थ आहे." देवदत्ताने तथागताचे प्राणहरण करण्याचा तिसरा प्रयत्न केला. ह्यावेळी राजगृहात नालागिरी नावाचा एक क्रूर नरघातक हत्ती होता. देवदत्त राजगृहातील हत्तींच्या तबेल्यात गेला आणि रक्षकांना म्हणाला - “ मी राजाचा नातेवाईक आहे. आणि मी कुठल्याही नीचपदस्थ व्यक्तीला उच्चपदी चढवू शकतो. मी त्याचा शिधा किंवा पगार वाढवू शकतो." "तेव्हा माझ्या मित्रांनो ! जेव्हा श्रमण गौतम पिण्डपाताकरीता ह्या सडकेवर येतील तेव्हा नालगिरीला मुक्त करा आणि सडकेवर जाऊ द्या." अजातशत्रुच्या गजशाळेतील नालगिरी नावाच्या मदमस्त हत्तीस भरपूर मद्य पाजून, त्याच्या माहूतास महाराजांकरवी बढती मिळवून देण्याचे व पगार वाढवून देण्याचे आमिष दाखवून नालागिरी हत्ती भगवान बुद्धाच्या अंगावर सोडला. त्यास अडविण्याचा भदन्त आनंदाने प्रयत्न केला पण त्यास तो न जुमानता बुद्धाच्या दिशेने चाल करून येत होता. आनंदास थांबवून स्वत: भगवान बुद्धाने आपल्या मैत्रीभावनेच्या संपन्न चित्ताने त्या हत्तीच्या चित्तास संयत करून एक हात उंचावून त्यास आशिर्वाद दिला. व “शांत हो !" एवढे म्हटल्या बरोबर बेभान झालेला पिसाळलेला हत्ती शांत झाला. 


सम्बुद्धाच्या तेजोबल व आत्मबलापुढे तो हत्ती नतमस्तक झाला. या संदर्भात जयमङ्गल अष्टगाथेत गाथा क्रमांक तीन मध्ये म्हटले आहे. "मुनिन्द्र बुद्धाने दावाग्नि चक्र व विजेप्रमाणे अत्यन्त भयानक उन्मत्त अज्ञा नालागिरी हत्तीला आपल्या मैत्रीरूपी शीतल जलाची वर्षा करून शांत केले." धम्मपदात म्हटले आहे - “ कोणी काठीने, कोणी अंकुशाने, कोणी चाबकाने जनावरांचे दमन करतात. परन्तु तथागताने काठीवाचून कोणत्याही शस्त्रावाचून हत्तीचे दमन केले." पिसाळलेला नालगिरी हत्ती तथागतांच्या चरणावर नतमस्तक झाला. देवदत्ताचे सर्व प्रयत्न फसले. जेव्हा हे सर्व प्रयत्न उघडकिस आले तेव्हा देवदत्ताला प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक नेमणुका रद्द झाल्या आणि नंतर अजातशत्रूनेही त्याला भेटीगाठी नाकारल्या. उपजीविकेसाठी त्याला दारोदार भीक मागावी लागली. देवदत्ताला अजातशत्रुकडून पुष्कळ नजराणे प्राप्त झाले होते; पण ते फार दिवस टिकू शकले नाहीत. नालागिरी प्रकरणानंतर राजा अजातशत्रुने त्याला भेटीगाठी नाकारल्या. आपल्या कृत्यांमुळे अप्रीय झाल्यामुळे देवदत्त मगध देश सोडुन कोशल देशात गेला. 


राजा प्रसेनजीत आपले स्वागत करील अशी त्याची अपेक्षा होती; पण प्रसेनजीताने त्याला तुच्छतेने वागवून हाकलून दिले. मगधसम्राट अजातशत्रू यालाही उपरति झाली. वैद्य जीवका सोबत तो भगवंताकडे गेला, क्षमा मागून त्यांचा अनुयायी बनला. सर्व गणराज्य व जनपदातील लोकांना देवदत्ताच्या पापकृत्यांचा पता लागला होता. लोकांनी त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना भोजन देणे, दान देणे, भिक्षा देणेही बंद केले होते. अशातच त्याला असाध्य रोगाने पछाडले. तो रोगाने जर्जर झाला. एक पाऊलही चालता येत नव्हते. आपला अन्तीम समय जवळ आला आहे. भगवंताचे दर्शन घ्यावे, त्यांची क्षमा मागावी. ह्या विचाराने त्यांचे शिष्य त्याला पालखीत बसवून भगवंताकडे निघाले. भिक्खुंनी हे वर्तमान भगवंतास सांगितले भगवंत म्हणाले 'तो जेतवनात प्रविष्ठ होऊ शकणार नाही." आणि झालेही तसेच. जेतवनाच्या अगदी जवळ पोहोचल्यावर त्याची पालखी वाहून थकलेले शिष्य पालखी खाली ठेवून जवळच्या पुष्कर्णीमध्ये (सरोवरात) स्नानासाठी गेले. तथागतांच्या दर्शनासाठी उताविळ झालेला देवदत्त कसाबसा पालखीतून खाली उतरला. चालण्यासाठी पालखी बाहेर जमिनीवर पाय ठेऊ लागला. तेथील दलदल त्याच्या ध्यानी आली नाही. तो त्या डेऱ्यात फसला व शिष्यांच्या लक्षात येण्याच्या आत पाहता पाहता दलदलीमध्ये रुतत जाऊन पृथ्वीच्या पोटात गडपही झाला. 


ज्या दिवशी भगवान बुद्धाने नालागिरी हत्तीवर विजय मिळविला, तो दिवस होता मार्गशीर्ष पौर्णिमेचा इ.स.वी सन पूर्व ४८७. मार्गशीर्ष पौर्णिमेला घडलेली ही दुसरी घटना होय. पहिली घटना म्हणजे सिद्धार्थ गौतमाने गृहत्याग करून ते परिव्राजक झाले. कपिलवस्तु सोडल्यानंतर बिंबीसार राजाने राजगृह येथे त्यांची प्रथम भेट घेतली होती. इ.स.वी सन पूर्व ५३४. अशाप्रकारे मार्गशीर्ष पौर्णिमेला दोन महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहेत. प्रत्येक पौर्णिमेला तथागतांच्या जीवनात काही ना काही घटना महत्त्वपूर्ण अशी घटना घडलेली आहे. म्हणून प्रत्येक पौर्णिमा हा बौद्धांचा सण आहे, उत्सव आहे या दिवशी बौद्धांनी आपल्या नजीकच्या बुद्ध विहारात जाऊन सूर्य उगवण्याच्या आधी तेथे उपस्थित असलेल्या भिक्खूकडून अष्टशील ग्रहण करावे. त्यानंतर पुढील २४ तासापर्यंत अष्टशीलाचे पालन करावे.

             


भन्ते अश्वजित

सदधम्म बुद्धविहार, आरती

नगर, औरंगाबाद

मो. नं:- ९६७३२९२२९७


बौध्दांचा कायदा म्हणजे २२ प्रतिज्ञा !

संघर्षाचे नांव डॉ. बाबासाहेब आंबेडकर! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म मिशन 

मातापितु उपट्ठानं 












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या